बाल ग्राहकांची सुदृढता

Share

नुकताच देशात बालदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लहान मुलांसाठी बऱ्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ही लहान मुले म्हणजेच, वडीलधाऱ्यांच्या खांद्यावर बसून लांबचे बघणारी आणि म्हणून एक पाऊल पुढचा विचार करणारी आपली पुढची पिढी. आपल्या देशाचे भवितव्य घडवणारी पुढची पिढी, या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे बघत असतो. त्यांच्या हुशारीचे कौतुक करत असतो. या हुशारीला वाव देण्याचे काम त्यांचे पालक आणि शिक्षक करत असतातच; परंतु तेवढीच काळजी त्यांच्या आरोग्याची घेतली जाते का? हा एक सध्या भेडसावणारा फार मोठा प्रश्न आहे. कोरोनानंतर खासकरून शहरी मुलांच्या शरीरयष्टीत झालेला फरक पाहता त्यांच्या वजनात एकदम वाढ झालेली दिसून येते. लहान मुलांचे वजन जास्त म्हणजे सदृढता किंवा आरोग्य चांगले, असे म्हणणे चुकीचे ठरेल. चुकीचा आहार आणि अतिखाण्यामुळे आजच्या मुलांना स्थूलत्व प्राप्त झाले आहे, हे सहज लक्षात येते. स्थूल मुले मैदानी खेळात मागे पडतात. लवकर दमतात असे पाहण्यात येते.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे २०२१-२२ च्या व्यापक सर्वेक्षणानुसार पाच वर्षांखालील ३४ टक्के मुलांमध्ये स्थूलता दिसून आली. २०१५-१६ सालात हा आकडा २१ टक्के होता. टक्केवारीत हा आकडा छोटा वाटला तरी लोकसंख्येच्या मानाने एकूण स्थूल मुलांची संख्या फार मोठी म्हणावी लागेल. २०३० पर्यंत हे प्रमाण वाढतच जाईल, असे युनीसेफचे भारतातील न्यूट्रिशन चिफ डॉ. अर्जुन डी. वग्त यांचे म्हणणे आहे. या बाबतीत १८३ देशांपैकी भारत ९९ वा देश आहे.

बालवयातील स्थूलता वयाबरोबर वाढत जाते, असे अनुभवास येते. वाढलेल्या चरबीचा परिणाम पुढे जीवनशैली संलग्न अनेक व्याधींमध्ये परावर्तित होऊ शकतो. याचे कारण शोधायचे झाले, तर आजची जीवनशैली व बाजारशैली याच्या मोहपाशात आणि सापळ्यात अडकलेले पालक नकळतपणे याला बळी पडतात व चुकीचा मार्ग अवलंबताना दिसतात. नोकरी व्यवसायातील व्यस्तपणा, धावपळ यामुळे मुलांच्या शाळेचा टिफिन बनवताना टिन फूड, रेडी टू कूक फूड, ब्रेड, चिज, सॉस अशा प्रक्रियायुक्त पदार्थांचा आधार घेतला जातो. मधल्या सुट्टीत बाहेरचे बंद पाकिटातले तयार खाद्य पदार्थ खाण्यासाठी पैसे देणे आज पालकांना शहज शक्य झालं आहे; किंबहुना मोठेपणाचे झाले आहे. याचा परिणाम, प्रामाणिकपणे घरचा खाऊ आणणाऱ्या मुलांच्या वर हमखास झाल्याशिवाय राहत नाही. मुलांचे वाढदिवस थाटामाटात साजरे करताना सॉफ्ट ड्रिंक्स, केक आणि चिप्स अशा पदार्थांची मेजवानीच असते. यात टीव्हीवर दाखवणाऱ्या जाहिरातींचाही फार मोठा वाटा आहे. फास्ट फूड हे हेल्दी ॲण्ड सेफ अशी भ्रामक जाहिरात केली जाते. टीव्ही रिपोर्टर आणि एडिटर पल्की शर्मा उपाध्याय यांनी, त्यांच्या रिपोर्टिंगमध्ये पॅकेज्ड फूड हेल्दी व सुरक्षित म्हणणाऱ्या जाहिरातीमागचा खोटेपणा, त्याचे दुष्परिणाम याचे सुंदर विश्लेषण केले आहे आणि त्याच वेळी पारंपरिक आहाराचे महत्त्वही पटवून दिले आहे. त्या म्हणतात, वाडगाभर कॉर्नफ्लेक्स चपातीची गरज भागवतात किंवा प्रोटीन बार जेवणाच्या थाळीचा पर्याय होऊ शकतो, असे जाहिरातीतून सांगितले जाते. ते धादांत असत्य असते. सीरियल, ब्रेड, बिस्कीट, क्रॅकर्स, केक, योगर्ट, चिज, सॉसेज, सूप यांसारख्या पॅकबंद पदार्थांत प्रामुख्याने प्रिझर्व्हेटीव, कृत्रिम रंग व मीठ या तीन गोष्टी मुबलक प्रमाणात वापरलेल्या असतात. ज्याचे दुष्परिणाम शरीरावर झाल्याखेरीज राहत नाहीत.

