मृणालिनी कुलकर्णी
धोका पुत्र अंधाही होता है!” द्रौपदीच्या या शब्दावरून महाभारत घडले. मन दुखावणारे, पाणउतारा करणारे, नाउमेद-निंदा-नाराज करणारे शब्द अनेकांच्या तोंडून कधी सहजपणे, कधी जाणीवपूर्वक मुद्दाम बोलले जातात, हा सर्वांचा अनुभव आहे. शब्द जिव्हारी लागतात. त्यामुळे मनात कायम अढी निर्माण होते. आपल्या जगण्याचे पॅराशूट कोणी बांधले हे आपल्याला माहीत नसते.
दैनंदिन व्यापात आपण इतके गुंतलेले असतो की, काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण गमावून बसतो. कुणाची ख्याली- खुशाली विचारण्यास, कुणाचे आभार मानण्यास, कुणाचे अभिनंदन करण्याचे काहीही कारण नसताना राहून जाते. आपल्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांची चौकशी करावी, समोर येणाऱ्या व्यक्तीला शब्दाने किंवा चेहऱ्याने ओळख द्यावी, त्याने नाते बद्ध होते. आपल्याकडून कोणी दुखावलं गेलं किंवा चूक झाली की लगेच ‘सॉरी’ हा शब्द तसेच आपल्याला कोणी मदत केली की ‘थँक यू’ म्हणतो.
शब्द : दुसऱ्याला सदैव तू बावळट आहेस, वेंधळी आहेस हे शब्द किंवा तुला जमणार नाही, तुला फार वेळ लागतो, असे बोलून त्याच्या विकासाची, प्रयत्नांची मुळेच छाटून टाकतात. त्याच्या मनांतील शक्यता मालवून टाकतो. त्यापेक्षा कोडकौतुक सढळ हाताने करा. तू प्रयत्न कर तुला निश्चित जमेल, त्यात कठीण काही नाही. तू हमखास करू शकशील. हे शब्द प्रयत्न करायला उद्युक्त करतात. ‘शब्द शब्द जपून ठेवी, बकुळीच्या फुलापरी’! प्रत्येकाच्या आयुष्यात शब्दाचा परिमळ पसरावा यासाठी शब्द जपून वापरावा.
उच्चारलेला शब्द मागे घेता येत नाही. एकदा एकाने शेजाऱ्याची निंदानालस्ती केली. स्वतःची चूक लक्षात येताच धर्मगुरूंकडे जाऊन पश्चाताप व्यक्त केला. धर्मगुरूने एक पिशवीभर पिसं गावाच्या मध्यभागी टाकून ये असे सांगितले. त्याप्रमाणे त्याने केले. नंतर धर्मगुरूने ती पिसे गोळा करून आणावयास सांगितली. पिसं गोळा करण्यासाठी गेला असता सर्व पिसं उडून गेलेली दिसली. तो रिकामी पिशवी घेऊन परत आला. धर्मगुरू म्हणाले, शब्दाचेही असेच आहे. शब्द परत घेता येत नाहीत.
शब्द : व्हॉट्सअॅपवरील उदाहरण – बोलण्यासाठी उभी राहिलेली नीता सुरुवातीला गप्पच होती. ‘तू बोल सकती है, तू बेस्ट बन सकती है, कम ऑन नीता!’ या प्रतीकच्या शब्दाने नीताने बोलायला सुरुवात केली आणि छान बोलली. त्यानंतर कराटेवीर विराजचा वीट फोडण्याचा पहिला प्रयत्न फसला. ‘तोड दे, फोड दे, विराट तुम अपना मम्मीका स्ट्राँग बेटा है, तोड दो!’मध्ये मध्ये बोलणाऱ्या प्रतीकला मॅडमने भिंतीजवळ उभे केले. तेवढ्यात सुपरवायझर वर्गात आले नि त्यांनी भिंतीजवळ उभ्या असलेल्या प्रतीकला विचारले, ‘तुम्हारे मम्मीने आपको क्या सिखाया? ‘भरवसा’! दुसरेपर भरवसा करना। मम्मी कहती है, ‘कोई भी अपना भरवसा खो जाते है तो उनका भरवसा बनाना चाहिये। अच्छे शब्दोंसे उसका हौसला डबल हो जाता है। खेळाच्या मैदानात आपण हा अनुभव घेतो. मोटिव्हेशन नसेल, तर हवा तो रिझल्ट मिळत नाही.
