Share

डॉ. श्रीराम गीत

पुरत नाही तो पगार. विचारायचा नसतो तो पगार. सांगितला तर ऐकूनच सहकारी मित्राचे डोके गरम होते तो पगार. मोठ्या कंपनीतील मोठ्ठे गुपित म्हणजे साहेबांचा पगार. मित्रा मित्रांत भांडण लावणारा तोही पगारच. बायकोचा पगार असला मोठा तर भांडणा नाही तोटा. पोरांच्या ॲडमिशनच्या वेळेला नडतो तोही पगार. एक तारखेला मिळतो तो साहेबी पगार. सात तारखेला देतात तो कामगारी पगार. घड्याळी तासावर हजारो प्राध्यापकांना शैक्षणिक संस्थात पैसे देतात त्यालाही पगारच मानावे लागते. एवढे कमी पडले म्हणून सही एका आकड्यावर तर निम्माच आकडा हाती असे सहकार क्षेत्रात चालते तोही पगार.

या पगारी मंडळींकडे महिन्याचे ३० दिवस काम करूनसुद्धा तीनदा मागावा लागतो तो मोलकरणीचा पगार आणि आठवड्याला मिळतो तो मजुराचा पगार. काही मोजके भाग्यवान असे असतात की, त्यांना पगाराला हातच लावावा लागत नाही. त्यांची काळजी मायबाप जनताच घेत असते. निवृत्तीनंतरचे पेन्शन हाच त्यांचा पहिला पगार. काहींना पगार नशिबातच नसतो. काहींना पगार देण्याचे भाग्य लागते. या जमातीला व्यवसायिक असे म्हणतात. ज्यांचे पगारात भागत नाही त्यांना यांचा हेवा वाटतो. एकुणात काय पगार नावाची चीज इंग्रज साहेबाने सुरू केली. बलुतेदारी संपवली आणि आपला आनंद संपला. कामातला रस गेला आणि पोटापुरते जगणे सुरू झाले.

वडिलांच्या शेवटच्या पगाराएवढा मुलाचा पहिला पगार असतो

वाढत्या महागाईला सामावून घेणारे हे गणित आहे. त्या अर्थाने मुलाचा पगार वाढत नाही पण मानसिक समाधान मात्र नक्की मिळते. जुन्या काळात युनियनने भांडून वाढवून मिळवलेला पगार आणि दिवाळी बोनस यातच हातपाय पसरायला लागायचे. महिन्याची पंचवीस तारीख कायमच ओढ गस्तीची होती. याउलट आयटीमधल्या मुलांची स्थिती आहे. गाडीचा, घराचा, नवीन घेतलेल्या एलईडी टीव्हीचा हप्ता जाऊनच पगार हाती येतो. मग त्यावर हिशोब सुरू होतो या महिन्याची ट्रीप कोकणात का काश्मीरला?

पहिल्या पगाराची नवलाई सगळ्यांनाच असते

आईला साडी, वडिलांना घड्याळ, बहिणीला ड्रेस आणि स्वतःला नवीन शर्ट यातच जुन्या काळातला पहिला पगार संपून जायचा. थोडेफार पैसे शिल्लक राहिले, तर चहा आणि भजी अशी पार्टी मित्रांना द्यावी लागायची. तो काळ असो किंवा सध्याचा, एक गणित अजूनही चुकलेले नाही. बघा तुम्हीसुद्धा करून स्वतःचे संदर्भात. ९९ टक्के लोकांचे बाबतीत हे गणित आजही बरोबर येते.

पॅकेजवाला पगार कॅम्पसमधून नोकरी लागली तरच मिळतो
शिक्षणाचा आटापिटा करून एक टक्का मंडळी यश मिळवतात. आई-वडील क्लासच्या फीस भरून धन्य होतात, पॅकेज ऐकून आयुष्याचे सार्थक होते त्यांच्या. अशी ही पगाराची कहाणी.

