Tuesday, April 29, 2025
Homeकोकणरत्नागिरीखो-खोच्या महाराष्ट्र संघाचे नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याच्या तिघांकडे

खो-खोच्या महाराष्ट्र संघाचे नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याच्या तिघांकडे

साक्षी लिंगायत, मृण्मयी नागवेकर आणि अथर्व गराटे करणार नेतृत्व

रत्नागिरी (प्रतिनिधी) : फलटण (जि. सातारा) येथे होणाऱ्या ३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्याच्या साक्षी लिंगायत, मृण्मयी नागवेकर आणि अथर्व गराटे करणार आहेत. रत्नागिरीतील शिर्के प्रशालेचे क्रीडा शिक्षक विनोद मयेकर यांची मुलांच्या संघ व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे.

रत्नागिरी येथे मागील आठवड्यात झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने पाचवे तर मुलींच्या संघाने तिसरे स्थान पटकावले. या निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला. मुलींच्या गटामध्ये साक्षी लिंगायत, मृण्मयी नागवेकर यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उस्मानाबाद विरुद्ध तर उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाणे विरुद्ध चमकदार कामगिरी केली.

उस्मानाबादविरोधात साक्षीने उत्कृष्ट संरक्षण करत रत्नागिरीला विजय मिळवून दिला होता. मुलांच्या गटामध्ये उपांत्यपूर्व फेरीमध्ये पुणे विरुद्धच्या सामन्यात अथर्व गराटेने अष्टपैलू कामगिरी केली होती. रत्नागिरीला पराभवाचा सामना करावा लागला; मात्र अथर्वची खेळी महत्त्वपूर्ण होती. त्याच जोरावर महाराष्ट्र संघात त्यांची वर्णी लागली. दोन्ही संघाचे सराव शिबीर फलटण प्रफुल्ल हाटवटे आणि अमित परब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होते. तसेच महाराष्ट्राच्या मुलांच्या संघ व्यवस्थापकपदी विनोद मयेकर यांची निवड झाली आहे. ते नुकतेच फलटण येथे रवाना झाले आहेत. साक्षी आणि मृण्मयी या शिर्के प्रशालेच्या विद्यार्थीनी असून अथर्व हा फणसवणे (ता. संगमेश्वर) येथील खेळाडू आहे.

निवड झालेले खेळाडू २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुल, घडसोली येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंचे पालकमंत्री उदय सामंत, राज्य क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किरण उर्फ भय्या सामंत, रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, राज्य असोसिएशनचे माजी सचिव संदीप तावडे, जिल्हा सचिव प्रशांत देवळेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे, प्रसाद सावंत यांच्यासह खो खो असोसिएशन, शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -