नवी दिल्ली : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. मागिल काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यावर आता अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे.
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या एका निकटवर्तीयाने सानिया व शोएब यांच्या नात्यावर भाष्य करताना हे दोघेही विभक्त झाल्याची पुष्टी केली आहे. काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्झाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली होती.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सानिया मिर्झा व शोएब मलिक प्रदिर्घ काळापासून एकमेकांपासून विभक्त राहत होते. आता दोघांनी औपचारिकरित्या घटस्फोट घेतला आहे. शोएब मलिकच्या पाकिस्तानी व्यवस्थापन संघाच्या सदस्याने हे सांगितले आहे.
सानियाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यात तिने सानियाने तिचा मुलगा इजहानच्या वाढदिवसानिमित्त त्याचा एक फोटो शेअर केला होता. त्यात शोएबचा सहभाग नव्हता. यामुळेही त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसून आले होते.
पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या माहितीनुसार, शोएब मलिक एका दुसऱ्या मुलीला डेट करत आहे. यामुळेही त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे मानले जात आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर दोघांनीही आपापल्या वाटा वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला. सानिया व शोएब यांच्या घटस्फोटाच्या मुद्यावर पाकिस्तानात खमंग चर्चा रंगली आहे. पण त्यांनी अद्याप या प्रकरणी कोणतेही भाष्य केले नाही.
सानिया दुबईत, शोएब पाकिस्तानात
सानिया व शोएब यांनी १२ एप्रिल २०१० रोजी विवाह केला होता. त्यांच्या विवाहाकडे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याची एक मजबूत कडी म्हणूनही पाहिले जात होते. २०१८ मध्ये सानियाला मुलगा झाला. त्यांनी त्याचे नाव इजहान ठेवले होते. सानिया सध्या ३५ वर्षांची असून, शोएब मलिक ४० वर्षांचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सानिया सध्या दुबईत, तर शोएब पाकिस्तानात राहत आहे.