रत्नागिरी (प्रतिनिधी) : स्वच्छता व आरोग्य चांगले राखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरामागे सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे शिवधनुष्य जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे उचलण्यात आले आहे. जिल्ह्यात ३ लाख ३२ हजार १३९ घरे असून प्रत्येक कुटुंबात जाऊन योजनेची जनजागृती केली जाणार आहे.
ग्रामीण भागात विखुरलेल्या वाडी, वस्त्यांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे शक्य होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या योजनांमुळे गावांमध्ये कचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शहरांकडील ओढा वाढत असला तरीही निवासाची व्यवस्था नसल्यामुळे लोक शहरांजवळील गावात राहू लागले आहेत. शासनाने गावातच राहून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने अनेकजण ग्रामीण भागातच राहून रोजगार संधी उपलब्ध करण्यावर भर देण्याच्या विचारात आहेत. प्रत्येक वाडीचे, गावातील लोकांच्या आरोग्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. कचरा, सांडपाण्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी गावस्तरावर त्याचे नियोजन केले जात आहे.
गावातील प्रत्येक कुटुंबाचा हातभार लागला, तर योजना अंमलात येते. हे लक्षात घेऊन स्वच्छता मिशन कक्षाकडून प्रत्येक कुटुंबापर्यंत योजनेची माहिती पोहोचवण्याचे नियोजन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावर बैठका सुरू आहेत. जिल्ह्यात ३ लाख ३२ हजार कुटुंबे असून योजनांचा लाभ त्या कुटुंबांना दिला जाणार आहे.
सांडपाणी व्यवस्थापनामध्ये वैयक्तिक शोषखड्डे, पाझरखुडा (घरगुती किंवा सार्वजनिक) उभारण्यासाठी ग्रामपंचायतीच्या लोकसंख्यानुसार प्रतिव्यक्ती २८० रुपयांप्रमाणे निधी दिला जातो. घनकचरा व्यवस्थापनामध्ये ओला, सुका कचरा वर्गीकरण करून तो संकलित करणे आणि त्यांची विल्हेवाट लावणे. विघटनशील कचऱ्यांचे व्यवस्थापन करणे, गांडूळ खतनिर्मितीला चालना दिली जाईल. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर लोकसंख्येनुसार प्रति व्यक्ती ४५ ते ६० रुपये दिले जातात. यामध्ये ६० टक्के केंद्र व ४० टक्के राज्य शासन निधी देते. प्लास्टीक कचरा व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यासाठी तालुकास्तरावर एका युनिटसाठी १६ लाख रुपये मिळतात, तर मैला गाळ व्यवस्थापनासाठी जिल्हा स्तरावर रेटरो फिटिंगसाठी २३० रुपये दिले जात आहेत.