शेअर बाजारात या आठवड्यात देखील तेजी पाहावयास मिळाली. आपण आपल्या ऑक्टोबर महिन्याच्या लेखात निफ्टी १८००० या पातळीपर्यंत जाऊ शकते हे सांगितलेले होते. निर्देशांकात या दोन महिन्यांत महातेजी झालेली आहे. आपण सांगितलेला टप्पा देखील निफ्टीने गाठलेला आहे. पुढील आठवड्याचा विचार करता १७६०० ही निफ्टीची अत्यंत महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या वर आहे तोपर्यंत ही तेजी अशीच कायम राहील. निफ्टीची तेजी अशीच टिकून राहिली तर निफ्टी १८४०० ते १८५०० या पातळीपर्यंत वाढ दाखवू शकते. शेअर बाजारात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स जर दीर्घमुदतीसाठी घेऊन ठेवले तर गुंतवणूकदाराना ते नेहमीच चांगला फायदा करून देत असतात. यासाठी टेक्निकल आणि फंडामेंटल अॅनालिसीसनुसार चांगल्या कंपन्या निवडून टप्प्याटप्प्याने सातत्याने ते शेअर्स खरेदी करत राहणे हे अत्यंत आवश्यक असते. ‘सन फार्मा’ ही आज आघाडीची औषधी निर्माण करणारी कंपनी असून १९८३ ला या कंपनीची सुरुवात झाली. सुरुवातीला या कंपनीने मानसिक आजारावर काम करणाऱ्या केवळ ५ औषधांची निर्मिती करून कंपनीला सुरुवात केली. आज प्रामुख्याने हृदयाचे आजार, डोळ्यांचे आजार, हाडाचे आजार, किडनीचे आजार, मानसिक आजार यावरील औषध निर्मितीचे काम ही कंपनी करते. आज जवळपास २००० पेक्षा अधिक उत्पादने या कंपनीची असून या एकूण उत्पादनांपैकी ७०% पेक्षा जास्त विक्री ही बाहेरील देशांमध्ये होते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ५०% उत्पन्न हे अमेरिकेतून येते.
१९९४ साली आयपीओद्वारे ह्या कंपनीचा शेअर बाजारात प्रवेश झाला. भारतामध्ये आज पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या या कंपनीने १९९७ मध्ये अमेरिकेतील ‘कँराको’ ही कंपनी ताब्यात घेतली. ‘सन फार्मा’ या कंपनीने ताब्यात घेतलेली ही त्यांची पहिलीच ‘आंतरराष्ट्रीय कंपनी’ होती. त्यानंतर मधल्या काही वर्षांत मिल्मेट लॅब, गुजरात लायका या कंपन्याचा ताबा त्यांनी घेतला. २०१० ते २०१२ च्या दरम्यान ‘सन फार्मा’ने दुसा फार्मा, तरो फार्मा आणि यूआरएल फार्मा या मोठ्या कंपन्यांचा ताबा घेतला. २०१४ हे वर्ष या कंपनीसाठी अतिशय सोनेरी ठरले. याच वर्षी सन फार्माने औषधी क्षेत्रातील मोठी समजली जाणारी कंपनी “रॅनबॅक्सी” हिचा ताबा घेतल्याची घोषणा केली आणि केवळ भारतातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेमध्ये देखील या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये जगातील पहिल्या पाच क्रमाकांमध्ये ‘सन फार्मा’ जाऊन बसली. आज औषधी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्यामध्ये ‘सन फार्मा’ जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर आहे. जवळपास ५०००० पेक्षा अधिक लोक या कंपनीत काम करतात. जगभरातील ६ खंडांत या कंपनीची उत्पादन केंद्रे आहेत.
काही वर्षांपूर्वी ‘वेजमन’ या संस्थेच्या सहकार्याने मेंदूच्या आजारावर उपचार व संशोधनात या कंपनीने प्रवेश केला आहे. ‘सन फार्मा’ या कंपनीची आणखी काही उत्पादने ही यूएसच्या अन्न व औषधी प्रशासनाकडून मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या फंडामेंटल अॅनालिसीसनुसार जरी भारतीय निर्देशांक महाग असले तरी शेअर बाजारात आगामी काळातील प्रत्येक घसरणीत ‘सन फार्मा’चे शेअर्स प्रत्येक टप्प्याला खरेदी करीत गेल्यास आज केवळ १०३९ रुपये किमतीला मिळणारा हा शेअर पुढील ५ वर्षांचा विचार करता गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून देऊ शकेल. आपण आपल्या लेखमालेत यापूर्वी सनफार्मा ७६४ रुपये किमतीला आणि ४८० रुपये किमतीला असताना खरेदीस योग्य म्हणून सांगितलेला आहे. ज्यावेळी शेअर बाजारात घसरण होत असते त्यावेळी निर्देशांकासोबतच घसरणारे शेअर्सचे भाव बघून आपल्याला भीती वाटायला लागते. आपण अशा घसरणीमध्ये घाबरून जाऊन आपल्याकडील चांगल्या कंपन्यांचे दीर्घमुदतीसाठी घेतलेले शेअर्स देखील मिळेल त्या किमतीला विकून टाकत असतो. त्यामुळे उत्तम आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शेअर्समध्ये देखील आपण नियोजन आणि अभ्यासाच्या अभावामुळे काही कारण नसताना नुकसान सहन करतो. दीर्घमुदतीसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना नेहमी संधी मिळताच प्रत्येक मंदीत शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स सातत्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे लागते.
अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसीस) तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७४०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्चे तेलात आणखी वाढ होऊ शकते. मागील लेखात सांगितल्याप्रमाणे सोन्याने मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी रचना तयार केलेली असून आता जोपर्यंत सोने ५०००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यामध्ये मध्यम मुदतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.
शेअर बाजारात गेले काही महिने नीच्चांकापासून मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. गुंतवणूक करीत असताना बऱ्याच वेळा आपण शेअर अल्पमुदतीसाठी घेतला असेल आणि त्यानंतर जर त्या शेअरमध्ये घसरण झाली तर बरेच गुंतवणूदार शेअरची किंमत खरेदी किमतीपेक्षा खाली आली म्हणून स्टॉपलॉस न लावता तो घेतलेला शेअर लाँग टर्म म्हणून ठेवून देतात आणि त्यामुळे गुंतवणूक अडकून पडते. गुंतवणूक करीत असताना आपला त्या शेअरमधील गुंतवणुकीचा कालावधी तो घेण्यापूर्वीच ठरवणे आवश्यक आहे म्हणजे आपली गुंतवणूक अडकणार नाही.
-सर्वेश सोमण
मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चित्रपटाचे नाव…
मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घाटकोपरमध्ये रात्रीच्या वेळी औषधाच्या दुकानातून औषध…
'असे' असतील पर्यायी मार्ग मुंबई : भाषिक राज्याच्या स्थापनेचे स्मरण म्हणून दरवर्षी १ मे रोजी…
आम्ही मुंबई स्वच्छ केली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठावर कडाडून…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तान विरोधात एकवटला आहे. जो - तो पाकिस्तानची…
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…