भारतीय जनता पक्षाचा भक्कम गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून, येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातची निवडणूक कधी होणार? याकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिलेले होते. हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर गुजरातची निवडणूक जाहीर करण्यास विलंब कशासाठी?, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला होता. आता प्रश्न विचारण्याऐवजी निवडणूक कशी लढवायची? हीच काँग्रेसची परीक्षा ठरणार आहे.
गुजरातमधील चार कोटी नव्वद लाख मतदार १८२ विधानसभा मतदारसंघांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाच्या निवडणुकीचे वेगळेपण म्हणजे गेली तीस वर्षे या राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट निवडणूक होत होती आणि भाजपने सतत विजय मिळवला. गेली तीन दशके राज्यात भाजपची सत्ता आहे. यावेळी मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हिरीरीने मैदानात उतरल्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. १९९० मध्ये या राज्यात तिरंगी निवडणूक झाली होती, त्यावेळी जनता दलाने ७० जागा जिंकल्या होत्या, भाजपला ६७ जागा मिळाल्या होत्या व काँग्रेसच्या वाट्याला केवळ ३३ जागा आल्या होत्या. यावेळी काँग्रेस आणि आप हे दोन पक्ष परस्परांवर किती मात करतात, हेच बघायचे आहे. या राज्यात भाजपचा विजय नक्की आहे. पण गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त आमदार निवडून आणणे, यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील १६० मतदारसंघांवर भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे.
सन २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली नाही. पण काँग्रेसने उत्तम कामगिरी बजावली होती. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचे ७७ आमदार निवडून आले होते. काँग्रेसने दिलेल्या चिवट झुंजीमुळे भाजपला शंभरी गाठता आली नव्हती. गेल्या निवडणुकीत भाजपचे ९९ आमदार विजयी झाले होते. गेल्या वेळची भरपाई या वेळी करण्याचे भाजपने ठरवले आहे. गेल्या वेळचा वचपा या वेळी काढायचा, अशी रणनीती भाजपने आखली आहे. गुजरातमधील १४२ मतदारसंघ हे खुल्या वर्गासाठी आहेत. अनुसूचित जाती-जमातीसाठी अनुक्रमे १३ व २७ राखीव आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत, तर दुसऱ्या टप्प्यात ९३ मतदारसंघांत मतदान होणार आहे.
गुजरात हा भाजपचा गेली तीस वर्षे मजबूत किल्ला आहे. भाजपच्या दृष्टीने गुजरात हे नंबर एकचे सुरक्षित राज्य आहे. मोदी आणि शहा केंद्रात आल्यापासून या राज्याला नेहमीच झुकते माप दिले जाते, अशी विरोधी पक्षांकडून टीका केली जाते. गुजरात मॉडेल हे विकासाचे प्रतीक म्हणून या जोडीने देशात बिंबवले. गुजरात मॉडेल समोर मांडूनच भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मते मागितली व केंद्रातील सत्ता काबीज केली. गेल्या आठ वर्षांत गुजरातमध्ये चोहोबाजूंनी गुंतवणूक होते आहे. गुजरातची औद्योगिक व आर्थिक उन्नती वेगाने होत आहे. मग निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस व आपचे नेते भाजपवर टीका कोणत्या तोंडाने करणार? गुजरातमध्ये मुख्यमंत्री कोणीही असले तरी भाजपचा चेहरा देशाचे पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी हेच आहेत. मोदींच्या नावावर भाजपच्या पारड्यात धो-धो मते मिळणार, हे उघड आहे. मोदींना टक्कर देऊ शकेल, असा आज राष्ट्रीय पातळीवर दुसरा नेता नाही आणि गुजरातमध्ये तर त्यांच्या जवळपासही कोणी नाही.
गेल्या निवडणुकीत पंचाहत्तर आमदारांच्या पुढे झेपावणारा काँग्रेस पक्ष गेल्या पाच वर्षांत कुठे आहे? मोदी-शहांच्या नेतृत्वाला आणि प्रतिमेला टक्कर देऊ शकेल, असा एकही नेता काँग्रेसकडे नाही आणि निदान भाजपला प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य असलेला नेता काँग्रेसला गेल्या पाच वर्षांत उभा करता आला नाही. काँग्रेसची पारंपरिक मते या राज्यात निश्चित आहेत. दलित, मुस्लीम, मागासवर्गीय मतदार हा काँग्रेसचा जुना मतदार आहे. पण मते खेचणारा काँग्रेसकडे राज्य पातळीवर कोणी नेता नाही, हेच या पक्षाचे दुर्दैव आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाली, पण खर्गे यांचे नाव गुजरातमध्ये कितीजणांना ठाऊक आहे? गेल्या निवडणुकीत राहुल गांधींनी गुजरातमध्ये ठाण मांडले होते, ठिकठिकाणी मंदिरात जाऊन आपण हिंदू आहोत, असा प्रचार त्यांनी चालवला होता. पण यावेळी ते स्वत: भारत जोडो यात्रेत गुंतले आहेत. भारत जोडो यात्रेचा मार्ग गुजरातमधून जात नाही, हे आणखी महत्त्वाचे आहे. भारत जोडो यात्रेचा लाभ गुजरातमध्ये काँग्रेसला मिळण्याची सुतराम शक्यता नाही.
गुजरातमधील निवडणुकीच्या लढाईत काँग्रेस पक्ष स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करीत आहे, विधानसभेत खाते उघडण्यासाठी आपची धडपड चालू आहे, तर भाजपने दोन तृतियांश बहुमत गाठण्यासाठी सर्व काही पणाला लावले आहे. निवडणूक पूर्व झालेल्या पाहणीनुसार, भाजपला १२० पर्यंत जागा मिळू शकतात, तर काँग्रेस व आप एकमेकांचे नुकसान करतील व पंचवीस-तीसच्या घरात त्यांना जागा मिळतील. मतदानापर्यंत कितीही वातावरण बदलले तरी गुजरातमध्ये भाजपचा पराभव करणे हे काँग्रेस व आप या दोन्ही पक्षांना अशक्य आहे.