अलिबाग (वार्ताहर) : रायगड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच झोडपून काढले असून, गेल्या चोवीस तासात सरासरी ८८.४० टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याकाळात अलिबाग, मुरुड, पनवेल, माणगाव, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यांसह माथेरान या हिल स्टेशन परिसरात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला भातपिकाचा घास हिरावतो की, काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते पाऊस लांबल्याने शेतात तयार झालेला हळवा आणि निमगरवा भातपीक कापण्याची सध्यातरी घाई शेतकऱ्यांनी करू नये, असे सांगितले. गरवा भातपिकाला सध्या धोका नसल्याचेही कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाऱ्यासोबत पाऊस अजून काही दिवस पडत राहिल्यास हळवा आणि निमगरवा भातपीक शेतात आडवे होण्याची शक्यता आहे. तर भाताच्या लोंबीचा शेतातील पाण्याशी संपर्क आल्यास भातपिकाची नासाडी होऊ शकते, अशी भीतीही कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अलिबागमध्ये ११६ मि.मी, पेण ६२ मि.मी, मुरुड १६१ मि.मी., पनवेल १४० मि.मी., उरण १०० मि.मी., कर्जत ५६.२० मि.मी., खालापूर ६८ मि.मी., माणगाव ११२ मि.मी., रोहा ९९ मि.मी., सुधागड २७ मि.मी., तळा ९५ मि.मी., महाड ३७ मि.मी., पोलादपूर १६ मि.मी., म्हसळा १०६ मि.मी., श्रीवर्धन १०५ मि.मी., माथेरानमध्ये ११४.२० मि.मी., पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान १ जुनपासून ते ८ ऑक्टोबरपर्यंत एकुण सरासरी ३३५४.१५ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.