Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीप्रेम विकत मिळत नाही, हे ओरबाडून घेता येत नाही : उद्धव ठाकरे

प्रेम विकत मिळत नाही, हे ओरबाडून घेता येत नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांवरही निशाणा साधला. ‘गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मेळावे झाले, असा मेळावा पहिल्यांदाच झाला. तुमचे प्रेम पाहून शब्द सूचत नाहीये. हे प्रेम विकत मिळत नाही, हे ओरबाडून घेता येत नाही. ही कोरडी गर्दी नाही, ही माझ्या जीवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘मला तुमच्या प्रेमाचे संरक्षण मिळाले आहे. आपल्या पक्षात गद्दारांनी गद्दारी केली, हा गद्दारीचा शिक्का पुसता येणार नाही. अनेकांना प्रश्न पडला की, शिवसेनेचे काय होणार. माझ्या मनात चिंता नव्हती. ज्यांनी हे कार्य सोपवले आहे, तो बघून घेईल. आज शिवतीर्थ पाहून त्यांना वाटतंय गद्दारांचे आता काय होणार. इथे एकही माणूस भाड्याने आणला नाही. कोणालाही विचारा, एकही माणूस विकत आणला नाही. इथे आलेले सर्व एकनिष्ठ आहेत. हीच ठाकरे कुटुंबाची खरी कमाई आहे.’

उद्धव ठाकरे शिंदे गटावर टीका करताना म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला, मग त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडीसोबत गेलो. त्यावेळी आताचे सर्व लोक सोबत होते. अमित शाह बोलले की असे काही ठरलेच नव्हते. पण मी शपथ घेऊन सांगतो, भाजप आणि शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यायचे असं ठरलं होतं. मग त्यावेळी या गद्दारांनी का आवाज उठवला नाही. शिवसेना संपवण्यासाठी आता सर्व काही सुरू आहे. याला आमदार केलं, मंत्री केलं, आताही मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा यांची गद्दारी सुरुच. ही बाप चोरणारी औलाद आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभ्य गृहस्थ आहेत. त्यांना जसा कायदा कळतो तसा आम्हालाही कळतो. मिंधे गटातील कोण गोळीबार करतोय, कोण म्हणतोय चुन चुन के मारूंगा. मग कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते म्हणाले मी पुन्हा येईन. दीड दिवसासाठी ते आले आणि परत गेले. आता उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आहे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही काय कुत्री पाळायची का?

उद्धव ठाकरे म्हणाले की, “जर माझ्या शिवसैनिकावर अन्याय कराल तर आम्ही कदापी शांत बसणार नाही. आज इकडे जिवंत मेळावा आहे. तिकडे नुसता रडारड सुरू आहे, ग्लिसरिनच्या बाटल्या गेल्यात. आम्ही भारतीय जनता पक्षाची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही हिंदुत्व सोडले नाही. पाकिस्तानच्या जीनाच्या कबरीवर यांच्या नेत्यांनी मस्तके टेकवली. पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला न बोलवता गेले आणि केक खाल्ला, हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?”

‘दरवर्षी परंपरेप्रमाणे मेळाव्यानंतर रावण दहन होणार आहे. याळेस रावन वेगळा आहे. काळ बदलो, तसा रावन बदलतो. आतापर्यंत दहा तोंडाचा होता, आता ५० खोक्यांचा रावण झाला आहे. हा ५० खोक्यांचा ‘खोकासूर’ आहे. माझी शस्त्रक्रिया झाली, तेव्हा माझी बोटही हालत नव्हती. तेव्हा मी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती, तेव्हा हा ‘कट्टपा’ कट करत होता. पण, त्यांना कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. माझ्या शक्तीशी पंगा घेतलेला आहात, देव तुमचे भले करो. ही धमकी नाही. तेजाचा शाप आहे. आई जगदंबा माझ्या पाठीशी आहे.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -