Friday, April 25, 2025
Homeमहत्वाची बातमीदिन दिन दिवाळी...

दिन दिन दिवाळी…

वैजयंती कुलकर्णी- आपटे

दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी… आली आली म्हणता म्हणता दिवाळी आली सुद्धा. दिवाळी आनंदाचा, उत्साहाचा सण. मनातले नैराश्याचे मळभ दूर होऊन प्रकाशमय वातावरणाचा प्रारंभ. संपूर्ण देशात अगदी कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हा सण उत्साहाने साजरा केला जातो. कारण सगळ्यांचा हा अगदी लाडका सण आहे. सगळं घर आनंदात न्हाऊन निघतं. घराची साफ- सफाई, रंगरंगोटी, नवीन दागिन्यांची खरेदी, कपड्यांची खरेदी, फटाके, आकाशकंदील, पणत्या, दिवे, रांगोळ्या, फराळ, भेटवस्तू, हे सगळं दिवाळीचं वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.

यंदाची दिवाळी ही विशेष आहे. कारण दोन वर्षांच्या कोरोनाच्या भीषण संकटानंतर यंदाची दिवाळी साजरी होत आहे. दोन वर्षे सगळे घरातच होते. कोविडच्या भीतीमुळे आणि सरकारी नियमामुळे ना कुणी घराबाहेर पडत होते, ना कुणी नातेवाइकांना भेटत होते, ना फटाके, ना फराळ, ना भेटवस्तू. त्यामुळे यंदाच्या दिवाळीचा उत्साह वेगळाच आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा तुडुंब गर्दीने भरल्या आहेत. कपडे, फटाके, फराळाचे पदार्थ खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना १० दिवस आधीच पगार मिळाला आहे. त्यामुळे खरेदीचा उत्साह आहे. दुसरीकडे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. दिवाळी पाहाट म्हणू नका, की दिवाळी संध्या, दीपोत्सव म्हणू नका की विविध प्रदर्शने बाजारपेठा. दोन वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सांस्कृतिक कार्यक्रम जोरात सुरू झाले आहेत आणि कोरोनाची भीती संपल्यामुळे प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. अगदी राहुल देशपांडे, महेश काळे यांच्या शास्त्रीय मैफलीपासून ते मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, यांच्यापर्यंत सगळेच गायक कलाकार बिझी आहेत. या आयोजनात राजकीय पक्षही मागे नाहीत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने या सणाचा फायदा अनेक राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत. यामध्ये भाजप आघाडीवर आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार ह्यांनी मुंबईत पाच दिवसांच्या दिवाळी मेळाव्याचे आयोजन केले आहे. ह्यामध्ये नृत्य-संगीताच्या मैफलीबरोबरच अनेक कलाकार हजेरी लावत आहेत, तर प्रेक्षकांनाही लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे मिळत आहेत, तर पारंपरिक वेशभूषेच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. ह्या दीपोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी येथे हजेरी लावली. यानिमित्ताने नवीन राजकीय समीकरणेही उदयाला येत आहेत.

दिवाळी खरी वसुबारसेलाच सुरू होते. त्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करायची असते. हिंदू सणांमध्ये पशू–पक्ष्यांनाही महत्त्व दिले जाते. जसे पोळ्याला बैलांची पूजा करतात, तसेच वसुबारसेला गाय आणि वासराची पूजा केली जाते. त्यांना झेंडूच्या माळांनी सजविले जाते. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गोठ्यात पणत्या लावल्या जातात. अर्थात या दिवसाचे महत्त्व, जितकं ग्रामीण भागात आहे, तेव्हढं शहरात नाही. मात्र अनेक ठिकाणी देवळात जाऊन गाय आणि वासराची पूजा केली जाते. धनत्रयोदशी हा दिवस जसा धन पूजनाचा तसाच आरोग्याचे गुरू धन्वंतरी यांना अभिवादन करण्याचा. आनंदी जीवन जगण्यासाठी जसे धन आणि बुद्धीची गरज वाटते तसेच निरोगी आयुष्याही महत्त्वाचे आहे. म्हणून या दिवशी धन्वंतरी पूजन केले जाते.

