Tuesday, April 29, 2025

अध्यात्म

अनंतकोटी ब्रह्मांडनायक

सद्गुरू वामनराव पै

परमेश्वर हा आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे व तो इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की आपले जीवन व संपूर्ण वैश्विक जीवन त्यावर अवलंबून आहे आणि इतके असूनसुद्धा आज लोक नास्तिक आहेत. जगप्रसिद्ध सायंटिस्ट स्टीफन हॉकिन्स हा असे म्हणतो की, आपण परमेश्वर मानत नाही. परमेश्वराचे अस्तित्व त्याला मान्य नाही. जग आहे व त्यांत आपण आहोत. त्यापलीकडे काहीही नाही असे विधान तो करतो. तो जरी सायंटिस्ट असला तरी आम्ही त्याच्या सहमत नाही. आमचे म्हणणे असे आहे की, जर जगांत जे काही चाललेले आहे ते तुम्ही बारकाईने पाहिले तर त्यांत सहजसुंदर अशी व्यवस्था, सहजसुंदर अशी रचना, सहजसुंदर अशी योजना आहे. सुंदर अशी सहजता आहे. हे सर्व जे सहज चाललेले आहे ते परमेश्वराच्या अस्तित्वामुळेच चाललेले आहे, हे आपल्या लक्षांत येत नाही. इथे देव म्हणजे कुणी मूर्ती नाही. कुणी व्यक्ती नाही आणि नुसती शक्तीही नाही हे आम्ही अनेक वेळा सांगितलेले आहे. देव म्हणजेच दिव्य शक्ती. या दिव्यत्वाच्या ठिकाणी आनंद आहे. याच दिव्यत्वाच्या ठिकाणी शक्ती आणि ज्ञानही आहे व हे जे ज्ञान आहे ते अथांग आहे. तो आनंदाचा सागर आहे. किंबहुना सागर म्हणणेसुद्धा त्याला मर्यादित करण्यासारखे आहे. त्याच्या ठिकाणची शक्तीसुद्धा अमर्याद आहे. आम्ही परमेश्वराची जी व्याख्या केली ती दोन प्रकारे केली.

एक निर्गुण आणि दुसरी सगुण. निर्गुण व्याख्या अशी केली की देव म्हणजे दिव्य ज्ञान. दिव्य आनंद व दिव्य शक्ती. ही दिव्य शक्ती ज्ञानाचा सागर आहे. आनंदाचा आगर आहे. अशी ही दिव्य शक्ती निर्माण करत नाही पण तिच्याकडून निर्माण होते हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. या दिव्यत्वाच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती दिव्य आहे. या दिव्यत्वाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते दिव्य आहे. या दिव्यत्वाच्या ठिकाणी जो आनंद आहे तो दिव्य आहे. अशी दिव्य शक्ती अनंत कोटी ब्रह्मांडात आहे. आपल्या ऋषिमुनींनी त्याला विनायक असेही म्हटलेले आहे. अनंतकोटी ब्रह्मांडनायक म्हणजेच विनायक असे गणपतीला म्हटलेले आहे. हे जग म्हणजे त्या अनंतकोटी ब्रह्मांडाचा एक छोटासा भाग आहे. अनंतकोटी ब्रह्मांडे ज्याच्या उदरी तो हा हरी असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. एक कोटी व दोन कोटी नव्हे तर अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक हा देव आहे. या अनंतकोटी ब्रह्मांडांमध्ये रचना आहे. योजना आहे, व्यवस्था आहे, शक्ती आहे. ज्ञान आहे व आनंदही आहे. आनंद आहे कशावरून? आज जगांत जे चाललेले आहे तो आनंदाचा उत्सवच आहे हे आपल्या लक्षांत येत नाही. जगांत जे वाईट चाललेले आहे ते आपल्याला दिसते. आपण ते पेपरमध्ये वाचतो. आपल्याला ते अनुभवाला येते. याला कारण कोण तर याला कारण माणूसच आहे. तो आपल्या बुद्धीचा वापर जसा करायला पाहिजे तसा करत नाही. तो आपल्या बुद्धीचा दुरुपयोग करतो म्हणून आज जगांत दुःख आहे. परमेश्वराबद्दलचे अज्ञान हेच सर्व दुःखाला कारण आहे म्हणूनच परमेश्वराबद्दलचे ज्ञान हेच सर्वात महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment