मुंबई : तामिळनाडूतील होसूर येथे असलेल्या टाटा समूहाच्या प्लांटमध्ये पुढील १८ ते २४ महिन्यांत ४५ हजार महिला कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाईल. (Tata group will give jobs to 45 thousand women) या प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना १६ हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. याशिवाय राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. या महिलांच्या शिक्षणाचा खर्चही टाटा समूह उचलणार आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कारखान्यात सध्या १०,००० कामगार आहेत. आणि त्या बहुतेक महिला आहेत. होसूर येथील टाटा समूहाचा कारखाना ५०० एकरांवर पसरलेला आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, आदिवासी समाजातून आलेल्या ५,००० महिलांना या प्लांटमध्ये नोकऱ्या मिळाल्या.
काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात मोबाईलचे उत्पादन होत नव्हते, पण आता जवळपास २०० मोबाईल कंपन्या भारतात त्यांचे फोन तयार करत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात मोठी मोबाईल फॅक्टरी भारतात आहे, जी फक्त सॅमसंगची आहे.
देशात मोबाईलचे उत्पादन होत असले तरी त्याचे सुटे भाग आणि कच्च्या मालासाठी चीन किंवा तैवानवर अवलंबून राहावे लागते. आता टाटा समूह ही साखळी तोडण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, या संदर्भात टाटा समूहाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा अॅपलने अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.