Tuesday, November 12, 2024
Homeअध्यात्मपरमेश्वराची खरी पूजा

परमेश्वराची खरी पूजा

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. ‘मी साधन करतो’ असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो. हा साधनाभिमानही घातुक असतो. तेव्हा जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानीत जावे. आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते आणि तो सर्व तुमच्या बऱ्याकरिताच करीत असतो. तेव्हा कसलीही काळजी करू नये. त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे, चित्तवृत्ती परमेश्वराकडे लावावी. तेथून ती विषयाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधावी; म्हणजे त्यावर लक्ष असावे. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल. ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते. सर्वांभूती भगवद्भाव आणि कोणाचे मन न दुखविणे, ही पूजा खरी होय. पूजेला बाह्योपचाराची गरज नसते. मन मात्र अर्पण होणे जरूर आहे. पूजेत भाव असणे जरूर आहे.

भक्ती आणि वैराग्य यांच्यामध्ये तसा फरक नाही. परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य. रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले. त्या वेळी तिने उत्तर दिले की, ‘रामा! तुझ्याबरोबर असेन तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय असेन तर सर्व सुखोपभोग हे मला कष्टमय आहेत.’ सीता ही रामाची मोठी भक्त होती आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट अशी नाही. आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा; तो हा की, आपण म्हणावे, ‘रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे.’ असे आपण मनःपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल.

‘माझ्या देवाला हे आवडेल का?’ अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तसतशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते. सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे; ते कुठेही प्रकट होऊ शकेल. त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध, म्हणजे निःसंशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे; त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -