अॅडलेड (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे तशी स्पर्धेतील रंगत आणखी वाढत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यामुळे भारताला बांगलादेशला नमवावे लागेल, तरच उपांत्य फेरीतील भारताचे स्थान जवळपास निश्चित होईल. उभय संघ उद्या बुधवारी आमने-सामने येणार आहेत. अॅडलेडच्या मैदानावर सामना रंगणार असून ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. भारतासाठी हे चांगले संकेत आहेत. बांगलादेशलाही आगेकूच करण्यासाठी विजय आवश्यक आहे. दोन्ही संघाना पराभव परवडणारा नसल्याने सर्वांच्याच नजरा या निर्णायक अशा लढतीवर असतील.
ऑस्ट्रेलियातील वातावरणाचा विचार केल्यास भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे संकट आहे. तसे झालेच आणि सामना अनिर्णित राहिला तर ते दोन्ही संघांनाही परवडणारे नाही. कारण दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळतील आणि भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अन्य सामन्यांवर अवलंबून राहावे लागेल. जर का भारताने बांगलादेशला पराभूत केले, तर उपांत्य फेरीतील भारताचे स्थान जवळपास निश्चितच असेल. दोन विजयांसह ४ गुणांसह भारत दुसऱ्या आणि बांगलादेश तिसऱ्या स्थानी आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील गेल्या पाच सामन्यांचा विचार केल्यास भारताचेच वर्चस्व दिसते. पाचपैकी चार सामने भारताने खिशात घातले असून बांगलादेशला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. या सामन्यांना जवळपास तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. दोन्ही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. तसेच परस्परांतील अलिकडच्या सामन्यांचा अनुभवही नाही.
अॅडलेडची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. भारतासाठी ही चांगली बाब आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा ही तिकडी खोऱ्याने धावा जमवत आहे. लोकेश राहुलचा अनफॉर्म भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. बांगलादेशविरुद्ध रिषभ पंतला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजी अधिक मजबूत आणि खोल होईल. हार्दिक पंड्याही दोन्ही आघाड्यांवर उपयोगी पडत आहे. त्यामुळे अॅडलेडच्या खेळपट्टी भारताला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांनी आतापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. हीच कामगिरी त्यांना बांगलादेशविरुद्धही करता आली तर भारताला विजयाची चिंताच नाही.
दुसरीकडे बांगलादेशच्या तस्कीन अहमदने आतापर्यंत दमदार गोलंदाजी केली आहे. सुपर १२च्या लढतीत त्याने ८ विकेट घेतले आहेत. दोन वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. मुस्तफिझुर रहमान आणि हसन मेहमूद यांचा गोलंदाजीतील फॉर्म बांगलादेशसाठी लाभदायक ठरत आहे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्याही वेगवान गोलंदाजांना अनुकूल आहेत. गेल्या तीन सामन्यांत या दोघांचे योगदान लक्षवेधी आहे. बांगलादेशचा संघ अडचणीत असतानाच मुस्तफिझुरला चांगली कामगिरी करण्यात यश आले आहे.
वेळ : दुपारी १.३० वाजता
ठिकाण : अॅडलेड, ऑस्ट्रेलिया