नरक चतुर्दशी : या दिवशी श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध करून, त्याच्या बंदिवासातील त्याच्या सहस्त्र कन्यांची सुटका केली, तो हा दिवस. दुष्टांचा नाश आणि मुक्तीचा आनंद. या दिवशी सूर्योदयापूर्वी सुगंधी तेल आणि उटणं लावून अभ्यंग स्नान केले जाते. नवीन वस्त्र परिधान करून देवदर्शन केले जाते.

लक्ष्मी पूजन – दारिद्र्याचा अंधार दूर करून समृद्धीचा दीप लावावा हा संदेश देणारे लक्ष्मी पूजन आश्विन कृष्ण अमावास्या हा दिवस लक्ष्मी पूजन म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मी ही समृद्धीची, संपदेची देवता मानली जाते. संपूर्ण वर्ष आर्थिक सुबत्तेचे जावो म्हणून लक्ष्मीची पूजा करावी, अशी आपली प्रथा आहे. म्हणून या दिवशी घरोघरी, दुकानांत, कार्यालयांत, व्यापाऱ्यांच्या पेढीवर लक्ष्मी पूजन केले जाते. नवीन कपडे आणि अलंकार घालून लक्ष्मीची पूजा केली जाते. प्रसाद म्हणून लाह्या, बत्तासे वाटले जातात.

पाडवा – कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा.साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवसापासून नवे व्यापारी वर्ष सुरू होते. नवे प्रकल्प, नवे उद्योग, नव्या कामाचा शुभारंभ या दिवशी केला जातो. तसेच पती-पत्नीमधील नात्याचा गोडवा जपणारा हा दिवस. ह्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती तिला भेटवस्तू देतो.

भाऊबीज – कार्तिक शुद्ध द्वितीय म्हणजे भाऊबीज, हा सण भावा-बहिणीचे नाते घट्ट करणारा दिवस. या दिवशी भाऊ-बहिणीला भेटायला तिच्या घरी जातो आणि तीही गोड-धोड खाऊ घालून त्याचे स्वागत करते. असा हा पारंपरिक सण असला तरीही आता कालानुरूप त्याचे स्वरूपही बदलायला लागले आहे. यंदा शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळीत अनुभवायला मिळणारी गुलाबी थंडी गायब झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत थंडीत कुडकुडत केलेल्या अभ्यंग स्थानची आठवण आल्याशिवाय राहत नाही. फटाक्यांमुळे प्रदूषण होते, त्यामुळे प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे फटाक्यांची मजा ही नव्या पिढीला अनुभवता येत नाही. पूर्वी आमच्या लहानपणी गदी लवंगी माळा जरी आणल्या तरीही त्या सोडवून एक एक लवंगी फटाका लावण्यात जी मजा होती ती आता नुसती लगड पेटवून येत नाही. फराळाच्या पदार्थाचेही तेच.

एक तर चिवडा, चकल्या, लाडू हे दिवाळीसाठी खास बनवले जाणारे फराळाचे पदार्थ वर्षाचे बाराही महिने बनवले जातात किंवा बाजारातही उपलब्ध असतात. त्यामुळे त्याचे अप्रूप वाटेनासे झाले आहे. पूर्वी मला आठवते, माझी आजी फराळाचे पदार्थ बनवायला घ्यायची, तेव्हा घरातल्या सगळ्या बायका तर मदत करायच्याच, पण शेजार-पाजारच्या बायकाही मदतीला यायच्या. कुणी चकल्या टाळायला, तर कुणी लाडू वळायला आणि सगळ्या वाडीतल्या बायका किंवा चाळीतल्या बायका एकमेकींकडे मदतीला जायच्या. पण आता चित्र बदलले आहे. घरातल्या गृहिणी आता नोकरी करत असल्यामुळे फराळाचे पदार्थ बनवायला तेव्हढा वेळ नसतो. त्यामुळे फराळाचे पदार्थ विकतच आणले जातात. अनेक महिलांचे बचत गत आहेत, तसेच अनेक महिला गृह उद्योग म्हणून फराळाचे पदार्थ बनवून विकतात. असा हा दिवाळीचा सण, भारतीय सणाचा राजा, यंदा मोठ्या उत्साहाने, धूमधडाक्यात साजरा होत आहे. अज्ञानाचा अंधकार दूर करून, प्रकाशाची वाट दाखवणारा, सगळ्यांच्या मनात चैतन्य जगावणारा सण, आपण सगळ्यांनी आनंदात साजरा करूया.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -