कांद्याला २३०० तर सोयाबीनला ४ हजार २०० दर
येवला (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसह अंदरसूल उपबाजार आवारात गत सप्ताहात उन्हाळ कांदा आवक टिकून राहिली तर बाजारभावात वाढ झाली. कांद्याला सरासरी दोन हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला, तर सोयाबीनला सरासरी चार हजार २०० रुपयांपर्यंत भाव मिळाले.
कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक इत्यादी राज्यांत व परदेशात मागणी चांगली होती. सप्ताहात कांदा आवक २९ हजार ८११ हजार क्विंटल झाली असून, उन्हाळ कांद्याचे बाजारभाव ३०० ते ३२५१, तर सरासरी २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल येथे उन्हाळ कांद्याची आवक १० हजार क्विंटल झाली. उन्हाळ कांद्याचे बाजारभाव ३०० ते ३१६५, तर सरासरी २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.
मूगच्या आवकेत घट झाली, तर व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभाव तेजीत होते. बाजारभाव ४५०० ते ७७५३, तर सरासरी सात हजार रुपयांपर्यंत होते. सोयाबीनच्या आवकेत व सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. आवक ६४३० क्विंटल झाली असून, बाजारभाव ४००० ते ५४६६, तर सरासरी ५२०० रुपयांपर्यंत होते. मक्याच्या आवकेत वाढ झाली, तर व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते.
मक्याची आवक २० हजार २१२ क्विंटल झाली असून, बाजारभाव १५०० ते २१४०, तर सरासरी १९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसूल व पाटोदा येथे मका, सोयाबीन व भुसार धान्य लिलाव सुरू झाले असून, अंदरसूल व पाटोदा परिसरातील शेतकरी बांधवांनी मका, सोयाबीन व भुसार धान्य रास्त भावाने विक्री होण्यासाठी उपबाजार अंदरसूल व पाटोदा येथे विक्रीस आणावे, असे आवाहन बाजार समितीचे सचिव के. आर. व्यापारे यांनी केले.
सप्ताहात गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. आवक ८६ क्विंटल झाली असून, बाजारभाव २१२५ ते २९५१, तर सरासरी २७५० रुपयांपर्यंत होते. बाजरीच्या आवकेत घट झाली, तर बाजारभाव स्थिर होते. बाजारभाव १७७० ते २१५१, तर सरासरी १८९० रुपयांपर्यंत होते. हरभऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात हरभऱ्याची आवक ७११ क्विंटल झाली असून, बाजारभाव ३२०१ ते ५०००, तर सरासरी ४२०० रुपयांपर्यंत होते.