मीरा पणशीकर
‘तो मी नव्हेच’ नाटकाचा पहिला प्रयोग १९६२ साली झाला. त्या वेळी मी ‘मीरा सप्रे’ होते… अजून ‘मीरा पणशीकर’ झाले नव्हते!
माझ्या काकांनी हे नाटक मुंबईत पाहिले आणि त्याविषयी आम्हा सर्वांना खूप भरभरून वर्णन करून सांगितलं. त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की, मी लवकरच एक ‘पणशीकर’ होणार आहे, आणि ‘तो मी नव्हेच’च्या कुटुंबाचाही एक भाग होणार आहे! १९६४ साली माझे लग्न होऊन मी ‘मीरा पणशीकर’ झाले. पंत माझे मोठे दीर.
१९७८ सालापासून पुढे अनेक वर्षे, ‘तो मी नव्हेच’ मधली सर्वात महत्त्वाची भूमिका… ‘सुनंदा दातार’ची भूमिका… मी पावणेचारशेहूनही अधिक प्रयोगांमध्ये केली. आता ‘तो मी नव्हेच’ या नाटकाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. आज त्या नाटकाच्या अनेक आठवणींनी मनात गर्दी केली आहे. अर्थात, माझ्या मनातल्या आठवणी जास्त करून, प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींशी निगडीत आहेत.
‘तो मी नव्हेच’चा प्रत्येक प्रयोग हा एक वेगळाच, नित्यनवीन अनुभव असायचा. अगदी ऐनवेळी स्टेजवर काही गमतीजमती व्हायच्या; कधी काही अनपेक्षित अडचणी यायच्या नि त्यावर मातही केली जायची!
एका प्रयोगात, ‘सुनंदा दातार’ आपल्याला फसवून परागंदा झालेल्या नवऱ्याला शोधत, कॅप्टन अशोक परांजपेच्या घरी येते. कॅप्टन अशोकचा आवाज इतका ओळखीचा कसा असं वाटून ती पटकन आवाजाच्या दिशेने निघते. स्टेजवर हे करताना माझ्या कपाळावरची टिकली खाली पडली. तेवढ्यात कॅप्टनच्या वेषातले पंत आले. ‘मे आय हेल्प यू?’ असं मोठ्या स्टाइलमधे म्हणत, त्यांनी ती टिकली उचलून माझ्या हातात दिली. आणि म्हणाले, ‘टिकली टिकवता येत नाही, तर नवरा काय टिकवणार?’ या वाक्याला प्रेक्षकांनी हशा-टाळ्यांनी दाद दिली, पण मला मात्र आलेलं हसू दाबत, प्रसंगानुरूप गंभीर चेहरा ठेवावा लागला!
नाटकाच्या मूळ संहितेत नसलेले आणखीही अनेक प्रसंग घडायचे.
कोर्टामध्ये साक्षीदारांच्या उलट तपासणीचे अनेक प्रसंग होते. त्यामधेही संहितेत नसलेले प्रश्न, पंत अचानक विचारायचे आणि तो सहकलाकार पार गोंधळून, गडबडून जायचा! मग स्टेजच्या मागे वादावादी रंगायची!
माझ्या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये त्यांनी माझी काही विशेष ‘फिरकी’ घेतली नव्हती. मी त्यांना म्हटलंसुद्धा… ‘बरंय बुवा, तुम्हाला माझी फिरकी घेता येत नाही!’ त्यावर मिस्कीलपणे हसत ते म्हणाले, ‘हो, बरोबर आहे!’ मग एका प्रयोगात माझी गडबड उडवलीच त्यांनी.
उलट तपासणीच्या प्रसंगात सुनंदा दातारला प्रश्न विचारला जायचा, ‘बाई, तुम्ही बी. ए. आहात का?’ यावर उत्तर ‘हो’ असं असायचं. ऐनवेळी पंतांनी मला विचारलं, ‘बाई, तुम्ही एम. ए. आहात का?’ मी सवयीने ‘हो’ म्हणून गेले. त्याबरोबर जोरात खेकसून म्हणाले, ‘खोटं बोलताय तुम्ही!’ यावर अर्थातच मीही गडबडून गेले.
पुढे कालांतराने माझे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम वाढायला लागले, त्यामुळे मी ‘तो मी नव्हेच’चे प्रयोग करण्याचे प्रमाण कमी केलं. पण कधी सुनंदा दातारची भूमिका करणारी कलाकार आली नाही, तर मला पंतांचा फोन यायचा.
