पुणे : महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा गेले दोन दिवस एनडीआरएफ टीम आणि स्थानिक गिर्यारोहक यांची टीम शोध घेत होती. अखेर आज त्यांचा मृतदेह सापडला आहे. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना घोरपडे बेपत्ता झाले होते. शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या पुणे येथील कार्यालयातुन बाहेर निघाले होते. मात्र घरी आले नाहीत म्हणून, त्यांच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी शोध सुरू केला. त्यांची कार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टोलनाका पास करून सातारा बाजूकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पाहीले असता शेवटचे लोकेशन सारोळा निरा नदीपुलाचे लोकेशन होते. व घोरपडे यांच्याकडे असलेली त्यांच्या मित्राची कार क्र. एमएच ११ सीडब्ल्यू ४२४४ ही कार देखील पुला नजीकच्या हॉटेल समोर मिळाली होती. त्यानुसार घोरपडे यांच्या बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात शशिकांत घोरपडे हे बेपत्ता होण्याची खबर नोंदवली होती. त्यानंतर तपास सुरू केला.
दरम्यान शुक्रवारी शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीत आढळला आहे. नीरा नदीच्या पुलावरून पायी जात असताना ते सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसले होते. त्यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. नीरा नदीच्या पुलाच्या भिंतीलगत त्यांचा मृतदेह सापडला आहे.
शशिकांत घोरपडे यांनी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय आहे. मात्र, सीसीटीव्ही फूटेजमधून तसे काही स्पष्ट होत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. शिरवळ पोलिसांनी याबाबत मृत्यूची नोंद केली असुन पोलीस उपनिरीक्षक वृशाली देसाई पुढील तपास करत आहेत.