समाजाचा आणि कुटुंबाचा महत्त्वाचा घटक असणाऱ्या महिलेकडे खरं तर पुरुषाइतक्या सर्व क्षमता असतात. आवश्यकता असते तिला बालवयातच तिच्या क्षमतांची ओळख करून देण्याची. विशेषतः आर्थिक दुर्बल तसेच वंचित गटातील महिला किंवा बालिकांना त्यांच्यातील क्षमतांचा विकास आणि आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. तो मिळाला, तर या महिला सक्षम होऊन केवळ स्वतःचाच नाही, तर कुटुंबाचा आधार बनू शकतात. याच हेतूने २००० साली तेजस्विनी सेवा समिती या संस्थेची यवतमाळ येथे स्थापना करण्यात आली. २००१ मध्ये या संस्थेने तेजस्विनी बालिका छात्रावास सुरू करून हा हेतू साध्य करण्याचा प्रवास सुरू केला. यवतमाळ जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख बनली आहे. छात्रावासात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींना प्राधान्य दिले जाते. आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या मुली यवतमाळ इथल्या या बालिका छात्रावासामध्ये अत्यंत सुरक्षित वातावरणात शिक्षण घेत आहेत. यातल्या कुणाच्या तरी वडिलांनी आत्महत्या केली आहे, एखादीला आई नाही, एखादीचे आई-वडील दोघेही निवर्तले आहेत, तर एखादीच्या घरी १८ विश्वे दारिद्र्य आहे. परिस्थिती कशीही असो या मुलींचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न या छात्रावासात होत आहेत. या मुलींच्या दुःखाने होरपळून न जाता मनातला आशेचा अंकुर हिरवा ठेवण्याचं काम छत्रावास करत आहे. हेच अंकुर रुजवण्याचं काम आज आपण जाणून घेणार आहोत.
गरीब परिस्थितीतल्या अशा मुलींना शिक्षण घेण्याची इच्छा असते. पण या मुलींना एक, तर कामाला लावलं जातं किंवा लहान वयातच त्यांचं लग्न करून दिलं जातं, हे लक्षात आल्यानंतर अशा मुलींसाठी काहीतरी करावं, केवळ शिक्षणच नाही, तर त्यांच्या राहण्या-खाण्या-पिण्याची व्यवस्था त्याशिवाय त्यांना चांगले संस्कार आणि स्वतःच्या पायावर उभे राहता येऊ शकेल, अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यावसायिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने हे काम सुरू केले. सर्वसामान्य घरातल्या संसारी महिला चातुर्मासात काही ना काही व्रत करतात, यामध्ये सवाशिणीला घरी बोलवून जेवण, शनिवारी एखाद्या छोट्या मुलाला बोलवून जेवण अशा प्रकारचं छोटं-मोठं दान आपण या काळात करत असतो. राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या सुलभाताई गौड व त्यांच्या मैत्रिणींनीही चातुर्मासात व्रत हाती घेतले होते, पण ते सत्पात्रीदानाचे. त्यांनी यवतमाळजवळच्या आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन कुपोषित बालकांना सकस आहार, कपडे द्यावे, असे ठरवले. त्या आदिवासी पाड्यावर गेल्यावर अन्नदानाचे काम सुरू असताना एक चुणचुणीत आदिवासी मुलगी त्यांच्याजवळ येऊन पुढे उभी राहायची, जवळ बसायची. एकदा सावळी, तेजस्वी अशी चुणचुणीत मुलगी सुलभाताईंना म्हणाली, ‘मावशी, आम्ही आयुष्यभर असंच धुणीभांडी व कष्टाचे काम करत राहायचं का जी? आम्हाला शिक्षण कसं मिळणार?’ अतिशय अज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी मुलांची नावे लिरील, लाइफ बॉय, टायर अशी ठेवली जायची. या मुलीचं नावही तसंच होतं, तिचं नाव बदलून सुलोचना असं ठेवलं आणि तिला शिक्षणासाठी शहरात आणलं गेलं. २००१ साली आलेल्या या मुलींमध्ये सुलोचना शिक्षिका झाली आहे, एक मुलगी रेल्वेमध्ये लागली आहे, एक मुलगी एमबीबीएस झाली आहे.
