Monday, March 24, 2025
Homeताज्या घडामोडीअफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

मूळ ढाच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची स्पष्टोक्ती

सातारा : छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणा-या सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाला सुरुवात झाली आहे. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात येत आहे.

अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकामावरुन अनेकदा वाद झाले आहेत. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून हे वाद समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडावे अशी शिवप्रेमींची मागणी होती. तसेच इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगण्यात येत होता त्यावरुनदेखील अनेकदा वाद झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर हा परिसर २००६ सालापासून पूर्णपणे सील करण्यात आला होता.

न्यायालयाने हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. मात्र गुरुवारी पहाटेपासून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या हे काम सुरु असून मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे. तसेच, संपूर्ण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीला धक्काही लावलेला नाही. कबरीच्या मुळ ढाच्याला धक्का लागूही देणार नाही. केवळ कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येत आहे, अशी स्पष्टोक्ती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच जिल्हा प्रशासनाकडून आजची कारवाई करण्यात येत आहे. कबरीच्या मुळ ढाच्याला काहीही करणार नाही. सुप्रीम कोर्टानेच कबरीजवळ जे अनधिकृत बांधकाम दिवसेंदिवस वाढत आहे, ते हटवावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार केवळ कबरीजवळील बांधकाम हटवण्यात येत आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, अफजल खानाच्या कबरीच्या चारही बाजूंनी भितींचे बांधकाम आहे व त्यावर छत आहे. या मुळ बांधकामावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. हे बांधकाम सुरक्षित ठेवण्यात येईल. मात्र, याच्या बाजुलाच वाढीव, अनधिकृत बांधकाम करम्यात आले आहे. हे बांधकाम तातडीने हटवावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -