अर्चना सोंडे
तुमच्या माझ्यासारखीच. आई-बाबांची लाडकी. क्षितिजाला गवसणी घालू पाहणारी. शिक्षणासाठी परमुलुखात गेली. एक वेळ अशी आली की, फरसाण खाऊन अन् पाणी पिऊन दिवस काढावे लागले. मात्र ती डगमगली नाही. तिने व्यवसायाची कास धरली. आजी-आईच्या पारंपरिक मसाल्यांचं उत्पादन करण्यास सुरुवात केली. मात्र सुरुवातीला १५० हून अधिक दुकानदारांनी मसाले ठेवण्यास नकार दिला. पण तिने हार मानली नाही. नव्या उमेदीने कामाला लागली. एका ओळखीच्या दुकानाने सुरुवात केली. हा-हा म्हणता तिच्या कंपनीचे मसाले सातासमुद्रापार जाऊ लागले. आज तिच्या मसाल्याचा ब्रॅण्ड जगभर गाजतोय. जगाला गवसणी घालणारी ही मसाला क्वीन म्हणजे सुगरण मसाले अॅण्ड फूड्सच्या संचालिका उज्ज्वला पवार.
साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये बनपूरी म्हणजे अगदी २००० लोकसंख्या असलेलं एक गाव. या गावातील पवार कुटुंबात उज्ज्वलाचा जन्म झाला. वडील आत्माराम पवार हे मुंबईत माथाडी कामगार संघटनेत मुकादम म्हणून नोकरी करत होते. आई मालन या गृहिणी. दोन बहिणी आणि दोन भाऊ, असं हे सातजणांचं पवार कुटुंब. या ग्रामीण भागातच उज्ज्वलाचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. डोंगराळ भाग असल्यामुळे नव्या काहीच संधी गावात उपलब्ध नव्हत्या. आपण इकडून बाहेर पडायचं अन् पुण्यात येऊन शिक्षण घ्यायचं, असं उज्ज्वलाने मनाशी पक्क केलं. उज्ज्वलाला लहानपणापासून एक सवय होती, ती म्हणजे वाचन. ती पुस्तक वाचत नाही, तर पुस्तक खाते. म्हणजेच तिच्या वाचनाचा वेग प्रचंड होता, असं तिच्याविषयी अनेकजण म्हणतात. कोणताही कागद वाचल्याशिवाय कधी नजरेआड केला नाही. आतापर्यंत तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचं वाचन उज्ज्वलाने केलं असेल.
पुण्यात राहण्यासाठी कुटुंबीयांना समजावून तिने तयार केले. उज्ज्वला पुण्यात राहू लागली. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. पाच मुलांना साभांळणं सोप्पं नव्हतं. फॅशन डिझायनिंगला प्रवेश मिळाला. हा कोर्स करत असताना उज्ज्वलाने एके ठिकाणी नोकरी करायला सुरवात केली. जेणेकरून स्वतःचा खर्च भागवता येईल. फॅशन डिझायनिंग करताना आपल्यामध्ये ती क्रिएटिव्हीटी नाही हे लक्षात आल्यावर तिने शिक्षण अर्ध्यातच सोडून दिलं. ही वेळ आयुष्यामध्ये खूप काही शिकविणारी होती. जवळचे सगळे पैसे संपले होते. एक वेळ तर अशी आली की, फरसाणचा पुडा आणून ठेवला होता. ते फरसाण खाऊन आणि पाणी पिऊन तिने आठ दिवस काढले. या दिवसांत जेवणाचं महत्त्व काय असतं, हे जाणवलं. या काळात काही मैत्रिणी भेटत होत्या. त्यांच्यासोबत बोलताना असं जाणवलं की, काहीतरी कौशल्य शिकलं पाहिजे.
मग ब्युटी पार्लरचा कोर्स करायचं ठरवलं. पुण्यातील ब्युटिक कॉलेज ऑफ ब्युटी या नामांकित महाविद्यालयात तिने या अभ्यासक्रमात पहिला वर्ग प्राप्त केला. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूज झाले. एका मोठ्या सलोनसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. सुरुवातीला कुटुंबीयांनी विरोध केला. तिने त्यांची समजूत काढली. अगदी सहा हजार सातशे रुपये पगारापासून या क्षेत्रात नोकरी तिने करायला सुरुवात केली. मग पुढे ११ वर्षे उज्ज्वला त्या नामांकित संस्थेसोबत राहिली. या दरम्यान उज्ज्वलाने सात पदव्या व १२ वेगवेगळ्या देशांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले. यामुळे ती जगातील ३५ देशांमध्ये कुठेही नोकरी करण्यास पात्र ठरली.
सगळं छान चालू असताना ‘आपल्याला आता काहीतरी वेगळं करायचं आहे. उज्ज्वलाचा एक भाऊ पंकज इथियोपिया या आफ्रिकन देशात नोकरी करत होता. त्याला भारतातून फक्त एक गोष्ट हवी असायची, ती म्हणजे घरी तयार केलेला वर्षभराचा मसाला. काही काळानंतर उज्ज्वला व तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं की, आपण सगळ्यांनी मिळून विकण्यासाठी मसाले बनवले तर…… आजीची-आईची रेसिपी होतीच. हा व्यवसाय करायचा, हे नक्की झालं. २०१८मध्ये ‘घरगुती मसाले’य़ा नावाने व्यवसाय सुरू केला. रेसिपींचा अभ्यास करून मसाले तयार केले. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळे मसाले तयार तर झाले पण त्याला विकायचे कसे? बाजारात स्पर्धक तर खूप होते. शक्यतो नवीन मसाले लगेच कोणी घेत नाही. पुण्यामध्ये संधी शोधायला सुरुवात केली.
सुरुवातीला तब्बल दीडशे दुकानदारांनी मसाले ठेवण्यास नकार दिला. बँकेचं कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला होता. मसाले विकले जात नव्हते. त्याच काळात पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला आणि त्यानंतर कोरोनादेखील आला. या अशा सुलतानी आणि अस्मानी संकटाने उज्ज्वला घायकुतीला आली. दीड लाख मसाल्यांची पाकिटे तशीच पडून राहिली. जवळजवळ तेरा लाखांचं नुकसान झालं. अशा परिस्थितीत उज्ज्वलाच्या डोळ्यांसमोर दोनच पर्याय होते. कंपनी बंद करायची किंवा आपण हे का सुरू केलं होतं? याचा विचार करून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करायची. उज्ज्वलाने दुसरा पर्याय निवडला.
पुण्यातील तुळशीबागेत उज्ज्वलाच्या ओळखीचे एक दुकान होते. सतीश स्टोअर्स. इथल्या अभिमन्यू रकटे यांना मसाल्याविषयी तिने सांगितले. त्यानी मसाले ठेवण्यास परवानगी दिली. सहा पाकिटं सुरुवातीला ठेवले. एका महिन्यानंतर उज्ज्वला विचारण्यास गेली असता मसाले संपले होते. ‘आणखी माल आणून द्या’ दुकानदार अभिमन्यू रकटे तिला म्हणाले. उज्ज्वलाच्या आयुष्यातला हा सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाचा क्षण होता. अशा प्रकारे उज्ज्वलाचा नवीन उद्योजकीय प्रवास या दुकानातून सुरू झाला.
आज हा व्यवसाय नावारूपास आला आहे. ‘सुगरण मसाले अॅण्ड फूडस’ हा ब्रॅण्ड आज जगप्रसिद्ध झाला आहे. ‘सुगरण महाराष्ट्राची… चव आईच्या हाताची’ ही टॅगलाइनसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. सुगरणचे मसाले भारताबाहेर देखील जातात. तर्री मसाला, मालवणी मसाला, काळा मसाला, मिरची पावडर, हळद, शाही गरम मसाला, खडा लसूण मसाला, घरगुती मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, पुलाव मसाला, मटण मसाला या सगळ्या मसाल्यांना प्रचंड मागणी आहे. उज्ज्वलाचे दोन्ही भाऊ पंकज आणि आकाश, बहीण मनीषा सूर्यवंशी व तिच्या दोन्ही मुली पीयूषा आणि सिद्धी. असं संपूर्ण पवार कुटुंब हा व्यवसाय सांभाळतात. बनपुरी गावातील अनेक महिलांना देखील उज्ज्वलाने रोजगार मिळवून दिला आहे.
आपल्या कामावर नितांत प्रेम करा. यश नक्की मिळेल. आपल्या कामामुळे मुली भारावून व्यवसायाकडे वळल्या, तर ते खरं आपलं यश आहे, असं उज्ज्वला पवार यांना वाटतं. आपल्या गावावर आतोनात प्रेम करणाऱ्या उज्ज्वलाला आपलं बनपुरी गाव सुगरण मसाल्यामुळे जगप्रसिद्ध व्हावं, असं वाटतं. वाट्टेल ते कष्ट घेण्याची तयारी, हार न मानण्याची वृत्ती, कल्पकता या साऱ्या गुणांमुळेच साताऱ्याची ही लेडी बॉस आज जगात मसाला क्वीन म्हणून प्रसिद्ध होत आहे.