Tuesday, July 16, 2024
Homeअध्यात्मसाधन निष्काम बुद्धीने आणि सावधानपणे करावे

साधन निष्काम बुद्धीने आणि सावधानपणे करावे

भगवंतापासून जो निराळा राहात नाही तो मुक्तच. ‘मी भगवंताचा’ म्हटले की तिथे बद्धपणा संपला. ‘मी’ नसून ‘तो’ आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे. देहात असून देहातीत राहतो तो मुक्त. ‘राम कर्ता’ हे जाणतो तो मुक्त. ‘माझे माझे’ म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो, बद्धाचे आवरण काढून टाकले की आपण मुक्तच आहोत. माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिले, की मुक्तावस्था. ‘माझ्यासारखा पापी मीच’ असे आपण मनानेच ठरवतो आणि दुःख करीत बसतो. मी एक भगवंताचा झालो, आता नाही कोणाचा, असे म्हणावे आणि जगात नटासारखे वागावे. वास्तविक, आपण मायेकडून पछाडले गेलो आहोत. भगवंताजवळ माया ही छायेप्रमाणे आहे. आपण मायेचा नियंता जो भगवंत, त्याचे होऊन राहावे; मग माया खरी नाही हे समजते. मायेला ओळखणे म्हणजे विवेक आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानणे, हे वैराग्य.

पापपुण्य हे मनाचे धर्म आहेत, मी आता नाम घेतो, माझी सर्व पापे त्यामुळे नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला हे समजावे. चारचौघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार. साधनात दृढ भाव पाहिजे. साधन करायचे ते योग्य मार्गाने झाले पाहिजे. ते अगदी निष्काम असावे. बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच; पण साधकाने आपला बुद्धिभेद होत नाही इकडे जागृत असावे. काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो, तरीही हे लोक उगीचच जगाचे दोष काढीत बसतात; दुसऱ्यांच्या घरी जाऊन उठाठेव करतात; हे फार मोठे पाप आहे. साधकाने ते कटाक्षाने टाळावे.

ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही, ते लोक अगदी खालचे समजावेत; ज्यांना आपला दोष कळतो ते दुसऱ्या प्रतीचे समजावेत. आपण प्रयत्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वांत चांगले; साधकाने तसे बनले पाहिजे. परमार्थमार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर, मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात. खरे म्हटले म्हणजे साधन आणि वाचन असले की साधक कधी मागे पडायचा नाही. ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत, कारण तशाने प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल. त्याने प्रपंचापासून चार पावले दूर राहावे, नाही तर तोच हवा असे वाटू लागते. जगात किती पोथ्या आणि किती मते आहेत, एवढे पाहायला वेळ कुठे आहे? म्हणून साधकाने गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत किंवा दासबोध, असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे.

– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -