डॉ. सर्वेश सुहास सोमण
आपण गेल्या काही लेखांत सांगितल्याप्रमाणे शेअर बाजारात रोलर कोस्टर सुरू होते. मोठ्या मोठ्या प्रमाणात गॅपअप आणि गॅपडाऊन होणे सुरू होते. निर्देशांकानी या महिन्यात जी तेजी दाखवली त्यामध्ये या रोलर कोस्टरचा हातभार लागलेला होता. आपण आपल्या मागील १७ ऑक्टोबरच्या लेखातच निर्देशांकात तेजी होणे अपेक्षित आहे हे सांगितलेले होते. ज्यामध्ये आपण चार्टचा विचार करता निफ्टी पुढील आठवड्यासाठी १७ हजार ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत ही पातळी तुटत नाही तोपर्यंत निर्देशांकात पुन्हा तेजी होणे अपेक्षित आहे. चार्टनुसार १७४०० ही विक्रीची पातळी असून जोपर्यंत निफ्टी ही पातळी ओलांडत नाही तोपर्यंत नवीन मोठी तेजी येणार नाही हे देखील सांगितलेले होते.
आपल्या अंदाजानुसार शेअर बाजारात संपूर्ण आठवड्यात हालचाल झाली. आपण सांगितलेली १७००० ही पातळी न तोडता निर्देशांकानी मोठी तेजी दाखविली. एकूण बघता आपण सांगितल्यानंतर निर्देशांक निफ्टीमध्ये ५०० अंकांची तेजी झालेली आहे. आपण सांगितलेला शेअर “सिप्ला” या शेअरमधील तेजी देखील या आठवड्यात कायम राहिली. सध्या सगळीकडे दिवाळीचे वारे वाहू लागलेले आहेत. दिवाळीला भारतीय शेअर बाजाराला सुट्टी असली तरी त्या दिवशी शेअर बाजार तासभर उघडतो. शेअर बाजारात दिवाळीनिमित्त खास ट्रेडिंग करण्याची परंपरा आहे ज्याला आपण “मुहूर्त ट्रेडिंग” असे म्हणतात. मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान या एका तासात गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक तरी करून या परंपरेचे पालन करतात आणि एक शुभ सुरुवात करतात. या दिवशी ट्रेडिंग हे इक्विटी, फ्युचर्स, ऑप्शन्स, करन्सी आणि कमोडीटी मार्केट या सर्वात होते. यावेळी २४ ऑक्टोबर २०२२ ला हे “मुहूर्त ट्रेडिंग” होणार आहे. या दिवशी संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ पर्यंत मुहूर्त ट्रेडिंग होईल. या आधी संध्याकाळी ६ ते ६.१० पर्यंत प्री-ओपन सत्र असेल. “मुहूर्त ट्रेडिंग” करण्याची प्रथा जवळपास पाच दशकाहून जुनी आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये १९५७ मध्ये आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये १९९२ मध्ये मुहूर्त ट्रेडिंग प्रथा सुरू झाली. बहुतेक लोक या दिवशी शेअर्स खरेदी करायला प्राधान्य देतात. या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग केल्याने समृद्धी येते असे मानले जाते. या दिवशी खरेदी करत असणारे शेअर्स हे दीर्घमुदतीसाठी घेतले जातात. कधी कधी या दिवशी खरेदी केलेले कधीही न विकणारे देखील गुंतवणूकदार आहेत. जे हे खरेदी केलेले शेअर्स पुढील पिढीला हस्तांतरित करतात. नवीन गुंतवणूकदार या दिवशी शेअर बाजारातील आपली नवीन गुंतवणूक शेअर बाजारात करतात. या २०२२ मध्ये मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी निर्देशांकात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. मुहूर्त ट्रेडिंगला शेअर्स खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी एचडीएफसी एएमसी, एचडीएफसी बँक, सनफार्मा, झायडस वेलनेस, टीसीएस, कॅम्स यासारख्या दिग्गज कंपन्यांचा विचार करता येईल.
पुढील आठवड्याचा विचार करता शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित आहे. निर्देशांकात गेल्या आठवड्यापासूनच हा रोलर कोस्टर सुरू आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात देखील सावधानतापूर्वक व्यवहार करणे अत्यंत आवश्यक आहे. चार्टचा विचार करता निफ्टी पुढील आठवड्यासाठी १७३०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे जोपर्यंत ही पातळी तुटत नाही तोपर्यंत निर्देशांकात आणखी तेजी होणे अपेक्षित आहे. पुढील काळाचा विचार करता चार्टनुसार निर्देशांक निफ्टी १८००० या विक्रमी पातळीला गवसणी घालण्याची शक्यता आहे.
मध्यम मुदतीच्या चार्टनुसार अॅक्सिस बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बरोडा, नेस्ले इंडिया यांसह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. कमोडीटी मार्केटचा विचार करता टेक्निकल अॅनालिसिसनुसार या सोन्याची दिशा आणि गती ही अल्पमुदतीसाठी तेजीची झालेली आहे. आता सोन्याची ४९८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे जोपर्यंत सोने या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यामधील तेजी कायम राहील. टेक्निकल चार्टनुसार कच्चे तेलाची दिशा आणि गती ही तेजीची झालेली असून कच्चे तेलाची ६८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी असून जोपर्यंत या पातळीच्या वर कच्चे तेल आहे तोपर्यंत कच्च्या तेलात बाऊन्स होऊ शकतो ज्यामध्ये कच्चे तेल ७३०० पर्यंत वाढ दाखवू शकते.