१) प्रिव्हेंटिव्हमुळे श्वसनाचे आजार, हृदयाचे स्नायू कमकुवत होणे, कॅन्सर, शरीरातील मित्र जंतूचा नाश होणे व मुलांच्यातील अतिक्रियाशीलता वाढीस लागणे, असे प्रकार होऊ शकतात.
मायक्रोवेव्हमध्ये पॉपकॉर्न्ससारख्या फुलवून खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थात प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरलेली रसायनेही विघटीत होऊन पोटात जातात, याची माहिती फार कमी जणांना असते. प्रिझर्व्हेटिव्हमुळे पदार्थांचे शेल्फ लाईफ वाढते; परंतु खाणाऱ्यांचे कमी होते असे आपण म्हणू शकतो.

२) मिठाचा अतिरिक्त वापर पोटॅटो चिप्स, फ्रेंच फ्राईज या मुलांच्या अतिशय आवडीच्या पदार्थात केला जातो. याचा परिणाम पोटाचा कॅन्सर होणे किंवा इतर अनेक रोगांचे मूळ ठरू शकतो.

३) कृत्रिम रंग ब्रेकफास्ट सीरियल, ब्रेड, बिस्कीट, क्रॅकर्स यामध्ये वापरून ते मुलांसाठी आकर्षक बनवले जातात. जे लहान वयात पोटाचे विकार होण्यास कारणीभूत ठरतात. त्याशिवाय या पदार्थासाठी स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते किंवा यात घटक पदार्थ कोणते असतात याची शाश्वती नसते. त्या पलीकडे घरगुती आहारात वापरलेली कडधान्ये, भाज्या, फळे यातून मिळणारी कार्बोदके, फायबर, जीवनसत्त्वे, नैसर्गिक शर्करा हे पॅकेज्ड फूडमध्ये असूच शकत नाहीत. तसेच हळद, धणे, जिरे, दालचिनी, वेलची अशा मसाल्यात असलेल्या अनेक औषधी गुणांमुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागू शकते. म्हणूनच मुलांना संस्कारक्षम वयातच घरच्या खाण्याची सवय लावणे केवळ गरजेचे नव्हे, तर आवश्यकच असते. यातच वेष्टनांवरील माहिती वाचण्याची सवय पालकांनी स्वतःला लावून घेतली पाहिजे आणि आपल्या मुलांना लावली पाहिजे. यातूनच त्यांना पोषणमूल्यांसंबंधी अधिक माहिती मिळेल. शरीराला काय/किती गरजेचे हे समजू शकेल. मुंबई ग्राहक पंचायत संस्थेचे कार्यकर्ते शाळांमधून ग्राहक मंडळांच्या उपक्रमामार्फत बाल ग्राहक-विद्यार्थ्यांना सजग, सुजाण ग्राहक बनवताना सुदृढ ग्राहक बनण्याचेही धडे देतात आणि आज ही खरी काळाची गरज आहे. देशाचे भविष्य उज्ज्वल बनवणाऱ्या पुढच्या पिढीचे भविष्य आपल्याच हातात आहे.

-रंजना मंत्री

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

59 minutes ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

1 hour ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago