Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीMeasles : मुंबई, ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये गोवरचा शिरकाव

Measles : मुंबई, ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये गोवरचा शिरकाव

आरोग्य यंत्रणा सतर्क, लसीकरणावर भर, संशयित रुग्णांपैकी ५० टक्के जणांना लसीची मात्रा

अलिबाग (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये गोवरचा (Measles) फैलाव वाढला असताना आता रायगडमध्येही रुग्ण सापडू लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवलेल्या ६९ नमुन्यांपैकी ५ बालके गोवरने बाधित असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून मागील पाच वर्षानंतर पुन्हा जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोवर हा संसर्गजन्य आजार असल्याने विशेष उपाययोजना आखल्या जात आहेत. रायगड जिल्ह्यात या वर्षी १४ हजार ८३५ पैकी १४ हजार ५७२ बालकांचे लसीकरण झाले आहे. हे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या २६४ बालकांना विशेष मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आले, तरीही गोवर विषाणूचा संसर्गजन्य फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईतील हाफकिन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलेल्या नमुन्यांपैकी ५ नमुने पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. गोवरचे प्रमाण शहरी भागात वाढत आहेत. बाधित बालकांवर औषधोपचार सुरू आहेत. त्याचबरोबर आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारीही घेतली जात आहे. संशयित रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांना लसीची मात्रा देण्यात आली आहे.

दरम्यान सदरील बाधित बालकांचे पालक स्थलांतरित मजूर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचा समावेश नसल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मागील पाच वर्षाच्या खंडानंतर गोवरची साथ रायगड जिल्ह्यात पुन्हा पसरू लागली आहे. बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना ताप-सर्दीची बाधा होते, मात्र गोवरच्या साथीने पालकांसमोर एक नवी समस्या उभी राहत आहे.

गोवरची लक्षणे

ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे ही गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. मात्र वेळीच काळजी घेतल्यास संभाव्य धोके टाळता येतो.

लसीकरण आवश्यक

गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्त्वाचे प्रमाण कमी होते. अ जीवनसत्त्व कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्त्वाची मात्रा दिल्यास हा आजार होण्याची शक्यता कमी होते. गोवरचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण हा प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांत लस उपलब्ध आहे. बालकांचे गोवर, रुबेला लसीकरण झाले नसेल ते करून घ्यावे. लशीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते १२ महिने व दुसरा डोस १६ ते २४ महिने या वयोगटात देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ज्या बालकांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत त्यांचा शोध घेउन उपचार सुरू केले आहेत. ही साथ पनवेलमध्ये पसरत असल्याचे आढळले असून साथ रोखण्यासाठी रायगडमध्ये पुरेशी आरोग्य सुविधा, औषधसाठा आहे. खबरदारी म्हणून ज्या बालकांचे लसीकरण झाले नसेल, त्यांचे लसीकरण करून घ्यावे. – डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -