शिबानी जोशी
राष्ट्रसेविका समितीच्या महिला कार्यकर्त्या समाजातील गरजू, महिलांसाठी विविध भागांत विविध उपक्रम राबवत असतात. महाराष्ट्रातही प्रत्येक जिल्ह्यात समितीच्या सेविका विविध संस्थांच्या मार्फत महिलांच्या उत्थानासाठी खूप कार्य करत आहेत. कोल्हापुरात कार्य सुरू करा, असे समितीतर्फे सांगण्यात आले.
कोल्हापूरच्या सर्वात जुन्या सेविका किशाताई, स्नेहलता फडके यांनी त्यानुसार १९८९ साली काम सुरू केले. समितीची शाखा भरू लागली. या दोघींनी समितीच्या कामात स्वतःला इतके वाहून घेतलं की, पुढे त्यांच्याच नावावरून “कृष्णा स्नेह संवर्धिनी संस्था” असे नाव संस्थेला दिले गेले. त्यांना नलूताई सांगलीकर, कमलताई नामजोशी, शशिकला तेरवाडकर, उषा भिलवडीकर, अनिता परांजपे अशा अनेकजणींनी साथ दिली. त्या सर्वजणी एकत्र आल्या. समितीच्या कार्यक्रमांना फलक, झेंडा, तसबीरी, कागदपत्रे असे सामान जमा होऊ लागले. सर्व सामग्री एकत्र ठेवायला जागा नाही म्हणून मग एकीच्या घरी काही सामान, दुसरीकडे काही समान असे सर्व विभागले जायचे. त्यामुळे स्वतःच्या जागेची गरज भासू लागली. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराजवळ जागा घ्यावी म्हणजे तिचा आशीर्वादही पाठीशी राहिल व संघ कार्यकर्त्यांना देवीचे दर्शनही घेता येईल, या दृष्टीने या सगळ्या सेविकांनी एक छोटे स्वतःचे कार्यालय घ्यायचे ठरवले. समितीच्या सेविकांनी स्वतः आर्थिक सहाय्य देऊन, काही देणगी यातून स्वतःचे कार्यालय स्थापले. तीन खोल्यांचा एक फ्लॅट कार्यालय म्हणून वापरात आणायला सुरुवात झाल्यानंतर विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकिय उपक्रम राबवयाला जागा उपलब्ध झाली. तसेच राष्ट्रसेविका समितीची शाखाही तेव्हापासून भरू लागली.
संस्थेच्या वास्तूत नवरात्रोत्सव समितीचे सर्व उत्सव आणि समितीचे सर्व सणांच्या वेळी त्यात भजन, कीर्तन, व्याख्यान, हादगा असे विविध उपक्रम राबविले जातात.दर वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना पुरस्कार दिला जातो. संस्थेतर्फे आपल्या भागातल्या गरजा पाहून अतिशय आगळी-वेगळी कामे हाती घेतली जातात. कॉलेजमध्ये छेड काढणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाई करून मुलींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणाऱ्या ज्योतिप्रियासिंह आणि वैशाली माने यांनी कोल्हापुरात चांगले काम केले होते. त्यांचे संस्थेतर्फे प्रत्यक्ष जाऊन अभिनंदन करण्यात आले. संस्थेतर्फे फक्त वरवरची नाही, तर गरजू महिलांना थेट मदत केली जाते. एका महिलेला स्वतःच्या घरी राहणे अशक्य झाले होते. तिला एक तरुण मुलगीही होती. तिची गरज लक्षात घेऊन तिला समितीच्या जागेत विनामूल्य राहायला दिलं होते. जवळजवळ अडीच-तीन वर्षे त्या दोघी तिथे राहिल्या होत्या. अगदी त्या मुलीचं लग्नही तिथेच लावून दिले होते. समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर यांच्या जीवनावर “तेज तपस्विनी” ही चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली होती. तिच्या निर्मितीसाठी हातभार लागावा, यासाठी संस्थेने त्या काळात ५० हजारांचा निधी दिला होता. यासाठी सुप्रसिद्ध गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या “फिटे अंधाराचे जाळे” या कार्यक्रमाचा प्रयोग लावून त्या तिकीटविक्रीतून पैसा गोळा केला होता. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २०१४ साली शाहू स्मारक दसरा चौक येथे भव्य कार्यक्रम साजरा केला. किसाताई ठाकूर यांचे २०१४ हे २५वे स्मृतिवर्ष तसेच संस्थेचेही हेच रौप्य महोत्सवी वर्ष हा दुग्धशर्करा योग साधून स्त्रियांना स्वावलंबी बनवून स्त्रीशक्तीचा विधायक अविष्कार घडवणारी स्वयंसिद्धा या संस्थेचा सन्मान करण्यात आला. किसाताई यांच्याकडे काम करत असलेल्या आणि नंतर स्वत: उद्योजिका बनलेल्या सरोज शिंदे, श्यामल लिमये, अरुणाताई काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पत्रकार अरुण करमरकर यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर महापालिकेच्या सिटी बस तिकिटावर गुटख्याची जाहिरात छापली होती. त्याविरोधात पालिकेच्या स्थायी सभापतींना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन ती जाहिरात बंद करायला लावली होती. कोल्हापुरात शाहूपुरी परिसरात एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका युवतीवर अॅसिड हल्ला झाला होता, या प्रकरणी संबधित युवकाला कडक शासन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याचा परिणाम असा झाला की, त्यामुळे त्याला जामीन मिळू शकला नव्हता. वड पौर्णिमा वेगळ्याच पद्धतीने साजरी केली जाते. त्यादिवशी माळरान तसेच रिकाम्या जागेवर झाड लावली जातात व ती जगण्यासाठी ही लक्ष पुरवले जाते. संस्थेचे छोटे उद्योग केंद्र असून तिथे हळद, तिखट विक्री केली जाते.
महिला कामगार वस्तीत जाऊन आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, हिमोग्लोबिन तपासणी, हिमोग्लोबिन वाढीसाठी पौष्टिक खाऊ आणि औषधाचे वाटप करण, सेवावस्तीतील महिलासाठी गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करणे असे उपक्रम नित्याने आयोजित केले जातात. हल्ली कॅन्सर या आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं दिसते. कॅन्सर होण्याची कारणे तसेच कॅन्सर होऊच नये याकरिता काय करावं, हे समजून देणारी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. पाथरवट महिलांसाठी स्वच्छता आणि आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते.
यादवनगर भागातील सेवावस्तीत दारूबंदी अधिकाऱ्यांना बोलावून प्रबोधनात्नक कार्यक्रम घेतले गेले होते. ऊसतोडणी कामगारांना वस्तीवर जाऊन कपडे वाटप केले होते. मातंग समाजातील लोकांच्य घरवापसी कार्यक्रमाचे सर्व नियोजन करणे, सामाजिक बांधिलकीतून रक्षाबंधन हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन बालसंकुल, दिव्यांग, अपंग, मतिमंद, गतिमंद मुले, अनेक वृद्धाश्रम, कलेक्टर, पोलीस अधीक्षक, रिक्षा बांधवासाठी असे अनेक ठिकाणी रक्षाबंधन केले जात.
दर वर्षी स्वतः तयार केलेल्या राख्या सैनिकांना पाठवल्या जातात. तुरुंगात कैद्यांच्या मतपरिवर्तनासाठी राष्ट्रीय कीर्तनाचे आयोजन केले जाते. शैक्षणिक क्षेत्रात समितीच्या उद्देशानुसार, काही उपक्रम राबवले जातात. शाखेत सूर्यनमस्कार, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात. क्रांतिकारकांच्या कथा सांगितल्या जातात. योगदिनानिमित्त व्यायाम, योग घेतला जातो. महिलांसाठी खूप लहान-मोठ्या उपक्रमांतून समाजकार्य केले जाते.
उदाहरणच द्यायचं झालं, तर कोल्हापूर महापालिकेतील एका कामगार महिलेला त्रास देण्याच्या उद्देशाने मुद्दाम तिची स्मशानात बदली केली होती. हे समजल्यावर लगेचच संबधित अधिकाऱ्यांना भेटून तिची बदली करण्याची विनंती सेविकांनी केली होती. तक्रार लक्षात घेऊन तिची त्यानंतर दुसऱ्या विभागात बदली केली गेली होती.
गांधी जयंतीनिमित्त २ दिवस गांधीजींच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित केली होती. जडणघडणचे संपादक डॉ. सागर देशपांडे वक्ते म्हणून आले होते, त्यांनी गांधीजींच्या जीवनकार्याची खूप छान माहिती दिली होती. भूकंप, वादळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये ही संस्था फूल ना फुलाची पाकळी म्हणून नेहमीच हातभार लावत असते. २००५ साली महापूर आला होता आणि कोल्हापूर जिल्हा जलमय झाला होता. त्यावेळी ज्या खेडेगावांत शासनाची मदत पोहोचली नाही, अशा ४ गावांत सर्व प्रांपचिक साहित्यवाटप केले होते.
२०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी कोल्हापुरातील शुक्रवार पेठ भागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते तसेच दिवाळीत फराळ आणि नवीन कपडे देऊन थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.कोल्हापूरमध्ये स्मशानांमध्ये विनामूल्य मृतदेह दहन केले जाते. त्यासाठी कोल्हापुरात शेणी (गोवऱ्या) वापरण्याची प्रथा आहे. कोरोना काळामध्ये दुर्दैवाने अनेकांचे मृत्यू झाले आणि स्मशानामध्ये गोवऱ्यांची कमतरताही भासू लागली होती. ती लक्षात घेऊन त्या काळात संस्थेच्या वतीने महापालिकेला एक ट्रक भरून गोवऱ्या दान केल्या होत्या. खूपच वेगळ्या तऱ्हेचे दान आहे हे. त्या काळात गरजू रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, काढा देणे, डब्याची सोय लावणे, त्यांचे काऊंन्सिलिंग करणे इत्यादी उपक्रम राबविले गेले होते. थोडक्यात काय, तर अनेक समविचारी संघटनांच्या सहकार्याने संस्था विविध उपक्रम राबवत आहे. कोरोनामुळे मधला काळ ऑनलाइन कामे करावी लागली होती. आता पुन्हा जोमाने नवी कार्य हाती घ्यायचा संस्थेचा मानस आहे.