Tuesday, July 1, 2025

पोलिसांच्या ११ हजार ४४३ पदभरतीस मान्यता; ऑक्टोबरअखेर भरती

पोलिसांच्या ११ हजार ४४३ पदभरतीस मान्यता; ऑक्टोबरअखेर भरती

मुंबई : तीन वर्षांपासून रखडलेल्या पोलिस भरतीची अनेकदा घोषणा झाली. पण, आता ११ हजार ४४३ (गट-क) पोलिसांची पदे भरली जाणार आहेत. ऑक्टोबरअखेरीस भरतीची प्रक्रिया सुरु होऊ शकते. पोलिस भरतीवेळी पहिल्यांदा मैदानी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला असून त्याची लवकरच गृह विभागाकडून घोषणा होणार आहे.


ऑक्टोबरअखेरीस पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होऊन नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष भरती होईल, असे महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. त्यात पोलिस शिपाई, चालक, सशस्त्र पोलिस शिपाई अशी पदे आहेत.


लेखीच्या तुलनेत मैदानी परीक्षेत ग्रामीण भागातील तरूण चांगले गुण घेतात. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलिस भरतीच्या निकषांत ऐतिहासिक बदल केला. सुरूवातीला लेखीऐवजी मैदानी आणि मुलाखत बंद, असे निर्णय घेतले. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक मुला-मुलींना नोकरीची संधी मिळाली. पण, काही वर्षांपूर्वी त्यात पुन्हा बदल झाला आणि सुरूवातीला लेखी परीक्षा घेतली गेली. आता त्यात पुन्हा बदल करण्याचा निर्णय झाला असून पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीत गोळाफेक, धावणे या बाबींचा समावेश आहे. राज्यभरातील चार ते सहा लाख तरूण पोलिस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.


पोलिस अंमलदार, अधिकाऱ्यांची जवळपास २२ ते ४० हजारांपर्यंत रिक्त पदे आहेत. मनुष्यबळाअभावी नवीन पोलिस ठाणी, पोलिस चौक्यांचा निर्णय प्रलंबित आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण वाढला आहे. दुसरीकडे लाचखोरी देखील या विभागात वाढली असून महसूल विभागानंतर पोलिस विभाग लाचखोरीत राज्यात अव्वल आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस भरतीची मोठी गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >