रोहित गुरव
सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचा माहोल चांगलाच रंगलेला आहे. गुरुवारचा दिवस तर क्रिकेट चाहत्यांसाठी लक्षात राहणारा असाच होता. कसाबसा सुपर-१२ मध्ये प्रवेश केलेल्या झिम्बाब्वेने तगड्या पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. या उलटफेरची चर्चा क्रिकेट विश्वात अधिकच रंगली. हा पराभव इतका जिव्हारी लागला की, नाराज झालेल्या पाकच्या खेळाडूंना रडू अनावर झाले.
मुळात पाकिस्तानच्या या निराशाजनक कामगिरीआधी अलीकडच्या काळातील त्यांच्या प्रवासावर लक्ष द्यायला हवे. दुखापतीमुळे शाहीन आफ्रिदीला आशिया चषक स्पर्धेला मुकावे लागले होते. पण तरीही तो संघासोबत सावलीसारखा होता. कारण त्यातून सावरलो, तर संघात पुनरागमन होईल किंवा संघाला पाठिंबा असा त्याचा अर्थ असू शकतो. या गोष्टी गुप्त किंवा रणनीतीचा भाग असल्या तरी दुसऱ्या गोलंदाजाची मानसिकता तयार करणे गरजेचे असते. आगामी स्पर्धांचा विचार करून या गोष्टी व्हायला हव्यात. शाहीन शाह आफ्रिदी हा क्लासवन गोलंदाज आहे, यात शंका घेण्यासारखे काहीच नाही. त्याच्या गोलंदाजीत कमालीची विद्वत्ता आहे. त्याचा इन स्वींग भल्याभल्यांच्या नाकात दम आणतो. त्याचा तो उत्साह प्रतिस्पर्ध्यांना गार करतो. सराव सामन्यात तर त्याने एका फलंदाजाच्या अंगठ्याचा वेध घेतला होता. हे सर्व मान्य करण्यासारखे असले तरी कधी तरी त्याला अपयश येणारच, मग त्यावेळी काय? शाहीन आफ्रिदी दुखापतीतून सावरलेला असला तरी अपेक्षित अशी कामगिरी करण्यात स्पर्धेत आतापर्यंत तरी त्याला अपयश आलेले आहे.
एकहाती सामना जिंकवणारा हा गोलंदाज एका विकेटसाठी धडपडतोय. दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्धही त्याच्या विकेटचा दुष्काळ संपला नाही. धावा रोखण्यात म्हणाल, तर त्यातही हवे तसे यश नाहीच. दुसरीकडे कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक सलामीवीर मोहम्मद रिझवान यांचा अनफॉर्म संघाच्या अडचणीत आणखी वाढ करत आहे. या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या दोन्ही लढतीत निराश केले आहे. उसळी घेणाऱ्या, स्वींग होणाऱ्या ऑस्ट्रेलियातील पिचेसवर बाबर, रिझवान ही मॅचविनर जोडी चाचपडतेय. ही दुकली जेव्हा निराश करते तेव्हा पाकिस्तानचा संघ पराभवाच्या खाईत जातो. सध्या सुरू असलेली विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानची कामगिरी त्याचेच प्रतिबिंब आहे. आफ्रिदी, बाबर, रिझवान यांच्यावर कमालीचे विसंबून राहणे पाकच्या अंगाशी आले आहे. त्यांच्या खराब कामगिरीनंतर संघातील अन्य खेळाडूंनीही त्यांची जागा भरून काढली नाही. तशी त्या खेळाडूंना सवयच नाही. कारण तशी फारशी संधीच मिळाली नाही. या तीन खेळाडूंनी एकहाती खेळून ७० टक्के सामना आपल्या बाजूने वळवायचा आणि मग उरलीसुरली कसर अन्य खेळाडूंनी भरून काढायची हे संघाच्या अंगवळणी पडले होते. पण या स्पर्धेत सारे पत्ते उलटे फिरले. या तिन्ही खेळाडूंनी कमालीचे निराश केले. त्यामुळे हा संघ स्पर्धेबाहेर जाण्याच्या वाटेवर आहे. नको तेवढे अवलंबित्व त्यांच्या अंगाशी आले. कोणावर किती विसंबून राहावे, यालाही मर्यादा असतात. त्या ओलांडल्या की, मग कधीतरी फटका हा बसतोच. त्याकरिता त्यांना साथ देणाऱ्या, वेळीच मुख्य जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या खेळाडूंची गरज असते. खेळाडूची क्षमता जरी अधिक असली तरी फिटनेस, माहोल, जबाबदाऱ्यांचे विभाजन यांचाही रोल महत्त्वाचा ठरतो. त्याकडे निवड समिती, संघ व्यवस्थापनाचे लक्ष असायलाय हवे.
दुखापतीचा फटका जवळपास सर्वच संघांना बसला आहे. भारतही त्याच्या तावडीतून सुटला नाही. भारतीय गोलंदाजीची धार जसप्रीत बुमराह, अष्टपैलू रवींद्र जडेजा या बिनीच्या शिलेदारांची दुखापत बीसीसीआयला खुणावत होती. निवड समिती त्याकडे डोळे लावून बसलेली होती. दुखापतीतून सावरणे अशक्य असल्याचे जाणवल्यावर बीसीसीआयने ते मान्य केले आणि पुढच्या तयारीला लागले. त्यामुळे भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांना मानसिकदृष्ट्या जबाबदारी पेलण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. पाक याच्या अगदीच उलट राहिला. त्यांचे विसंबून राहणे अधिकच वाढले आणि पराभवाच्या फेऱ्यातून बाहेर निघणे त्यांच्यासाठी जड झाले आहे. असो आणखीही निर्णायक सामने शिल्लक आहेत. जर-तर वर बरेच अवलंबून आहे. उर्वरित सामन्यांमध्ये तरी पाकला कामगिरी उंचावण्यात यश आले तरी ते स्पर्धेत पुनरागमन करू शकतात. हे सारे मैदानातील कामगिरीवरच अवलंबून असेल. पण सध्या तरी विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानची पुढची वाट बिकट झाली आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…