
जव्हार (वार्ताहर) : तालुक्यात आदिवासी आणि ग्रामीण भागामध्ये वृक्ष संवर्धनावर आधारित अनेक व्यवसाय केले जातात. त्यात पानांपासून पत्रावळी आणि सिंदीच्या झाडांपासून लक्ष्मीपूजनाकरिता वापरण्यात येणारे झाडू हे अर्थाजनाचे पारंपरिक व्यवसाय आहेत; परंतु गेल्या काही वर्षांपासून सिंदीच्या झाडांची संख्या वर्षानुवर्षे घटत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लक्ष्मीपूजनाकरिता वापरण्यात येणाऱ्या झाडूची संख्या कमी झाल्याने या व्यवसायाला अखेरची घटका लागली आहे.
सणासुदीला महत्त्व असलेल्या सिंदीच्या झाडापासून तयार करण्यात येणाऱ्या झाडूची हळद-कुंकू लावून पूजा केली जाते; परंतु याच व्यवसायाला ग्रामीण भागात घरघर लागली असल्याचे दिसून येत आहे. कारण दिवसेंदिवस सिंदीचे झाड नामशेष होऊ लागल्याने गावात मिळणारी लक्ष्मी आता शहरातील बाजारातून अवाच्या सव्वा भावाने विकत घ्यावी लागत आहे. पूर्वीच्या काळी आदिवासी समाजातील काही व्यक्ती उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने दिवसभर डोंगरात फिरून सिंदीचे झाड शोधून त्यापासून झाडू तयार करून ते बाजारात विकत असत. पण सध्या या झाडांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांनी उत्पन्नाच्या दुसऱ्या पर्यांयांचा शोध सुरू केला आहे.
अशी होते झाडुची निर्मिती
सिंदीच्या झाडाचे फडे कापून वाळवली जातात. त्यानंतर पन्हाळीच्या फड्याची पड विणून ती बांधली जातात. त्यानंतर तिची विरणी करून आकार दिला जातो. पण काळाच्या ओघात ही झाडे दुर्मिळ झाली आहेत. पिढी बदलली, किचकट काम असल्याने याकडे असलेला कल कमी झाला आहे. पूजा करण्यासाठी जव्हार शहरातील बाजारातून सिंदीची झाडू म्हणजेच लक्ष्मी ही ६० ते ७० रुपयांना विकत घेऊन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिची पूजा केली जाते. तालुक्यातील सिंदीच्या झाडांची दिवसेंदिवस संख्या कमी झाल्याने व आत्ताची पिढी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण भागातून हा उदरनिर्वाहाचा व्यवसाय कालबाह्य होत चालला असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.