निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांची श्री स्वामी समर्थांवर अनन्य निष्ठा व भक्ती होती. श्री स्वामींचे व त्यांच्यासमवेत असलेल्या सेवेकऱ्याचे मनोभावे साग्रसंगीत आगत-स्वागत करताना त्यांना मोठी धन्यता वाटत असे. श्री स्वामींचे चार-चार दिवस शाही आगत-स्वागत ते करीत असत.
असेच एकदा नळदुर्ग गावी श्री स्वामी समर्थ सुमारे दोनशे सेवेकऱ्यांसह आले. तेव्हा भाऊसाहेबांनी चोळप्पाकरवी श्री स्वामी समर्थांची प्रर्थना केली की, आमच्या निलेगावी येऊन ती भूमी महाराजांनी पुनीत करावी. तेव्हा भाऊसाहेबांच्या मनातील भाव जाणून ते म्हणाले, ‘शनिवारी येऊन जा.’ श्री स्वामींनी जेव्हा जेव्हा त्यांच्या एखाद्या वचनाला जोडून ‘जा’ म्हटले आहे, तेव्हा निश्चिंत राहा. ती घटना घडणारच, असा अर्थ होतो. त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ नळदुर्ग गावी गेले असता, भाऊसाहेबांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
‘तांदळाचे तीन दाणे खाली पडले.’ ते प्रसाद समजून तांदळाचा एक दाणा जहागीरदाराने स्वतः व उरलेले दोन दाणे बायकोस खाण्यास दिले. त्या जहागीरदारास संतान नव्हते. श्री स्वामींना त्याने वा त्यांच्या पत्नीने या अगोदर ‘संतान नसल्याचे’ कधीच सांगितले नव्हते. श्री स्वामींचे शाही आगत-स्वागत आणि षोड्शोपचारे साग्रसंगीत पूजा करताना त्यांचा तसा उद्देशही नव्हता. तरीही श्री स्वामींच्या कपाळावर लावलेल्या तांदळाच्या अक्षतांतील तांदळाचे तीन दाणे खाली पडतात काय? ते उचलून महाराज जहागीरदारांच्या पदरात टाकतात काय? तो त्यातील एक व पत्नीस दोन दाणे देतो काय? यातील घटनाक्रमाचा मथितार्थ नीट समजावून घ्या. हे सारेच अचंबित करणारे आहे.
चोळप्पाकरवी संतानप्रप्तीच्या संबंधी त्यांनी नंतर प्रर्थना केली. पण तत्पूर्वीच श्री स्वामींचे त्यांच्या भक्ताच्या संततीबाबत केवढे हे नियोजन होते. किती ती त्यांनी भक्तवत्सलता. पुढे यथावकाश त्या तीन तांदळाच्या दाण्याचे फलित म्हणून भाऊसाहेबांस एक मुलगा व दोन कन्या अशी तीन अपत्ये पाच वर्षांच्या कालावधीत झाली. भाऊसाहेबांनी खाल्लेल्या एका दाण्याचा मुलगा, पत्नीने खाल्लेल्या दोन दाण्यांच्या दोन कन्या. साधारण उपासकास अल्प स्वल्प कमी वेळेतील सेवेत खूप मोठी फलप्रप्ती हवी असते. आपण सत्कर्माच्या रूपाने श्री स्वामींस इच्छित असलेला दानधर्म वा अन्य सेवा करतो का? आपले देणे थोडे आणि घेणे मोठे असते, हेच आपले चुकते. भाऊसाहेब जहागीरदारांनी दानधर्म सेवेचा डोंगर उभारला होता. नंतर स्वतः स्वामींकडे प्रत्यक्ष नव्हे तर चोळप्पाकरवी प्रर्थना केली होती. आपण असे काही करतो का? उपासनेत तितीक्षा-प्रितक्षा-निरपेक्षता महत्त्वाची असते. परमेश्वरास सर्व अगोदरच समजते. योग्य वेळी तो आपल्या पदरात काहीना काही टाकतोच, हे लक्षात ठेवावे.
– विलास खानोलकर