समर्थ राऊळ महाराज
माझी बदली पुण्यावरून कुडाळ येथे झाली. मी दुय्यम अभियंता कुडाळ येथे हजर झालो. चार्ज घेतला, फिरती चालू झाली. रस्त्याने जातेवेळी मला मंदिर दिसले. मी गाडी थांबवून मंदिरामध्ये प्रवेश केला आणि माझ्याबरोबर असलेली मंडळी ही आजूबाजूच्या गावातली होती. त्यांनी मला सर्व माहिती सांगितली आणि तेथे असलेले विनू अण्णा यांच्याशी ओळख झाली. अण्णांचा स्वभाव, ते कुणीही भक्त येऊ दे हसत हसत माहिती देत. महाराज यांच्या मंदिरमध्ये जे शांतीचे वातावरण सांगून कोण देणार नाही. अण्णांचा प्रेमळ स्वभाव म्हणजे माणूस आपोआपच खेचल्यासारखा येतो. मी राऊळ महाराजांना पाहिलेले नाही. पण त्यांचे माझ्यावर प्रेमाचे नाते आहे. त्यामुळे माझ्या मुखी सदैव राऊळ महाराज हे नाव कायम राहील. मी कुडाळमध्ये आल्यानंतर महाराजांचे दर्शन घेऊनच पुढची कामे करतो. मला कुडाळला येऊन ९ वर्षे झाली. त्यांच्या कृपेने मी कधीही आजारी नाही. पण एक वेळा माझ्या कमरेत पाणी झाले होते. नंतर मी डॉक्टरकडे गेलो. मला खूप त्रास होत होता. पुढे काय होणार, कोठे विश्रांती मिळणार. मी राऊळ महाराज समाधी मंदिरमध्ये गेलो.
अण्णा होतेच. मी त्यांना सर्व हकिगत सांगितली. अण्णा म्हणाले, तुमची आबांवर श्रद्धा आहे. त्यांच्या समाधीकडे त्यांना सांगा त्याप्रमाणे मी डोके ठेवून महाराज यांना सांगून घरी गेलो व जेवण करून झोपलो. महाराज आले व इंजेक्शन देत आहेत, पाणी देत आहेत. हा सर्व माझ्या स्वप्नातला प्रकार होता. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे. त्याच्यानंतर मला कधीही त्रास झाला नाही. तसेच मी डॉक्टरकडे गेलेलो नाही. त्याच्यानंतर महाराज यांची जयंती होती. मला खूप कामे होती. तरीपण घाईत मी महाराजांचे दर्शन घेऊन जात होतो. अण्णा म्हणाले, प्रसाद घेऊन घरी चला. मी प्रसाद घेतला, घरी गेलो. पण माझ्या बायकोला आवड नव्हती, माझ्या पत्नीला नंदिनीला म्हणालो, अगं राऊळ महाराजांचा प्रसाद सर्वांनी घ्या. नंदिनी हे काही मानत नसल्याने तिने म्हटले. मला नको आहे आणि रागाने चहा करायला गेली. पाणी गरम उकळले होते. काय झाले ते तिलाच माहीत नाही आणि तिचे दोन्ही हात भाजले. बोंबा मारत होती इकडून तिकडे. औषध लावत होती. सर्व उपचार झाले तरी हातांचा भडका काही कमी होईना. मी गप्प होतो. मला माहीत होते की, महाराजच उपाय काढणार, मी नंदिनीला म्हणालो, ‘बघ तू महाराजांचा प्रसाद नको म्हणालीस ना. आधी हा प्रसाद घे, महाराज तुला बरे करणार आणि काय चमत्कार, प्रसाद खाल्ल्यावर हात पूर्वीसारखा झाला. त्यानंतर ती महाराजांचे दर्शन घेऊन गेली.
माझं गावी खूप महत्त्वाचं काम होतं. आम्हाला तर ते होण्यासारखे वाटत नव्हते. कितीही पैसा खर्च केला तरी झाले नसते. मी गावी जाणार असल्यामुळे महाराजांच्या समाधी दर्शनाला आलो. सर्व कुटुंब बाबांचे दर्शन घेऊन जाऊया. अण्णांना सर्व सांगितले. अण्णा म्हणाले, तुम्ही महाराज समाधीकडे जाऊन तुमचे काय ते त्यांनाच सांगा. तुमचे काम होईल. आम्ही सर्व गावी गेलो. सर्व महाराज कृपेने सर्व कामे पार पडली. गावातील सर्व ग्रामस्थ काय हो भरत शेठ काय तुम्ही जादू केली. आम्ही आजपर्यंत कधी हार खाल्ली नाही. अहो तुम्ही आणि मी वेगळा नाही किंवा जादू पण केली नाही. हा फोटो पाहा. हे संत होऊन गेले. त्यांचे पिंगुळी गावी समाधी मंदिर आहे. त्यांना मी गुरू मानले आहे. त्यांची कृपादृष्टी आहे. गावातील मंडळी फोटो पाहून आनंदित झाली. महाराज यांना मी पाहिले नाही तरी त्यांचे मला दर्शन होत आहे. त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे. कुठेही दूर गेलो तरी त्यांचे चरण सोडणार नाही. एवढी त्यांची कृपादृष्टी आहे. त्यांचे रात्रंदिवस चिंतन करीत असतो. त्यांचे गुरुवारी दर्शन चुकवत नाही. ते आमच्या सर्व कुटुंबाचे बाबा आहेत. मी आज अपेक्षेपेक्षा खूप समाधानी आहे. त्यांची कायमची सेवा व्हावी हीच इच्छा.