दिलीप देशपांडे
दिवाळी येणार. अंगण सजणार. आनंद फुलणार घरोघरी. आमच्या घरी… अन् तुमच्या घरी. सनईच्या सुरात होईल पहाट. अत्तराचे पाणी स्नानाचा थाट, गोड गोड फराळ पंगतीला. आवडती सारी संगतीला. फुलबाज्या झडतील. फटाके फुटतील.. आमच्या घरी अन् तुमच्या घरी… दिवाळी जवळ आली की, बाजारपेठा फुलू लागतात. आताही बाजारपेठा फुललेल्या आहेत रंग, रांगोळ्या, आकाशदिवे, फटाके, फराळाचे पदार्थ, झेंडूची फुले, शेवंतीच्या वेण्या,गजरे, आदी गोष्टींची बाजारपेठेत रेलचेल असते. ती आताही बघायला मिळत आहे. हॉटेल्स, मॉल्स, या ठिकाणी गर्दी बघायला मिळत आहे. रस्ते अक्षरशः वाहू लागले आहेत. दिवाळी म्हणजे आनंदोत्सव. मनाला आनंद यातून मिळत असतो. दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, कपडे खरेदी, वाचनासाठी दिवाळी अंक, एकमेकांच्या गाठीभेटी. दिवाळीनिमित्ताने आणि दिवाळी ही पर्यटन स्थळी साजरी करण्याचे बेत हे सगळं बघायला मिळतं.
साधारणपणे कराष्टमीपासूनच दिवाळीची सुरुवात होते, असे म्हणायला हरकत नाही. कारण त्याच दिवशी अनेक ठिकाणी आणि घरांवर विद्युत रोषणाई आकाशदिवे लावले जातात. लहानपणी आम्ही पण घरीच आकर्षक दिवा बनवत होतो. आता त्या गोष्टीला ४५-५० वर्षांचा काळ लोटला. त्यावेळी बहुतेक ठिकाणी आकाशदिवे हे घरीच बनवले जात होते. पंधरा १५ दिवस आधी हा कार्यक्रम सुरू व्हायचा; परंतु आता बाजारात निरनिराळ्या प्रकारचे आकर्षक आणि त्यात विजेची दिवे लावून मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारात, रंगाचे असतात. त्यामुळे आता शक्यतोवर घरी कोणीच आकाशदिवे बनवत नाहीत. हीच परिस्थिती फराळाची आहे. काही वर्षांपूर्वी घरोघरी चकली, अनारसे, करंज्या, शेव, चिवडा, लाडू, हे पदार्थ महिलावर्ग घरीच बनवायचे. तळणाचा वास असायचा; परंतु आता बदलत्या परिस्थितीत अनेक ठिकाणी हे पदार्थ तयार करून त्याच्या दिवाळीआधी ऑर्डर स्वीकारल्या जातात, तर दुसरीकडे बाजारपेठ फराळाच्या दुकानांची खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल्स उघडलेली असतात व माफक दरात त्याची विक्री होत असते. असे काही बदल काळानुसार होऊन आता घरी दिवाळीचे पदार्थ बनवायची प्रथा पद्धत कमी झाली आहे. अगदी तुरळक प्रमाणात काही महिला ते घरी बनवतात.
दिवाळीचा काळ तसा सहाच दिवसाचा. गोवत्स/वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस पूजा केली जाते. वसुबारस ह्याचा अर्थ – वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची वासरासह पूजा करतात. कडे गाय-वासरू नाहीत ते फोटो ठेवून पूजा करतात. बाजरीची भाकरी व गवाऱ्याच्या शेंगाची भाजी या दिवशी करतात. आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी यमदीपदानही या दिवशी सायंकाळी घराबाहेर चमेलीच्या तेलाचा दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात व दक्षिण दिशेला तोंड करून मंत्र म्हणतात…
।। मृत्युना पाशदंण्डाभ्यां कालेन श्यामया सह ।।
।। त्रयोदश्या दीपदानात सुर्यजः प्रियतां माम ।।
याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो. धनत्रयोदशी नंतर येते-नरक चतुर्दशी. या सणाशी संबंधित नरकासुर वधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान, औक्षण करतात. फटाके फोडतात.
आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते, असा समज आहे. अनेक घरांत श्रीसुक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला अनारसे, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. आपापल्या दुकानात, व्यवसायाचे ठिकाणी, वहीपूजन, करतात. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो.
आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले, असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला औक्षण करते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ व भेटवस्तू देऊन बहिणीचा सत्कार करतो. दिवाळीचा हा पाच- सहा दिवसांचा काळ म्हणजे एक आनंद पर्वणी असते. अशाप्रकारे हे उत्सव-सण हे एकूणच मनाला आनंद देऊनच वर्षभर यातून ऊर्जा उत्साह मिळत असतो. यामागे जसे सांस्कृतिक, धार्मिक अध्यात्मिक महत्त्व आहे तसेच या सर्व उत्सव-सणामागे वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे. म्हणून आपण या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतो. आणि बघा, आपण वर्षभरात हे सर्व पदार्थ खात असतो, परंतु ऐन दिवाळीच्या दिवसात बनवलेल्या चकल्या, शेव, चिवडा, अनारसे, शंकरपाळे, यांची चव काही वेगळीच असते म्हणूनच – नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजनाचे दिवशी अभ्यंगस्नानानंतर चकलीबरोबर चहा, सोबतीला हातात दिवाळी अंक म्हणजेच साहित्यिक फराळही, गुलाबी थंडी, ही मजा काही औरच असते. ती दिवाळीतच अनुभवायला मिळते. ऐन दिवाळीत दिवाळी पहाट, पाडवा पहाट यांसारखे कार्यक्रमाचे आयोजन होते. आताही अनेक मोठ्या शहरांमध्ये त्याच्या जाहिराती वृत्तपत्रांतून आपण वाचतो. मात्र आता येणारी दिवाळी थोडी वेगळी आहे, असं म्हणायला हरकत नाही.