कल्याण (वार्ताहर) : उसने घेतलेले पैसे परत देत नसल्याने एका इसमाने मित्राचीच कोयत्याने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. बिपीन दुबे असे मयत इसमाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी राजेश्वर पांडे याने कोळशेवाडी पोलीस ठाण्याला हत्या केल्याची माहिती दिली. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात राजेश्वर पांडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेश्वर पांडे याला कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
कल्याण पूर्व परिसरात तिसगाव नाका येथील एका इमारतीमध्ये राजेश्वर पांडे राहतात. याच परिसरात राहणारा बिपीन दुबे हा राजेश्वर पांडे याचा मित्र होता. बिपीन दुबे याने काही महिन्यांपूर्वी राजेश्वर पांडे यांच्याकडून काही कामानिमित्त साडे चार लाख रुपये उसने घेतले होते. राजेश्वरने अनेकदा बिपीनकडे पैशांची मागणी केली मात्र बिपीन टाळाटाळ करत होता.
शुक्रवारी दुपारी राजेश्वर याने बिपीनला घरी बोलावले. या दोघांमध्ये या पैशांवरून झालेल्या वादातून राजेश्वरने बिपिनवर कोयत्याने वार करत बीपीनची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे राजेश्वर यानेच कोळशेवाडी पोलीस ठाण्यात फोन करून मी बिपीन ची हत्या केल्याचे सांगितले.
घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत बिपीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर आरोपी राजेश्वर पांडे याला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली पुढील तपास सुरू केला आहे.