रमेश तांबे
सुमाच्या घरी दिवाळीची धामधूम सुरू झाली आणि सुमाच्या आनंदाला नुसते उधाण आले. घरादाराची साफसफाई, रंगरंगोटी झाली. आईने फराळासाठीची सर्व खरेदी अगदी मनसोक्त केली. सुमा आणि तिचा भाऊ शौर्य दोघांनी नवे कपडे खरेदी केले. रंगबेरंगी रोषणाईचे आणि कमी आवाजाचे, कमी धुराचे काही फटाकेही सुमाने विकत घेतले. दिवाळी सण तसा मोठा सण. त्यामुळे साऱ्या बाजारपेठा गर्दीने नुसत्या फुलून गेल्या होत्या.
अखेर दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली. घराघरातून तळणीचा, भाजणीचा खमंग वास दरवळू लागला. सुमाच्या आईनेदेखील दोनच दिवसांत लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे आणि शंकरपाळ्या बनवल्या. इतक्या कमी वेळात प्रचंड मेहनत घेऊन आईने चविष्ट फराळ बनवला होता. याचे सुमाला खूपच कौतुक वाटले अन् आपल्या आईचा अभिमानदेखील!
अखेर दिवाळीचा पहिला दिवस उजाडला. सुमा, शौर्य अभ्यंगस्नान आटोपून नवे कपडे घालून तयार झाले. घराच्या बाहेर एक रंगबेरंगी आकाशकंदील टांगला होता. दरवाजे-खिडक्यांवर रंगीत प्रकाश फेकणाऱ्या माळा बाबांनी लावल्या होत्या. सर्वत्र वातावरण आनंदी अन् मजेमजेचे होते.
मग घरात बसून सर्वांनी एकत्रितपणे फराळाचा मनसोक्त आस्वाद घेतला. सुमाने बेसनच्या लाडवावर, तर शौर्यने अनारशांवर ताव मारला. त्यानंतर आई काही कागदी पिशव्यांमध्ये फराळ भरू लागली. पाच-सहा पिशव्या भरून झाल्यावर शौर्य आईला म्हणाला, ‘का गं आई कुणासाठी भरतेस?’ शौर्यच्या प्रश्नावर आई हसत हसत म्हणाली, ‘अरे शेजाऱ्यांना देण्यासाठी!’ तशी सुमा ओरडली ‘का, त्यांनीही बनवला आहे ना… मग का द्यायचा?’ मग बाबाच म्हणाले… ‘अगं सुमा सण उत्सव हे एकट्याने नव्हे, तर सर्वांनी मिळून साजरे करायचे असतात. लोकांनी एकमेकांकडे जावे, फराळाची देवाण-घेवाण करावी, गप्पा गोष्टी कराव्यात यासाठी असतात. यामुळे आपापसात प्रेम, जिव्हाळा वाढतो. एकमेकांच्या चालीरिती समजतात. समाजात एकोपा निर्माण होऊन सर्व लोक सुखी-समाधानी होतात. सगळ्यांच्याच प्रगतीला हातभार लागतो.’ अन् शेवटी बाबा म्हणाले, ‘अगं सुमे दुसऱ्याला काही देण्यात जो आनंद मिळतो ना, त्याला तोड नाही बघ.’ बाबांचे बोलणे ऐकून सुमा काही वेळ नुसतीच शांत बसून राहिली. बाबांचे बोलणे, तर दुसरीत शिकणाऱ्या शौर्यला काहीच समजले नाही! बाबांच्या कानात काहीतरी सांगून आई स्वयंपाक घराकडे वळाली.
संध्याकाळचे सहा वाजले होते. आई-बाबांनी बाहेर जाण्याची तयारी केली. सोबत एक रंगीत कागद गुंडाळलेला भला मोठा बॉक्स होता. आई म्हणाली, ‘शौर्य, सुमा तुम्हाला यायचं का आमच्यासोबत.’ सुमा म्हणाली, ‘आई काय आहे गं या बॉक्समध्ये?’ बाबा म्हणाले, ‘चल आमच्याबरोबर सांगतो तुला सगळं.’
मग घराला कुलूप लावून सर्वजण बाहेर पडले. सगळीकडे रोषणाईची लखलख दिसत होती. फटाक्यांच्या आवाजाने आकाश निनादून जात होते. अनेकजण नवे कपडे घालून मस्तपैकी हिंडत होते. अशा मस्त वातावरणात आई-बाबा आम्हाला कुठे घेऊन चाललेत ते सुमाला कळेना! पाचच मिनिटांत सुमाची उत्तुंग इमारतीची कॉलनी मागे पडली. अन् शहराची झोपडपट्टी दिसू लागली. अगदी अंधारात बुडालेली. दिवाळीच्या कोणत्याही खुणा तिथे दिसत नव्हत्या. ‘बाबा यांची दिवाळी नाही का?’ शौर्यने निरागसपणे विचारले.
मग रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झोपडीपुढे बाबा उभे राहिले, अन् म्हणाले, ‘हे घर आपल्या कॉलनीत साफसफाई करणाऱ्या काकांचं आहे बरं का!’ बाबांनी ‘सुरेश अरे सुरेश’ अशा हाका मारल्या. आवाज ऐकून सुमाच्याच वयाचा एक मुलगा धावतच बाहेर आला अन् म्हणाला, ‘काय काका, काही काम होतं का!’ ‘काम नाही रे. आज दिवाळी आहे ना म्हणून आलोय साऱ्यांना घेऊन तुझ्याकडे!’ बाबा म्हणाले. तसा सुरेश म्हणाला, ‘काका गरिबांची कुठे असते दिवाळी.’ तोच बाबांनी एक भले मोठे पुडके सुरेशच्या हातावर टेकवले अन् म्हणाले, ‘आमच्या सुमा आणि शौर्यकडून तुला ही दिवाळी भेट!’ सुरेश त्या बॉक्सकडे नुसताच बघत बसला अन् त्याच्या डोळ्यांतून टपटप पाणी पडू लागले. तोच सुमा म्हणाली, ‘अरे सुरेश तू मला मित्रासारखाच आहेस, घे ना ती भेट अन् बघ ना उघडून… मलाही बघायचंय त्यात काय काय आहेत ते.’ मग सुरेशने भराभर तो बॉक्स उघडला. त्यात एक शर्ट पॅन्ट, फटाके, आईने बनवलेला फराळ, एक आकाशकंदील शिवाय काही वह्या, कंपासपेटी, रंगपेटी, पेन- पेन्सिली होत्या. एवढ्या वस्तू बघून सुरेश अगदी हरखून गेली. तो आई-बाबांच्या पाया पडू लागला. तोच आई त्याला मिठीत घेत म्हणाली, ‘सुरेश बाळा खूप शिकायचं आणि खूप मजादेखील करायची. तोपर्यंत झोपडीतून सुरेशचे आई-बाबाही आले. त्यांनीदेखील सुमाच्या आई-वडिलांचे खूप आभार मानले. एवढ्या सर्व वस्तू भेट मिळाल्याने सुरेशचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.
सुमा घरी आली. आता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान झळकत होते. आज तिने पहिल्यांदाच देण्यातला आनंद अनुभवला होता. सुमाचे आई-बाबादेखील तिच्याकडे मोठ्या कौतुकाने बघत होते. आज सुमाला तिच्या आयुष्यातला मोठा आनंद गवसला होता आणि हा आनंद ती यापुढे वारंवार मिळवणार होती, याची सुमाच्या आई-बाबांना खात्री होती. खरेच या प्रसंगामुळे सुमाची दिवाळी अधिक गोड झाली एवढे मात्र खरे!