Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाजय-पराजयाचे फुटणार बार!

जय-पराजयाचे फुटणार बार!

टी-२० विश्वचषक स्पर्धेचा आजपासून थरार

रोहित गुरव

मुंबई : क्रिकेट चाहत्यांना कमालीची उत्सुकता असलेला महामेळा अर्थात टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार आज शनिवारपासून रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी येथे यजमान ऑसी आणि त्यांचे शेजारी न्यूझीलंड या दोन तगड्या संघांतील सामन्याने स्पर्धेच्या उद्घाटनाचा बार फुटेल. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी भारतीय संघ सलामीचा सामना खेळेल. उत्साह, यशाचा जल्लोष, अपयशाची निराशा, रोमांचक क्षण अशा वातावरणात पुढील २० दिवस या स्पर्धेचा थरार रंगेल. हे सारे क्षण डोळ्यांत साठवून ठेवण्याकरिता चाहतेही कमालीचे उत्सुक आहेत. त्यामुळे बदलत्या झटपट क्रिकेटच्या या काळात क्रिकेट चाहत्यांकरिता ही स्पर्धा म्हणजे पर्वणीच असेल. ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेला गत टी-२० विश्वचषक उंचावला आहे. मायदेशात होत असलेल्या या स्पर्धेत ऑसींचा संघ यंदाही हा चषक जिंकत सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरतो का? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

अलीकडच्या काळात झटपट क्रिकेटने लोकांच्या मनात घर केले आहे. टी-२० क्रिकेट पाहणारा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या महिनाभरापासून टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या गप्पा आवडीने चघळल्या गेल्या. पात्रता फेरीने काही धक्कादायक अनुभव चाहत्यांनी अनुभवले. त्यामुळे विश्वचषकाचे वातावरण दहा-बारा दिवस आधीच सेट झाले होते. दोन वेळा जेतेपदाचा चषक उंचावून कॅरेबियनच्या वाळवंटातील क्रिकेट जिवंत ठेवणाऱ्या आणि या झटपट क्रिकेटसाठी कायमच पसंतीचे खेळाडू असलेल्या विंडिजला शुक्रवारी अनेपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. पात्रता फेरीतील या अपयशामुळे वेस्ट इंडिजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दरम्यान आज यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. हे दोन्ही संघ सख्खे शेजारी आणि क्रिकेटच्या मैदानात पक्के वैरी असल्याने पहिलाच सामना हायव्होल्टेज होणार यात शंका नाही. स्पर्धेला आणखी रंगत चढेल ती, रविवारच्या भारत-पाक लढतीने. हा सामना विक्रमी चाहत्यांच्या उपस्थितीत होणार हे नक्की. जसजसी स्पर्धा पुढे सरकेल तशी रंगत आणखीच वाढेल.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे तसे झाले आणि पीच ओले झाले, तर त्यावेळची रणनीती, खेळाडूंच्या मानसिकतेतील बदल पाहायला मिळतील. दुबईत झालेल्या २०२१च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला ऑसींकडून पराभवाची चव चाखावी लागली होती. त्या पराभवाचे उट्टे काढून यंदाच्या स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यासाठी किवी उत्सुक आहेत. भारत-न्यूझीलंड सराव सामन्यावर पावसाने पाणी जमा झाल्याने किवींना सराव सामन्याला मुकावे लागले होते. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिलने हे दोघे दुखापतीतून परतण्याकरिता प्रयत्नशील आहेत. दुखापतींचा ऑस्ट्रेलियालाही फटका बसला आहे. स्पर्धेच्या तीन-चार दिवस आधीच त्यांचा यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंग्लिसला स्पर्धेला मुकावे लागले आहे. मॅथ्यू वेड, जोश हेझलवूड, अॅडम झम्पा हे तिन खेळाडू चांगलेच फॉर्मात आहेत. त्यात घरात स्पर्धा होत असल्याने त्याचा फायदा त्यांना नक्की होईल. गेल्या पाच सामन्यांचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाने तीन सामने जिंकले असून किवींनी दोन सामने खिशात घातले आहेत. त्यामुळे शनिवारी किवी आणि ऑसी यांच्यात सलामीच्या विजयाचा बार कोण फोडणार? हे उद्याच कळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -