Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखखरंच डोंगर पोखरला आहे का?

खरंच डोंगर पोखरला आहे का?

२०४७ पर्यंत भारत संपूर्ण मुस्लीम राष्ट्र करायचे आहे. तसेच अयोध्येतल्या राम मंदिराच्या जागी पुन्हा बाबरी मशीद उभी करण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती नाशिकमध्ये ताब्यात असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या अतिरेकी संघटनेच्या सदस्यांकडून समोर येते, तेव्हा अतिरेक्यांची विषवल्ली या मातीत किती प्रमाणात पेरली गेली आहे, याचा अंदाज येतो. प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान असलेले, अयोध्येचे मंदिरही या अतिरेक्यांच्या डोक्यात आहे, हे ऐकल्यानंतर प्रत्येक हिंदू समाजाच्या मनात चीड निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आली आहे. पीएफआयच्या पाच संशयित सदस्यांना मालेगाव, औरंगाबाद, नांदेड येथून नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याआधी पुणे, कोल्हापूर आणि बीडमधूनही एटीएसच्या पथकांनी छापा टाकून संशयितांना अटक केली. पीएफआयच्या जळगाव, नवी मुंबई, ठाणे, मुंबईच्या कार्यालयांवर व पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवरही छापे घातले आहेत. आतापर्यंत राज्यभरातून २५हून अधिक जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करीत असल्याच्या संशयावरून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आक्रमक पवित्रा घेत देशाबरोबरच महाराष्ट्रातही छापे घातले आहेत.

याआधी मुंबईसह राज्यात देशविरोधी कारवाया झाल्या आहेत. २६/११चा अतिरेकी हल्ला असो, नाहीतर मुंबईत १९९३ पासून घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिका असोत. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेचा हात असल्याचे लपून राहिलेले नाही. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोटसारख्या घटना घडवायच्या आहेत, त्या ठिकाणच्या रेकी करण्याच्या कामाबरोबर, बाॅम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम इथल्या स्थानिक अनेक मुस्लीम तरुणांना देण्यात आल्याचे दिसून आले आहे. या तरुणांचे ब्रेन वॉश करून त्यांना आपला धर्म संकटात असल्याच्या खोट्या संकल्पनेत नेऊन, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या पवित्र मातीत अनेक विघातक कार्य घडविण्यात आले आहेत. सिमी या संघटनेच्या माध्यमातून अनेक मुस्लीम तरुण देशविरोधी कारवायांच्या जाळ्यात सापडले होते. केंद्र सरकारने आधी अनेक संघटनांवर बंदी घातली असली तरी नवीन नावे घेऊन त्यांच्या कारवाया या आजही सुरू असल्याचे पीएफआय या संघटनांच्या माध्यमातून पुढे आले आहे.

राज्यासह देशात देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या पीएफआय या संघटनेच्या सदस्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या सदस्यांचा व्हॉट्सॲॅप ग्रुप सापडला असून या ग्रुपचा अॅडमिन पाकिस्तानात असल्याची माहिती एटीएसच्या चौकशीत पुढे आली आहे. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तानसह, यूएई, अफगाणिस्तान देशांमधील सदस्य सहभागी आहेत. त्यामुळे दहशतवादविरोधी पथक या ग्रुपमधील संदेशांची चौकशी करत आहेत. संशयितांचे संगणक, मोबाइल, हार्डडिस्क, बँकेचे व्यवहार आदी तपासण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे काही संशयित परदेशात जाऊन आले असून, त्यांच्या बँक खात्यांतूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.

पीएफआय या संघटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, तर एक गोष्ट दिसून येते की, सुरुवातीच्या लोकांमध्ये सिमीचे लोक मुख्य पदांवर आहेत. या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा विशेष वाटा होता. पीएफआयचा जन्मही सिमी संपल्यानंतर झाला. सिमी म्हणजेच स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे नाव अनेक बॉम्बस्फोटांमध्ये समोर आल्यावर त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे पीएफआय हा प्रत्यक्षात सिमीचा नवा अवतार मानला जातो. त्याचे संस्थापक सदस्य सिमीचे नेते असून सिमीचे सरचिटणीस ई. एम. रहिमन, सिमी युनिटचे अध्यक्ष ई. अबुबकर आणि केरळमधील प्रोफेसर पी. कोया यांचा समावेश आहे. कोया पीएफआयचा मोठा नेता होता. सिमी स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १९ लोकांमध्ये कोया याचा समावेश होता.

पीएफआय स्वतःचे वर्णन सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय शक्ती आणि चांगल्यासाठी कार्य करणारी संस्था म्हणून करत आहे. मुख्यतः दीन-दुबळ्यांना मदत करण्याचे काम करत असल्याचा ते प्रचार करत आहेत. गोवा, राजस्थान, पश्चिम बंगाल, मणीपूर, आंध्र प्रदेशमधील सामाजिक संस्थांशी निगडीत राहून स्वत:ची प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला आहे. पीएफआयने विद्यार्थी राजकारणात प्रवेश करण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी या वर्षी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये द कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) संघटनाही तयार केली होती. त्यामुळे पीएमआयचे जाळे देशात कोणकोणत्या क्षेत्रांत आहे? या संघटनेने देशाला किती प्रमाणात पोखरले आहे?, हे आता तपासातून पुढे येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -