समर्थ राऊळ महाराज
आबांची भ्रमंती सगळीकडे सुरूच होती. एका ठिकाणाहून पिंगुळीला आले की, लगेच दुसऱ्या गावची फेरी करत असत. एका ठिकाणी महाराज कधीच राहिले नाहीत. आंबोली गावी महाराजांनी मुक्काम केला. महाराज सावंतवाडीला गेले. त्यांच्या मनाची जशी लहर लागेल तसे ते आपला मोर्चा वळवित. सावंतवाडीला गेल्यानंतर ते अचानक दाणोलीला साटमच्या घरी जायचे. व तेथून आंबोली गावच्या प्रवासाला निघत. आंबोलीला गेले की तेथे मंगेशच्या बहिणीकडे ८/८ दिवस मुक्कामाला राहायचे. त्याचप्रमाणे आनंद वेंगुर्लेकर नावाच्या भक्ताकडे राहत. आनंदाच्या रिक्षेमधून बाबांनी खूप प्रवास केला आहे.
लहर लागली तर महाराज आंबोलीहूनच नरसोबाच्या वाडीला जायचे. तेथून परत पिंगुळीला गाडीने परतायचे आणि जर एखादे वेळेस ते क्रोधीत अवस्थेत असले, तर मग सर्वांना शिव्यांची लाखोली द्यायचे; परंतु बहुतकरून ते फिरतीवर असल्यानंतर महाराज कुठे असतील व कुठे जातील याचा थांगपत्ता कुणालाही लागत नसे. असे हे त्रिभुवन संचारी बाबा होते.