पुणे : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोसायटीच्या सेफ्टीक टँक साफसफाईचे काम करण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या २ कामगारांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता वाघोली येथे ही घटना उघडकीस आली.
वाघोली येथे मोझे कॉलेज रस्ता येथे सोलांसिया नावाची सोसायटी आहे. या सोसायटीच्या परिसरातील चेंबरमध्ये काम करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ६ वाजता नितिन गोंड (४५) आणि सतीशकुमार चौधरी (३५) हे दोन कामगार आले होते. चेंबर साफ करत असतानाच ते गुदमरले आणि ओरडल्याचा आवाज आल्याने तेथे उपस्थित असलेला सोसायटीचा सुरक्षा रक्षक गणेश पालेकराव (२८) हा त्यांना वाचविण्यासाठी गेला. त्यावेळी तो सुरक्षा रक्षक चेंबर मध्ये पडला, अशी माहिती नागरिकांनी “पीएमआरडीए” अग्निशामक दलाला दिली.
त्यानंतर तेथे तत्काळ दाखल झालेल्या जवानांनी चेंबर मधून दोघांचे मृतदेह बाहेर काढले, तर सुरक्षा रक्षकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. त्यानंतर काही काळाने त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. अशी माहिती “पीएमआरडीए” अग्निशामक दलाचे जवान विजय महाजन यांनी दिली.