राजापूर (वार्ताहर) : लम्पी रोगामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले असताना तालुका पंचायत समिती पशुधन विभागाकडून लसीकरणाबाबत खोटी आकडेवारी प्रसारीत करण्यात येऊन शासन आणि जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप राजापूर तालुका भाजप अध्यक्ष अभिजीत गुरव यांनी केला आहे. याबाबतचे लेखी पत्र गटविकास अधिकारी यांना देऊन याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
सध्या सर्वत्र गुरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र राजापूर तालुक्यात बहुतांशी गावात हे लसीकरण झालेले नसताना तालुका पशुधन अधिकारी डॉ. कदम यांनी राजापूर तालुक्यात सगळ्यात जास्त लसीकरण झाल्याचा दावा केला आहे. याबाबत गुरव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राजापूर शहरानजीक असलेल्या कोदवली व अन्य गावांत अशा प्रकारची कोणतीही लसीकरण मोहीम राबविली गेली नसल्याचे गुरव यांचे म्हणणे आहे. कोदवली हे हाकेच्या अंतरावर असलेले गाव असून जर या गावात अद्यापही लसीकरण झाले नसेल, तर तालुक्याच्या दुर्गम भागात हे अधिकारी कधी पोहचले? असा सवाल गुरव यांनी उपस्थित केला आहे. तालुका पशुधन विभागाकडून लसीकरणाबाबत केला जाणारा दावा आणि आकडेवाडी बोगस असल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे.
लम्पीसारखा आजार पसरून शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले असताना खोटी आकडेवारी देऊन शासन व जनतेची फसवणूक केली जात असेल तर ती गंभीर बाब असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गुरव यांनी केली आहे.