मुंबई (वार्ताहर) : शेअर बाजारातील तेजी सोमवारीही कायम होती. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत सोमवारी सेन्सेक्समध्ये २३४ अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८५ अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये ०.३९ टक्क्यांची वाढ होऊन तो ६१,१८५ अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये ०.४७ टक्क्यांची वाढ होऊन तो १८,२०२ वर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही सोमवारी ४२८ अंकांची वाढ होऊन तो ४१,६८६ वर पोहोचला.
सोमवारी बाजार बंद होताना १९९४ शेअर्समध्ये वाढ झाली, तर १४६५ शेअर्समध्ये घसरण झाली. दिवसभरात एकूण १८५ शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३७.७७ अंकांच्या तेजीसह ६१,१८८ अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ९४.६० अंकांनी वधारत १८,२११ अंकांवर खुला झाला. सकाळी ९.३५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक १६८ अंकांनी वधारत ६१,११९.३५ अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी ६१.८० अंकांनी वधारत १८,१७८.९५ अंकांवर व्यवहार करत होता.
सोमवारी बाजार बंद होताना ब्रिटानिया कंपनीच्या शेअर्समध्ये ८.८१ टक्क्यांची वाढ झाली. एसबीआय, अदानी एन्टरप्रायझेस, बीपीसीएल, आयशर मोटर्स या शेअर्समध्ये वाढ झाली. डिविस लॅबच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्याचसोबत एशियन पेन्ट्स, सिपला, बजाज फिनसर्व्ह आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
शेअर बाजार बंद होताना फार्मा, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्र सोडले, तर इतर सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदी झाल्याचे दिसून आले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी ३६ शेअर्समध्ये तेजी, तर उर्वरित १४ शेअर्समध्ये घसरण झाली.