असंच एकदा अगदी ऐन वेळी फोन आला. इतकं शेवटच्या क्षणी बोलावलं तर मी रागावेन की काय, असं बहुधा त्यांना वाटलं असावं. त्यामुळे मी फोन उचलल्याक्षणी त्यांनी सुरुवात केली… ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी…’ मग अशा ‘विनवणी’ला नाही कसं म्हणणार मी…!
असे गमतीदार किस्से, आठवणी, अनेक आहेत. पण त्याचबरोबर काही गंभीर प्रसंगांनाही तोंड द्यावं लागलं.
वेंगुर्ल्याला प्रयोग होता. ‘चंद्राबाई चित्राव’ ही भूमिका करणाऱ्या शांताबाई साठेंना थोडं अस्वस्थ वाटायला लागलं होतं. पहिला अंक सुरू झाला होता. पण माझ्या एन्ट्रीला अवकाश होता, त्यामुळे मी आतच होते. शांताबाईंना बरं वाटत नव्हतं, म्हणून त्यांना विचारून, त्यांच्या पर्समधून त्यांचं औषध काढून मी त्यांना दिलं. त्यांनी ते जेमतेम घेतलं आणि माझ्या खांद्यावरच मान टाकली! काहीतरी फार गंभीर घडलंय, हे माझ्या लक्षात आलं होतं. पण, तितक्यात माझ्या एन्ट्रीची वेळ आली. शांताबाईंना दुसऱ्या एका कलाकाराकडे सोपवून, तशा हादरून गेलेल्या स्थितीतच मला एन्ट्री घ्यावी लागली.
हजारोंच्या संख्येने हजर असलेले प्रेक्षक, प्रयोग बघण्यात रंगून गेले होते. दुसऱ्या स्त्री कलाकाराने ‘चंद्राबाई’ची भूमिका पार पाडली.
हॅास्पिटलमधे दाखल करण्यापूर्वीच शांताबाईंना देवाज्ञा झाली होती. मात्र ही दु:खद बातमी, प्रयोग संपेपर्यंत आम्हा कलाकरांना कोणीही सांगितली नव्हती. मराठवाड्यातल्या दौऱ्यामध्ये कलाकारांची बस प्रयोगाच्या ठिकाणी अगदी वेळेवर पोहोचली. पण सर्व सामान, नेपथ्य, इ. घेऊन येणारा ट्रक वाटेत कुठेतरी अडकला.
खुल्या पटांगणावरचा प्रयोग असल्याने हजारो प्रेक्षक, उत्सुकतेने प्रयोग सुरू होण्याची वाट बघत होते. उशीर होऊ लागला, तसे अस्वस्थ होऊन हुल्लडबाजीला सुरुवात झाली. त्यांना शांत करण्यासाठी आम्ही एकेक जण स्टेजवर जाऊन मनोरंजनाचे काही न काही कार्यक्रम करत राहिलो. रात्रीचे दोन वाजायला आले. शेवटी एकदाचा तो ट्रक आला. स्टेज उभं राहिलं नि प्रयोग उत्तम प्रकारे पार पडला! प्रयोग संपेपर्यंत सकाळचे सहा वाजून गेले, पण तरीही प्रेक्षकांनी पूर्ण वेळ थांबून नाटक पाहिलं, कारण या नाटकाची प्रचंड लोकप्रियता!
‘तो मी नव्हेच’ या नाटकावर प्रेक्षकांनी असं भरभरून प्रेम केलं!
या व्यतिरिक्त, कट्यार काळजात घुसली,
तुझी वाट वेगळी या नाटकांचेही बरेच प्रयोग केले. आणखी एक गमतीशीर प्रसंग… ‘तो मी नव्हेच’मध्ये आम्ही सहा स्त्री कलाकार असायचो, दौऱ्यात खूप ठिकाणी काही ना काही खरेदी चालायचीच, एका गावात बस
थांबली, पंत घाई घाईने म्हणाले, चला चला खरेदीला, आम्ही लगेच उठलो, तर ते हसत हसत मोठ्याने म्हणाले, इथे मीठ छान आणि स्वस्त मिळतं हे ऐकून आम्ही सगळे खूप हसलो.
या नाटकानं आम्हा कलाकारांना खूप आनंददायी अनुभव दिले! माझ्यासाठी विशेष समाधानाची गोष्ट म्हणजे, माझ्या दोनही मुलांना या नाटकात कलाकार म्हणून सहभागी होता आलं! काही प्रयोगात अपर्णाने छोट्या वेणूचं काम केलं, तर राहुलने पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली! माझ्या मनोगताचा शेवट मी पंतांना अभिवादन करून करते.