डॉलरचे आकर्षण

परदेशातील डॉलरचा पगार गुणिले ऐंशी हा हिशेब करत तिकडे जाणारे गणितातच चुकतात. छान रहाणीमान, सुखद जीवनशैली मात्र जेमतेम शिल्लक हे गणित फारच थोडे सोडवू शकतात. मुला-मुलींना थांबवणे अशक्य असले तरी खरा पगार काय याची तोंडओळख करून देणे कठीण नसते. यावरही विचार होणे उपयुक्त आणि मग संसार सुरू होतो, साधारण साठ पगार मिळाल्यावर. नंतर पगाराचे पाकीट तिचेच हाती जाते. नोकरी करणारी बायको असली तरी घर चालते ते मात्र हाती आलेल्या नवरोबाच्या पगारावर. बायकोचा खरा पगार माहिती असणारा नवरा शोधावा लागतो. ही पगाराची एक वेगळीच गंमत. अशी ही पगाराची कहाणी सुफल व संपूर्ण.

आकडेमोड पगाराची

कोणाचाही पगार पाच लाखाला पोहोचला की, प्राप्तिकराचा बडगा बसतोच. जितका पगार जास्त तितका बडगा जबरदस्त. खरेतर एक वेगळाच हिशोब सांगतो. मोठा साहेब त्याचे पंचवीस लाखांचे पॅकेज. ते ऐकूनच सगळे गप्प होतात. आता त्यांच्या पीएची कहाणी पाहा. पीए पाच लाख पगार घेतो. पीएची बायको साडेचार लाखांवर नोकरीला, तर त्याचा मुलगा आयटीत पाच लाखांचे पॅकेज घेऊन नवीन कंपनीत उमेदवारीवर. पीएच्या मुलीला पण चार लाखांची किरकोळ नोकरी. गंमत म्हणजे पीएच्या कुटुंबात टॅक्स फ्री(खरोखरचे) वीस लाख येतात. साहेबाला मात्र हाती येणारे अठरा लाखांत ओढाताणीत महिना काढावा लागतो. एवढेच नाही तर टॅक्स कापला यावर तो कायमच चरफडत राहतो.

पगारपत्रावरचा आकडा मिळाला म्हणून सही करायची. पण, प्रत्यक्ष हातात तो कधीच पडत नाही. कारण सीटीसी (cost to company) या गोंडस नावाने सांगितला जातो तो आभासी पगार. पॅकेजचा आकडा भागिले १२ करायचे. त्यानुसार मासिक पगाराचा हिशेब करायचा. पण प्रत्यक्षात हिशोबाच्या १/३ हातात मिळतो तो कंपनीतला पगार. खूप पूर्वी बिनाका गीत मालामध्ये १ तारखेला ‘खूश है जमाना आज पहिली तारीख है’ असे गाणे लागायचे. त्याची आठवण आजपण येते. पगाराचे आठवड्यात हॉटेल, मॉल, कापडबाजार व इलेक्ट्रॉनिकची दुकाने ओसंडून जातात. मोबाइल दुकानांची हप्तेबंदीवर चलती सुरू झाली आहे. एके काळी साठ-सत्तर हजारांची बाईक हप्ते देऊन घरी येई तसेच आता सॅमसंगचे मोबाइल आणले जातात. कोरोनाने याला जरा बांध पडला, असे उगाचच वाटत होते. पण ते खोटे ठरत आहे.

Recent Posts

‘या’ टीम प्ले ऑफमध्ये पोहोचतील, अनिल कुंबळेची भविष्यवाणी

बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…

1 hour ago

Jammu Kashmir Trekking : जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगला स्थगिती!

पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…

2 hours ago

Food Poisoning : लग्न समारंभाला जाताय सावधान! जेवणातून ६०० जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…

2 hours ago

Pope Francis : पोप फ्रान्सिस यांना केले रोममधील चर्चमध्ये दफन

अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…

2 hours ago

पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या ‘ऑपेरेशन ऑल आऊट’ला सुरुवात, आतापर्यंत १० दहशतवाद्यांची घरं स्फोटकांनी उडवली

जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…

3 hours ago

Nitesh Rane : हिंदू म्हणून एकत्र या, हे सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे

मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…

3 hours ago