Monday, June 16, 2025

आव्हाड यांना जामीन मंजूर

आव्हाड यांना जामीन मंजूर

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने आव्हाड यांना दिले आहेत.


न्यायालयीन कोठडी सुनावताच आव्हाडांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. या जामीन अर्जावर आज दुपारी सुनावणी झाली.


जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अ‌ॅड. प्रशांत कदम यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान अ‌ॅड. कदम यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाडांची अटक बेकायदेशीर आहे. अटक करण्याच्या ७२ तास आधी आव्हाडांना नोटीस देणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी तसे केले नाही. नियमांचे उल्लंघ करुन, कोणताही प्रोटोकॉल न पाळता आव्हाडांना अटक करण्यात आली आहे.


आव्हाडांच्या वकिलांनी सांगितले की, आव्हाड हे पोलिसांना चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. ते स्वत: पोलिस स्टेशनमध्ये नोटीस घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर अजामीनपात्र गुन्ह्याची कलमे लावण्यात आली. आव्हाडांनी चित्रपटगृहात कोणालाही मारहाण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल गुन्हे चुकीचे आहेत. तर, सरकारी वकिलांनी चौकशीसाठी आव्हाडांची ८ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली. चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण करत 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काल अटक केली होती.


दरम्यान, दोन वर्षांपूर्वी आव्हाडांविरोधात पोस्ट टाकल्याचा आरोप करत संगणक अभियंता अनंता करमुसे यांना घरातून नेऊन आव्हाड यांच्या बंगल्यात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या वेळी आव्हाड उपस्थित असल्याचे करमुसे यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते. आव्हाड यांना तेव्हाही अटक होऊन त्यांची सुटका झाली होती.

Comments
Add Comment