रवींद्र तांबे
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालू केले आहे. मात्र या महामार्गावर सततचा जनावरांचा वावर असल्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी झाली आहे. तेव्हा या महामार्गावरील पाळीव जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी थोडक्यात घेतलेला आढावा. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६चे चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात चालू आहे. सन २०११ पासून या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असले तरी अगदी संथगतीने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे. मागील अकरा वर्षांत या महामार्गावर अपघातामध्ये आतापर्यंत जवळजवळ १५०० पेक्षा जास्त लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तसेच, काही पाळीव जनावरांचासुद्धा अपघाती मृत्यू झालेला आहे. असेच जर चालले तर उद्या मुंबई, गोवा हा ६६ नंबरचा राष्ट्रीय महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनेल. तेव्हा मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त जनावरांचे मालक करीत नसतील, तर शासन पातळीवर करावा लागेल.
कोकण विभागातून जाणारा मुंबई-गोवा हा ६६ नंबरचा राष्ट्रीय महामार्ग असून त्याचे चौपदरीकरणाचे काम सध्या टप्प्याप्प्प्याने चालू आहे. त्यात मोकाट जनावरांचा रस्यावरील वावर असल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होते. त्यामुळे प्रत्येक दिवशी वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. गाडीने प्रवास करताना दिवसापेक्षा रात्रीची जास्त भीती वाहनचालकांना वाटते. यात दुचाकीवाल्याना कसरत करावी लागते. बऱ्याच वेळा गाडीला जनावरांनी धडक दिल्याचे बोलले जाते, तर अज्ञात वाहनाकडून जनावराला धडक.त्यामुळे जनावराच्या मालकाचे फार मोठे नुकसान होते. याला आळा घालण्यासाठी योग्य ती खबरदारी शासन स्तरावर होणे आवश्यक आहे. तेव्हा वाहनचालकांना जनावरांच्या अडथळ्यातून मुक्त करण्यासाठी शासनाला रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या पाळीव जनावरांचा बंदोबस्त करावा लागेल.
मी १ ऑक्टोबर रोजी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे भ. क. ल. वालावलकर रुग्णालय रोगनिदान व संशोधन केंद्र, डेरवण (सावर्डे), चिपळूण येथे माझे नातेवाईक अॅडमिट असल्याने त्यांना पाहण्यासाठी जात होतो. त्यात बऱ्याच ठिकाणी पाळीव जनावरे रस्त्याच्या मध्यभागी कळपाने बसलेली व उभी असलेली दिसली. त्यामुळे बऱ्याच वेळा गाडी थांबवावी लागली. त्यात चंद्रशेखर हा गाडी चालविण्यात तरबेज असल्यामुळे हळूहळू तो मार्ग काढत पुढे जात होता. असेच जर चालले तर उद्या जनावरांना जास्त धोका आहे. यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. उद्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आणि पाळीव जनावरांचे असेच जर चालले तर जनावरांना अधिक धोका संभवतो. यात रात्रीच्या वेळी बैल व म्हशी दगावल्याचे वर्तमान पत्रात मला वाचायला मिळाले आहे. असे नुकसान शेतकऱ्यांचे होऊ नये म्हणून शासन पातळीवर योग्य ती पावले उचलावी लागतील.
सध्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असून एकेरी-दुहेरी वाहतूक चालू आहे. अशातच पहाटेच्या दाट धुक्यातून गाडी चालविणे अवघड जाते. मात्र त्यातून मार्ग काढीत काढीत पुढे जात असलो तरी रस्याच्या मध्यभागी बैल, गाई व वासरे ही आरामात कळपाने बसलेली दिसतात. तर काही ठिकाणी रस्त्यावर विखुरलेली असून उभी राहून रोहत करताना दिसतात. वाहन जवळ आले तरी बाजूला होत नाहीत. यात जर गाडीवरचा चालकाचा ताबा सुटला तर जनावरांना धोका होऊ शकतो. हे चित्र खेडमध्ये पाहायला मिळाले. इतकेच काय तर एक जनावर गाडीच्या धडकेने ठार झाल्याचे निदर्शनात आले. तेव्हा शासकीय पातळीवर निर्बंध लावण्या अगोदर जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. आज ठीक आहे असे जरी वाटत असले तरी उद्या रस्ता पूर्ण झाल्यावर काय जनावरांना वाचवताना मागून येणारे वाहन पुढच्या वाहनाला धडक देणार हे निश्चित. तेव्हा आतापासून जर आपल्या जनावरांना आळा मालक घालत नसेल, तर स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढे येणे आवश्यक आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे जनावरांच्या मालकांनी आपल्या गुरांची राखण करावी, वेळेवर आपल्या गुरांना आणून गोठ्यात बांधणे म्हणजे गुरे सुरक्षित राहू शकतात. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंती उभाराव्यात. तसेच बाजूने कुंपण घालण्यात यावे म्हणजे गुरे रस्त्यावर जाणार नाहीत. वस्तीतून किंवा वस्तीच्या बाजूने रस्ता जात असेल, तर अशा वेळी स्थानिक नागरिकांनी सहकार्य तसेच पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी जनावरांची सुरक्षाव्यवस्था करण्यासाठी ‘सुरक्षा कवच’ उभे करावे लागेल. त्यात शासनामार्फत योग्य मोबदला देऊन स्थानिक तरुणांची निवड करावी. म्हणजे रस्त्यावर मोकाट फिरणा-या पाळीव जनावरांचा योग्यप्रकारे बंदोबस्त होऊन बिनधास्तपणे वाहनचालक गाडी चालवू शकतात.