शब्द : शब्द जशी भिंत उभी करू शकतो, तसा पूलही बांधू शकतो. येथे शब्द हे साधन आहे. चेतन भगतच्या ‘टू स्टेट’ चित्रपटात शेवटी वडील मुलीच्या घरी जाऊन आपल्या मुलाशी पूल जोडतात. पराभवाचेही कौतुक करण्याचा प्रघात आहे. जसे क्रिकेटमध्ये कॅच सुटला असे न म्हणता ‘वेल ट्राईड’असे म्हटले जाते. आपण आपल्या मुलांना का नाही असे म्हणत.
काही आशावादी शब्द जसे ‘धीर धर, होईल, हेही दिवस जातील’ हे शब्द ऊर्जा निर्माण करतात. दिलासा देतात. नोकरीच्या शोधात कोणी असेल, तर योग आला की होईल, काहीतरी चांगले घडणार आहे म्हणून उशीर होत आहे किंवा अनेकांची उदाहरणे द्यावी. तसेच लग्नाच्या बाबतीत. नोकरीत कामाचे कौतुक करताना मस्त, छान, ग्रेट, वॉव, शाब्बास, उत्तम अशी विशेषणे वापरावीत. उत्साह वाढविणाऱ्या शब्दाचा साठा जवळ हवा. शब्दातील सामर्थ्याचे उत्कृष्ट उदाहरण “बंधू भगिनींनो ”असे संबोधून स्वामी विवेकानंदानी साऱ्यांशी वैश्विक नाते जोडले.
शब्द : नको ते शब्द उच्चारण्याऐवजी काहीवेळा मौन चांगले. मौन म्हणजे शब्दांना विश्रांती. दुःखाच्या प्रसंगी शब्दाऐवजी स्पर्श बोलून जातो. अस्तित्वही मूक आधार देते.
शब्द : दैनंदिन जीवनात कामावर जाताना, हात करताच बस थांबली, रिक्षा – टॅक्सी लगेच मिळाली, ती स्वच्छ असेल, रिक्षाचालकाने शिताफीने गर्दीतून गाडी काढल्यास उतरताना त्याचे कौतुक करावे. आभार मानावेत. आपण त्रयस्थांचे मन जिंकतो. मुलानेही आई-बाबांच्या कष्टाची, मेहनतीची, जाणीव कधीतरी बोलून दाखवावी त्यांचा थकवा, शिणवटा नाहीसा होतो. शब्दाविषयी काही लक्षात घेण्याजोगे –
१. आपल्या रोजच्या जीवनात शब्दांशिवाय पान हलत नाही. आपला दिवस ‘शुभ सकाळने सुरू होतो नि शुभ रात्रीने संपतो.
२. शब्दाला धार, माया, गोडवा असतो तसेच जरबही असते. म्हणूनच क्रांती अस्त्राने किंवा शस्त्राने न होता शब्दाने होते.
३. शब्दाचा अर्थ घ्यावा तसा लागतो. शब्द उच्चारागणिक अर्थ बदलतो. म्हणून बालकाशी बोलताना शब्द कोणते व कसे असावेत याचे भान असावे.
४. बरेचवेळा घरात नकळतपणे आपल्याच एका मुलाचे कौतुक करताना दुसरा दुखावला जातो.
५. चुकलो! या एका शब्दाने भांडण मिटते. ६. बोललेला, वाचलेला, ऐकलेला, लिहिलेला प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो.
७. मराठी भाषा संपन्न आहे. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हे शब्द उच्चारताच आनंदाचे तरंग वातावरणात उमटतात. तेव्हा शब्द संपत्ती वाढावी.
८. सहज लिहिता लिहिता स्पष्टवक्ते तुकाराम महाराज किती छान लिहून गेलेत, –
“ बोलावे बरे, बोलावे खरे ।।
कुणाच्याही मनावर, पाडू नका चरे ।।
थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे ।।
शब्दामुळे दंगल, शब्दामुळे मंगल ।।
शब्दाचे जंगल, जागृत राहावं।।
जिभेवर ताबा, सर्व सुख दाता ।।
पाणी वाणी नाणी, नासू नये ।।
विठ्ठल विठ्ठल ।।”