Wednesday, July 9, 2025

दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी शमीला संधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुखापतग्रस्त गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या ऐवजी मोहम्मद शमीची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेत शमी भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे.


भारतीय गोलंदाजीची धार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहने दुखापतीमुळे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळणार? याकडे देशभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. या रेसमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे तीन खेळाडू होते. यात मोहम्मद शमीने बाजी मारली आहे.


अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने भारताच्या आयसीसी टी-२० विश्वचषक संघात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड केली आहे. शमी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे आणि सराव सामन्यांपूर्वी ब्रिस्बेनमध्ये संघाशी संपर्क साधेल. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचीही संघात बॅकअप खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. हे दोन्ही खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.


आयसीसी विश्वचषक स्पर्धेपूर्वी लागलेले दुखापतीचे ग्रहण भारतीय संघाची पाठ सोडायचे नाव घेत नाही. अष्टपैलू रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि चहर अशी तीन खेळाडूंना दुखापतीचा फटका बसला आहे. बुमराहच्या अनुपस्थितीतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

Comments
Add Comment