सुरुवात अशी झाल्यावर हळूहळू खूप हात मदतीला आले. संस्थेच्या कोषाध्यक्षांच्या वडिलांनी त्यांचे घर सुरुवातीला छात्रावास चालवायला दिले. २००१ च्या राखी पौर्णिमेच्या दिवशी तेजस्विनी कन्या छात्रवासाची स्थापना केली अर्थात संस्था स्थापन होण्यापूर्वी सुलभाताई गौड यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला एखाद दुसरी मुलगी आणून स्वतःच्याच घरी तिचं संगोपन करून तिला शाळेत घातले होते. सुरुवातीला नागपूर, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या मुली छात्रवासमध्ये येऊ लागल्या. पहिल्या बॅचला चांगली वागणूक, संस्कार, शिक्षण मिळू लागल्यावर त्यांचे पाहून इतरही मुली येऊ लागल्या. अगदी सुरुवातीला पाच मुलींची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्यातूनसुद्धा खूप मुली येत होत्या. ते पाहून चंद्रपूरलाच शाखा सुरू करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात जास्त प्रमाणात नक्षलवादग्रस्त कुटुंबातील मुलींचा सांभाळ केला जातो. नक्षलग्रस्तांनी त्यांच्या वडिलांना किंवा आईला ठार मारले आहे. अशा अनाथ मुलींना चंद्रपूरच्या छात्रावासात जेवणखाण, शिक्षण देऊन आणि आईच्या मायेने संस्कार देऊन सांभाळ केला जातो. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. छात्रावासात शिवणकाम, विणकाम, संगणकसारखे व्यावसायिक प्रशिक्षणही त्यांना दिले जाते. गीत, संगीत, संगणक, योगा प्रशिक्षण, भजन, गायत्री मंत्र असं संस्कारक्षम प्रशिक्षण प्रत्येकीच्या आवडीनुसार दिले जाते.
मुलींना संरक्षण, सुरक्षितता मिळावी म्हणून संस्था प्रसिद्धीपरांमुख राहते, कारण काही काही मुलींचा दुसऱ्यांना पत्ता लागून देणेही त्या काळी जोखमीचे होते. आज परिस्थिती मात्र खूप बदलली आहे. खरं तर तरुण मुली म्हणजे “हातावर जळता निखारा” असंच म्हटलं जात. दुर्बल घटकातल्या वयात येणाऱ्या मुलींना सांभाळणं, हे अजिबात सोपं काम नाही. पण गेली २२ वर्षे तेजस्विनी हे काम अत्यंत प्रामाणिक आणि निरलसपने करत आहे आणि त्यांना कुठेही आजपर्यंत सुदैवानं वाईट परिस्थितीला तोंड द्याव लागलं नाहीये. सगळ्या मुली वेगवेगळ्या गावांतून, वेगवेगळ्या जाती जमातीतून आल्या आहेत; परंतु इथे कोणीही आपलं गाव किंवा आपल्या जातीचा उल्लेखही करत नाही तसेच कोणताही कमी-जास्तपणा न ठेवता सगळ्या मुली सामुदायिक भावनेने गुण्यागोविंदाने राहतात, असं इथे राहणाऱ्या मुली आवर्जून सांगतात. एखाद्या मुलीला सुरुवातीला शिक्षणाची आवड नसली तरी आजूबाजूच्या मुलींची अभ्यास करण्याची आवड पाहून तिलाही आपणही शिक्षण घेऊन काहीतरी बनावं, अशी इच्छा आपोआप जागृत होते. कदाचित त्यांच्या पाड्यांमध्येच त्या राहिल्या असत्या, तर ती संधी त्यांना कधीच मिळाली नसती.
