नवी दिल्ली : नुकताच जागतिक भूक निर्देशांक जाहीर झाला. यामध्ये भारताची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. या यादीत पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश या देशांची स्थिती भारतापेक्षा चांगली असल्याचे समोर आले आहे. आयर्लंडमधील कन्सर्न वर्ल्डवाईड अँड वेल्थंगरहिल्फ या संस्थेतर्फे दरवर्षी जागतिक भूक निर्देशांक जाहीर केला जातो. त्याप्रमाणे यंदा या संस्थेने जागतिक भूक निर्देशांक जाहीर केला आहे.
जागतिक उपासमार निर्देशांक जाहीर झालेला असून भारताचा या यादीत १२१ देशांच्या यादीत १०७ वा क्रमांक लागत आहे. भारताचा समावेश गंभीर या श्रेणीमध्ये करण्यात आला असून भारतात उपासमारीची समस्या गंभीर असल्याचे त्यामधून सूचित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी भारताचा १०१ वा क्रमांक होता. आता त्यामध्ये सहा स्थानांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
यंदाच्या जागतिक उपासमार निर्देशांकमध्ये भारताला २९.१ गुण देण्यात आले आहेत. यामध्ये भारताला गंभीर देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. तसेच या यादीत भारताची सहा स्थानांनी घसरण असून भारताचे शेजारी श्रीलंका (६४), म्यानमार (७१), नेपाळ (८१), बांग्लादेश (८४) आणि पाकिस्तान (९९) हे देश भारताच्या पुढे आहेत. दक्षिण आशियाचा विचार करता भारताच्या मागे फक्त अफगाणिस्तान (१०९) आहे.
जागतिक उपासमार निर्देशांकातील भारताच्या कामगिरीवरुन विरोधी पक्षांनी केंद्रातल्या सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.