मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड बारवी प्रकल्प धरणग्रस्तांना अखेर महानगरपालिकेमध्ये सरकारी नोकऱ्या मिळाल्याचे रुजू पत्र मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये एक मराठा लाख मराठा या सामाजिक संघटनेला मिळालेल्या सामाजिक सभागृह भूमिपूजनासाठी असलेल्या कार्यक्रमांमध्ये बारावी धरण प्रकल्पग्रस्त मुरबाड तालुक्यातील ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मीरा-भाईंदर महानगरपालिकेत रुजू होणाऱ्या ८९ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे रुजू पत्र मिळाले.
केंद्रीय पंचायतीराज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराला ऐतिहासिक यश आले आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ठाणे शंभूराज देसाई तसेच आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार नितेश राणे, महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत रुजू पत्र देण्यात आले.
बारवी धरण प्रकल्पग्रस्तांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व आयुक्त दिलीप ढोले उपायुक्त मारुती गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आभार मानले. मुरबाड तालुक्यातील बारवी प्रकल्पग्रस्तांना ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सरकारी नोकरी मिळाल्याने आनंदाची दिवाळी साजरी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नोकरी मिळालेल्या तरुणांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे.