
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात भाजप महिला कार्यकर्त्याकडून विनयभंगाचा (molestation) गुन्हा दाखल केला आहे. उड्डाणपुलाच्या उद्घाटनादरम्यान ही घटना घडली असल्याची तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच संतापलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यावर पोलिसी अत्याचार सुरू असून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल ठाण्यात होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन प्रलंबित उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात येणार होते. या लोकार्पण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते-पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा पुलाचे लोकार्पण केल्यानंतर ते मुंब्रा येथील वाय जंक्शन येथे रवाना झाले. मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित भाजपच्या एका महिला कार्यकर्तीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि सदर महिला कार्यकर्त्या आमने-सामने आल्या. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून 'काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो' असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत रीदा रशीद या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पुलाच्या उद्घाटनासाठी येणार यासाठी सदर महिला कार्यकर्त्या या दुपारी ४ वाजल्यापासून लोकार्पण सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित होत्या. लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला असून या प्रकरणी लवकरात लवकर शिक्षा मिळावी अशी मागणी तक्रारकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
दोन आठवड्यापूर्वी दिवा आणि मुंब्र्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील तलावाजवळ छटपूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित रीदा रशीद या महिलेने भाजपतर्फे शुभेच्छा आणि स्वागताचे बॅनर लावले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी देखील बॅनर लावले. बॅनर लावण्यावरून रीदा रशीद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. तेव्हा देखील आपल्याला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिवीगाळ करत हल्ला केल्याची तक्रार रीदा रशीद यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यामुळे आव्हाड यांनी जाणुनबुजून माझा अपमान करण्यासाठी माझ्याशी अशाप्रकारे वर्तन केल्याचे रीदा रशीद यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या...
- Molestation : विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा
- Anjali Damania : अत्यंत नीच दर्जाचे राजकारण : अंजली दमानिया
- Ashish Shelar : जितेंद्र आव्हाड वेडेचाळे करतायेत: आशिष शेलार