संचालक मंडळ किंवा इथे शिकवणारे कार्यकर्ते सर्वच जण कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता काम करायला आपणहून येतात. त्याशिवाय स्थानिक दानशुरांची मदतही मिळते. सुरुवातीला यवतमाळमधल्या वेगवेगळ्या भजनी मंडळांना सांगून, एखादं भजनी मंडळ तांदूळ देई, एखादं मंडळ डाळ देई, एखादं मंडळ एका मुलीचा संपूर्ण खर्च उचलते. अशा सामाजिक जाणीव असलेल्या संस्था, व्यक्ती आर्थिक मदत करत असतात.
समाजरूपी परमेश्वरच हे कार्य सांभाळत आहे. आपण फक्त निमित्तमात्र आहोत, अशीच भावना कायम संचालक मंडळाच्या मनात असते. खरं तर कोणती ही संघ विचारी संस्था उभी राहते, ती अशाच प्रकारचा विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, हे संस्थेचं काम पाहून पुन्हा एकदा पटते. आज या छात्रावासात २८ मुली वास्तव्याला असून अगदी इयत्ता पाचवीपासून एम कॉम शिकत असलेल्या मुलीपर्यंतच्या मुली इथे राहून शिक्षण आणि संस्काराने समृद्ध होत आहेत. इथून बाहेर पडलेल्या २०-२१ मुलींची लग्न होऊन त्या उत्तम संसार करत आहेत. सक्षम स्त्री समाजात स्वतःचे आणि कुटुंबाचे स्थान निर्माण करते. कुटुंब चांगलं असलं की, समाज चांगला घडतो आणि समाज चांगला घडला की, आत्महत्यांसारख्या घटना टळू शकतात. ज्या घटना इथे राहणाऱ्या सर्वच मुलींच्या आयुष्यात घडल्या आहेत, त्यामुळे मुली शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, तर त्या आपापल्या कुटुंबांना सक्षम बनवू शकतात, असा विचार घेऊनच छात्रावासाचे काम सुरू आहे. जणू काही सक्षम मातृशक्तीचे निर्माण या शक्तिपीठातून होतं आहे.
छात्रावासाची आता स्वतःची इमारत उभी राहत आहे. भविष्यात या मुलींच्या आईंना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांनाही स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. जनसेवा फाऊंडेशन म्हणून संस्था आहे. त्यांच्या सहयोगाने या महिलांना छोटे-छोटे व्यवसाय सुरू करून देत आहेत. त्याची सुरुवातही झाली आहे. ग्रामीण भागात छोट्या-छोट्या गावखेड्यात तसेच पाड्यात कासार बांगड्या घेऊन घरोघरी जातात आणि बांगड्या विकतात. हेच काम स्थानिक महिलांना जमेल आणि त्या ते आनंदाने करतील, हे लक्षात आल्यावर काचेच्या बांगड्या तसेच त्याबरोबर महिलांच्या गरजेच्या छोट्या-मोठ्या वस्तू विक्री करण्याचा व्यवसाय २०-२५ महिलांना सुरू करून दिला आहे. या सर्व महिला छात्रावासात राहणाऱ्या मुलींच्या आई आहेत. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांच्या हस्ते काही महिलांना चक्की, शेवयांची मशीन अशी साधने उपलब्धही करून दिली आहेत.
एक स्त्री सक्षम, आत्मनिर्भर, सुशिक्षित झाली की, संपूर्ण घर सुशिक्षित होते. घर सुशिक्षित झालं की, समाज सुशिक्षित होतो. समाज सुशिक्षित झाला की, गाव सुशिक्षित होते आणि गाव सुशिक्षित झाला की, देश सुशिक्षित आत्मनिर्भर, सुसंस्कारी होतो. हाच विचार घेऊन समिती काम करत आहे. राष्ट्र सेवा समितीचा विचार घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दुर्बल, वंचित घटकातल्या महिला, त्याही आत्महत्याग्रस्त शेतकाऱ्यांच्या कुटुंबातल्या माहिलांचा विचार करून ही संस्था उभी केली आहे. समितीच्या विचाराचं हे फलित आहे, असे म्हणता येईल.
-शिबानी जोशी