रत्नागिरी (प्रतिनिधी) : वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी प्रभावी ठरलेल्या जपानी मियावाकी तंत्राचा जिल्ह्यातील पहिला प्रस्ताव बनवण्यात आला असून नाणीज-खानू देवराईजवळ सुमारे १० गुंठे जागेवर देशी-विदेशी नाही, तर स्थानिक प्रजातीची झाडे लावण्यात येणार आहेत.
१६ लाखांचा हा प्रस्ताव असून सामाजिक वनीकरण विभागाने तो मंजुरीसाठी प्रशासनाला सादर केला आहे. कमी जागेत घनदाट जंगल उभारण्याची ही पद्धत आहे. ही झाडे एकमेकांशी स्पर्धा करत असल्याने तेथे दाट झाडी तयार होते.राज्यात मुंबईसह जालना, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नांदेड जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर जपानी मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून घनदाट वृक्षलागवड करण्यात आली आहे.
नाणीज-खानू येथे दहा गुंठे जागेवर मियावाकी पद्धतीचा घनदाट जंगलाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला आहे. मात्र अजून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. १६ लाखांचा हा प्रस्ताव असून, प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.