Friday, May 9, 2025

रायगड

रायगडमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवेला उतरती कळा

सुभाष म्हात्रे


अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या दुर्गम भागातील वेड्यावाकड्या वळणाचे उखडलेले रस्ते, सकाळी आलेली एसटी बस सायंकाळी येईलच याची अनिश्चितता, एसटी बस आली तरीही मध्येच बंद पडण्याची भीती यामुळे जिल्ह्यात राज्य परिवहन सेवा डबघाईला जाऊ लागली आहे. अशीच परिस्थिती खासगी प्रवासी वाहतुकीचीही आहे. लांबच्या अंतराचे न परवडणारे भाडे, टमटममध्ये दाबून भरलेले प्रवासी आणि रस्त्याच्या परिस्थितीमुळे अपघात होण्याच्या भीतीमुळे रायगड जिल्ह्यात रिक्षाचालकांच्या उत्पन्नात कमालीची घट होत आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात सार्वजनिकसह खासगी वाहतूक सेवेला उतरती कळा लागली आहे.


रायगड जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत की, त्याठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवेचा अभाव आहे. याला खराब रस्ते हे महत्त्वाचे कारण दिले जाते. सार्वजनिक वाहतूक सेवेच्या असातत्यामुळे येथील प्रवाशांचा या सेवेवरील विश्वास उडू लागला आहे. त्यामुळे पूर्वी लालपरीची वाट पाहणारे काही प्रवाशी आता लालपरीतून प्रवास टाळू लागलेत. अपुऱ्या प्रवासी संख्येमुळे वाहतूक सेवा चालविणाऱ्यांना हा बेभरवशाचा धंदा वाटत असल्याने या समस्येपुढे एसटीसारख्या शासकीय सेवेनेही शरणागती पत्करल्याचे दिसून येत आहे.


कोरोनादरम्यान सोशल डिस्टसिंगमुळे सार्वजनिक वाहतुकीवर बंधने आली. त्यात अनेकांचा व्यवसाय डबघाईला आला. अनेकांना यातून सावरताच आले नाही. यामुळे काहींनी रिक्षा, सहा आसनी वाहने विकून टाकली. एसटीलाही यातून डोके वर काढता आलेले नाही. मध्यंतरी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे एसटी सेवेला वैतागून नोकरदार वर्गाने दुचाकी घेत प्रवास सुरू केला आहे. अशा अनेक कारणाने रायगडमधील सार्वजनिक वाहतुकीला उतरती कळा लागले, हे यावरून स्पष्ट होत आहे.


कोरोना काळात सार्वजनिक वाहतूक सेवा बंदच होती. पूर्वी ५६० एसटी बसेस होत्या. त्या आता ३६० आहेत. प्रवासी कमी असल्याने मार्गांची संख्याही कमी झालेली आहे. यावर मात करण्यासाठी एसटीच्या सर्व मार्गांवर बसेस सुरू करण्याचा एसटी व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. रायगडमध्ये आणखी एसटी बसेस मागविण्यात येत आहेत. एसटीचा प्रवास सुरक्षित आहे. एसटीकडून हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात असून, याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काही दिवसांपासून एसटीच्या उत्पन्नातही वाढ होताना दिसते आहे. - दीपक घाडे, वाहतूक नियंत्रक, रामवाडी-पेण


अलिबागमध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. पूर्वी हे पर्यटक ऑटोरिक्षाचा वापर करीत असत. आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. बहुतांश पर्यटक स्वतःच्या वाहनातून येतात. त्याचबरोबर सीएनजीसाठी दोन ते तीन तास वेळ खर्च केल्यानंतर दिवसभरात जेमतेम आठशे रुपयांचा धंदा होता. - शरद राऊत, (अध्यक्ष, अलिबाग तालुका रिक्षा संघटना)

Comments
Add Comment