अॅडलेड (वृत्तसंस्था) : केन विल्यमसनने झंझावाती अर्धशतक झळकावल्यामुळे न्यूझीलंडने आयर्लंडचा ३५ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील तिकीट मिळवले आहे. स्पर्धेत सेमीफायनलचे स्थान गाठणारा न्यूझीलंड त्यांच्या गटातील पहिला संघ ठरला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून आयर्लंडच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित २० षटकांत आयर्लंडसमोर १८६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ १५० धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात झंझावाती अर्धशतकीय खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला सामनीवीर म्हणून गौरवण्यात आले. कर्णधार केन विल्यमनसच्या ६१ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने २० षटकांत ६ विकेट्स गमावून १८५ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघाने ९ विकेट्स गमावून १५० धावा केल्या. दोन्हीही संघाचा टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ फेरीतील अखेरचा सामना होता.
न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि कर्णधार बालबर्नी यांनी पहिल्या विकेट्ससाठी ८.१ षटकांत ६८ धावा केल्या. बलबर्नी ३० धावांवर बाद झाला. यादरम्यान त्याने तीन षटकार लगावले. त्यानंतर दहाव्या षटकात स्टर्लिंगही माघारी परतला. त्याने २७ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३७ धावा केल्या. हे दोघे आऊट झाल्यानंतर आयर्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाला डाव सावरता आला नाही.
यादरम्यान हॅरी टेक्टर २ धावा, गॅरेथ डिलेन १० धावा, लॉर्कन टकर १३ धावा, कर्टिस कॅम्फर ०७ धावा आणि फियान हँड ०५ धावांवर बाद झाले. जॉर्ज डॉकरेलनने १५ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २३ धावांचे योगदान दिले. याशिवाय मार्क एडेरलाने केवळ ५ धावा केल्या. हा सामना न्यूझीलंडच्या संघाने ३५ धावांनी जिंकला. विजयासह न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.