शनिवारचा दिवस हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणाऱ्या महाराष्ट्रातीलच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यांत शिवसेना या चार अक्षरांवर मनापासून प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांसाठी खऱ्या अर्थाने काळा दिवस ठरला. एकीकडे रक्ताचा वारसा, तर दुसरीकडे वैचारिक वारसा असा हा संघर्ष चिघळला आहे. अर्थात बाळासाहेबांच्या हयातीत व नंतरही उद्धव ठाकरेंना सर्व ‘आयते’ मिळालेले आहे; परंतु शिंदेंपासून सर्व आमदार, खासदार इतकेच नाही, तर नगरसेवकांनी संघर्ष करत आपल्या विभागामध्ये शिवसेना वाढविली होती व नावारूपालाही आणली होती; परंतु मुख्यमंत्री बनलेल्या ठाकरेंना राज्यही सांभाळता आले नाही व पक्षप्रमुख म्हणून संघटनाही सांभाळता आलेली नाही. त्यांच्यामुळेच संघटनेला आता नाव व चिन्ह गमावावे लागले असल्याचा संताप आता शिवसैनिकांकडून उघडपणे व्यक्त केला जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना, त्या शिवसेनेचा धनुष्यबाण आता प्रचारात वापरता येणार नाही. शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामध्ये शिवसेना व धनुष्यबाण यावर सुरू असलेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश शनिवारी रात्री उशिरा जारी केला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत या आदेशामुळे शिवसेनेच्या चिन्हाचा आता वापर करता येणार नाही. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
मुळात असा निर्णय लागण्याची कुणकुण शिवसैनिकांना होतीच. असा निर्णय लागलाच, तर पर्यायी चिन्ह काय असणार? शिवसेना नावही स्थगित झाले अथवा गोठविले, तर पर्याय काय असणार? याचीही संभाव्य चर्चा शिंदे गट व ठाकरे गटामध्ये शिवसेना व धनुष्यबाण यावरून वाद सुरू झाला, त्या दिवसापासून सुरू होती. अर्थात धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिवसेनेचे सुरुवातीपासून नव्हते. ढाल, तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण असा शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास होत गेला आहे. शनिवारी झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे. स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची आता दोन्ही गटांना निवड करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाकडे सोमवारी, १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. अर्थात शिवसेना व धनुष्यबाण हे दोन्ही गोठविण्याची वेळ केवळ उद्धव ठाकरेंमुळेच आलेली आहे, असा सूर आता दबक्या आवाजामध्ये शिवसैनिकांकडूनही आळविला जात आहे. ५४ आमदारांपैकी ४० आमदार ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य करत शिवसेनेतच राहून वेगळी राजकीय चूल मांडतात. लोकसभेतील १० खासदारही या आमदारांची पाठराखण करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला ‘जय महाराष्ट्र’ करत ४० आमदारांची पाठराखण करतात. आमदार-खासदारांपर्यंतच हे वेगळी भूमिका तसेच वेगळी राजकीय चूल मांडण्याचे प्रकरण सीमित न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.
शिवसेनेत कार्यरत असणाऱ्या नगरसेवकांपासून, लोकप्रतिनिधींपासून देशातील सर्वोच्च सभागृहात म्हणजेच संसदेतील खासदारांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, लोकप्रतिनिधींनीच नाही, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, महिला रणरागिणींनीदेखील ठाकरे गटाची साथ सोडणे. एकवेळ महाराष्ट्रातील नाराजी समजण्यासारखे असू शकते; परंतु महाराष्ट्राबाहेर ज्यांनी शिवसेना वाढविली, त्या त्या राज्यात शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची किमया ज्या पदाधिकाऱ्यांनी केली, त्यांनीही एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाची उघडपणे पाठराखण केली. हे सर्व कशाचे चित्र आहे? अनेकजण साथ सोडून गेले. हे निश्चितच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचे, राजकीय कर्तृत्वाचे, निर्णयाचे अपयश मानावे लागेल. अशा वेळी आपल्या सोडून जाणाऱ्या सहकाऱ्यांना समजावण्याची, त्यांचे रुसवे-फुगवे काढण्याची, त्यांची मनधरणी काढण्याची, त्यांची नाराजी जाणून घेण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी करणे आवश्यक होते; परंतु स्वत:च्याच अंहकारात, हेकेखोर प्रवृत्तीत रममाण असलेल्या उद्धव ठाकरे यांनी संघटनेला पडणारे खिंडार बुजविण्याचे अाणि सोडून जाणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना थोपविण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांनी गद्दार, खोके याचाच एककलमी नारा देण्यात समाधान मानले. सोडून जाणाऱ्यांचे अधिकाधिक चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न ठाकरेंनी संघटनात्मक बैठकांमध्ये, मीडियाशी बोलताना तसेच जाहीर सभांतून केला. खरे पाहता संघटनेला पडत असलेले खिंडार पाहून ठाकरेंनी स्वत:चे आत्मपरीक्षण करणे आवश्यक होते; परंतु त्यांचा स्वभाव व कार्यप्रणाली पाहता ती अपेक्षाही नव्हती.
आज ज्या घडामोडी घडत आहेत, त्यास सर्वस्वी उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत. शिवसेनाप्रमुखांचा वारस म्हणून ठाकरे टाहो फोडत असले तरी सोडून जाणारे शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक हे आपण शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे वारसदार असल्याचे समाजासमोर सांगत होते. संघटनात्मक संख्याबळ, लोकप्रतिनिधींचे संख्याबळ ठाकरेंना सोडून शिंदेंच्या समर्थनार्थ गेले. ज्या संघटनेला टिकविण्याची भाषा ठाकरे वापरत होते. त्या संघटनेची कागदपत्रे जमा करण्यास त्यांना विलंब का झाला? वैचारिक वारसदार सांगणारे एकीकडे व वारस म्हणून वारसा सांगणारे दुसरीकडे, असे शिवसेनेतील चित्र गेल्या काही दिवसांमध्ये उभ्या महाराष्ट्राला पाहावयास मिळाले. रोम जळत असताना व्हायोलिन वाजविणारा राजा आणि संघटना फुटत असतानाही पुढे येऊन खिंडार बुजविण्यासाठी पुढाकार न घेणारे ठाकरे यात फारसा फरक नाही. शिवसैनिकांचा श्वास असणारे धनुष्यबाण आता गोठविले गेले आहे. अंधेरीच्या निवडणुकीत नव्याने चिन्ह घेऊन ठाकरे गटाला उतरावे लागणार आहे. ही वेळ ठाकरेंमुळेच निर्माण झाली आहे. नगरसेवक ते खासदार, गटप्रमुख ते राज्यप्रमुख सोडून जातात, आता धनुष्यबाणही गमवावे लागले. रक्ताच्या वारसाने हेच कर्तृत्व केल्याचा संताप आता शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत.