Share

डॉ. सुकृत खांडेकर

अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावर गांधी परिवाराच्या बाहेरील नेत्याची निवड झाली हीच या पक्षाच्या दृष्टीने मोठी घटना आहे. एकशे सदतीस वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या या ग्रँड ओल्ड पार्टीला पू्र्णवेळ अध्यक्ष मिळाला. देशात मोदी लाट निर्माण झाल्यापासून गेली आठ वर्षे काँग्रेसची सर्वत्र घसरण चालू आहे. गांधी परिवाराचे वारस असलेले राहुल गांधी हे गेल्या पन्नास दिवसांपासून भारत जोडो पदयात्रेत गुंतले आहेत. पक्षाचा जनाधार वेगाने घटत असताना पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा मुकुट परिधान करणे हे खर्गे यांना मोठे आव्हान आहे. ऐंशी वर्षांच्या खर्गे यांच्या पंचावन्न वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील सर्वात मोठा कसोटीचा काळ आता सुरू झाला आहे. के. कामराज यांच्यापासून सीताराम केसरी यांच्यापर्यंत नेहरू-गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्षांना पदावरून कसे पायउतार व्हावे लागले, हा सर्व विचित्र अनुभव आहे. खर्गे हे गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू आहेत व त्यांचे आशीर्वाद घेऊनच अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका वाड्रा यांच्या रिमोटवरच त्यांना पक्षाचे सुकाणू हाकावे लागणार आहे.

सन २०२२ मध्ये झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७८९७ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांना १०७२ मते पडली. यापूर्वी १९९७ मध्ये झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी यांना ७४६०, शरद पवार यांना ८८८, तर राजेश पायलट यांना ३५४ मते मिळाली होती. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत सोनिया गांधी यांना ७४४८ मते मिळाली होती व त्यांच्या विरोधात लढलेल्या जितेंद्र प्रसाद यांना केवळ ९४ मतांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली. गेल्या १३७ वर्षांत पक्षाच्या अध्यक्षपदासाठी केवळ सहा वेळाच निवडणुका झाल्या. इतर वेळी सर्व संमतीने अध्यक्षांची निवड झाली. ज्या सहा वेळा निवडणुका झाल्या, त्यात पाच वेळा निवडणूक जिंकणारे नेहरू-गांधी परिवाराच्या बाहेरील नेते होते. १९३९ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पट्टाभी सीतारामय्या यांना पराभूत केले. १९५० मध्ये पुरुषोत्तमदास टंडन यांनी आचार्य कृपलानी यांना निवडणुकीत हरवले. १९७७ मध्ये के. ब्रह्मानंद रेड्डी यांनी सिद्धार्थ शंकर रे आणि करण सिंह यांचा पराभव केला. १९९७ मध्ये सीताराम केसरी यांनी शरद पवार व राजेश पायलट यांना हरवले. सन २००० मध्ये सोनिया गांधी यांनी जितेंद्र प्रसाद यांचा पराभव केला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसचे १७ अध्यक्ष झाले, त्यात गांधी परिवारातील ५ जण होते. बाकी बारा अध्यक्ष हे गांधी परिवाराबाहेरील होते. गेल्या पंचाहत्तर वर्षांपैकी ४२ वर्षे काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची सूत्रे गांधी परिवाराच्या हाती राहिली. तेहतीस वर्षे गांधी परिवाराच्या बाहेरील नेत्यांकडे अध्यक्षपदाची खुर्ची राहिली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पट्टाभी सीतारामय्या १९४८-४९, पुरुषोत्तमदास टंडन १९५०, जवाहरलाल नेहरू १९५१-५४, यूएन ढेबर १९५५-५९, नीलम संजीव रेड्डी १९६०-६३, के. कामराज १९६४-६७, एस. निजलिंगप्पा १९६८-६९, बाबू जगजीवनराम १९७०-७१, डॉ. शंकर दयाळ शर्मा १९७२-७४, देवकांत बारूआ १९७५-७७, इंदिरा गांधी १९५९, १९७८-८४, राजीव गांधी १९८५-९१, पी. व्ही. नरसिंह राव १९९२-९५, सीताराम केसरी १९९६-९८, सोनिया गांधी १९९८-२०१७, राहुल गांधी २०१७-१९. नंतर खर्गे यांची निवड होईपर्यंत हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी. गेली २२ वर्षे सोनिया गांधी याच अध्यक्ष राहिल्या होत्या.

सन १९९८ मध्ये सोनिया गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या आणि पुन्हा राजवंश व वंशवादाला तोंड फुटले. देशात विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून राजकारणात जोरदार वादंग निर्माण झाला. शरद पवार, पी. ए. संगमा व तारिक अन्वर यांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून बंडाचा झेंडा फडकवला. त्याचा परिणाम शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. सोनिया गांधींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या पक्षाच्या अध्यक्षपदाच्या दावेदार म्हणून आल्या नव्हत्या. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या स्टार प्रचारक अशी त्यांची भूमिका होती. मात्र त्यावेळी पक्षाचे अनेक नेते सीताराम केसरी यांनी सोनिया गांधींसाठी अध्यक्षपदाची खुर्ची खाली करावी म्हणून दबाव आणत होते. निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यामुळे ऐंशी वर्षे वयाच्या केसरी यांनी अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे या मोहिमेला जोर चढला. पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेतून आपण अध्यक्ष म्हणून निवडून आलो आहोत, त्यामुळे आपल्याला आपली मुदत संपेपर्यंत कोणी अध्यक्षपदावरून हटवू शकत नाही, असा तर्क सीताराम केसरी मांडत राहिले. केवळ अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) यांच्या भविष्याविषयी निर्णय घेऊ शकते याची त्यांना कल्पना होती. एआयसीसी त्यांना अध्यक्षपदावरून हटविणार नाही, अशा ते समजुतीत ते शेवटपर्यंत होते.

दरम्यान काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठक बोलावली गेली. कार्यकारिणीचे काही वरिष्ठ सदस्य अगोदरच स्वतंत्रपणे एकत्र बसले व त्यांनी तयार केलेले दोन प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आले. पहिल्या प्रस्तावात सीताराम केसरी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असे म्हटले होते व दुसऱ्या प्रस्तावात सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारावे, अशी आग्रही विनंती केली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला केसरी पोहोचले तेव्हा केसरी यांनी पक्षाध्यक्ष म्हणून केलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार व्यक्त करणारा प्रस्ताव प्रणव मुखर्जी वाचू लागले. आपल्या विरोधात फार मोठे कारस्थान रचले गेले आहे हे केसरी यांच्या लक्षात आले. पण त्या क्षणाला ते काहीच करू शकले नाहीत. मात्र त्यांनी स्वत:च्या अधिकारात कार्यकारिणीची बैठक त्वरित स्थगित केली व त्या खोलीतून ते बाहेर पडले.

सीताराम केसरी हे बाथरूमध्ये गेले असताना त्यांना तेथेच कार्यकर्त्यांनी कोंडून ठेवले, असे वृत्त दिल्लीच्या काही वृत्तपत्रांत त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. एवढेच नव्हे तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्कीही केली. दरम्यान पक्षाच्या उपाध्यक्षांनी कार्यकारिणीची बैठक पुन्हा बोलावली व दुसरीकडे सोनिया गांधी यांना दहा जनपथवरून काही ज्येष्ठ नेत्यांनी २४ अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयात बोलावून आणले. सोनिया गांधींच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या गेल्या, फटाके फोडण्यात आले, मिठाई वाटली गेली, सोनियांना नव्या अध्यक्षा म्हणून शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. जेव्हा केसरी हे बंद खोलीतून बाहेर आले तेव्हा त्यांचे त्यांच्या कार्यालयावरील नावही काढून टाकले होते, त्या जागेवर सोनिया गांधी : काँग्रेस अध्यक्ष अशी पाटी झळकत होती. १९९८ पासून २०१७ पर्यंत सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. नंतर लगेचच राहुल गांधी अध्यक्ष झाले.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पुन्हा दारुण परभव झाल्यानंतर राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सोनियांकडे हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रे सोपविण्यात आली. तब्बल २४ वर्षांनी गांधी परिवाराच्या बाहेरील नेत्याची काँग्रेसचे अध्यक्षपदावर निवड झाली आहे. खर्गे हे काँग्रेसला संजीवनी देऊ शकतील का, पक्षाच्या कारभाराला गती मिळू शकेल का, खर्गे यांना स्वातंत्र्य मिळेल का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत. हिमाचल प्रदेश व गुजरात पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुका ही त्यांची पहिली परीक्षा ठरेल. २०२३ मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आदी १० राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. नंतर २०२४ लोकसभा निवडणूक आहे. वयाच्या मानाने त्यांना काँग्रेसचे धनुष्य पेलवेल का?

sukritforyou@gmail.com

sukrit@prahaar.co.in

Recent Posts

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

33 minutes ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

39 minutes ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

46 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

52 minutes ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

54 minutes ago

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

1 hour ago